आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्विशतकमहोत्सवी हंटेरियन म्युझियम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादा समाज विकसित होऊन सतत प्रगतीच्या वाटेवर कसा राहिला, यामागील कारणे शोधायची असतील तर त्या देशातील म्युझियम-वस्तुसंग्रहालये, ग्रंथसंग्रहालये, शिक्षणसंस्था यांचा अभ्यास हा एक मार्ग असतो. वस्तुसंग्रहालयापेक्षा मी म्युझियम हा शब्द वापरणे पसंत करीन. ‘म्युझ’ ही ग्रीक पुराणातील विद्येची देवता; त्यावरून म्युझियम. हे शिक्षणाचं माध्यम. लंडन अशा संस्थांची रेलचेल असलेले शहर. तेथे केव्हाही गेलात तरी कोणाची ना कोणाची शताब्दी, द्विशताब्दी वगैरे चालू असते. त्यात लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्समधील हंटेरियन म्युझियमची द्विशताब्दी साजरी होत आहे, हे कळल्यामुळे तिकडे पाय वळलेच.
जॉन हंटर (1728-1793) याने आधुनिक शस्त्रक्रियेचा वैज्ञानिक पाया घातला. उत्तम शल्य कौशल्याबरोबर तो उत्तम शिक्षक होता. देवीवरची लस शोधणारा एडवर्ड जेनर हा त्याचा विद्यार्थी. भारतीय संस्कृतीत ‘गुरुर्देवो भव’ असल्यामुळे भारतीय विद्यार्थी साधारणपणे शिक्षकांना उलट प्रश्न विचारत नाही. पण गुरू असून जॉन हंटर यांचे उलटेच. तोच एडवर्ड जेनर इतर विद्यार्थ्यांना सांगायचा, ‘अरे, तुम्ही उलटेसुलटे प्रश्न विचारा, प्रयोग करा.’ जॉन हंटर स्वत:ही प्रयोगशील. त्याने मानवी शरीराचे विच्छेदन करून अनेक अवयव काचेच्या भांड्यात जतन केले. प्राण्यांच्या अवयवांचेही तसेच. त्याच्याकडे जगभरचे चौदा हजार नमुने होते. याचा उपयोग वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी होत असे.
जॉन हंटर मेल्यानंतर हे चौदा हजार नमुने ब्रिटिश सरकारने विकत घ्यावेत, म्हणून ब्रिटिश पार्लमेंटला विनंती करण्यात आली. बर्‍याच पत्रव्यवहारानंतर ब्रिटिश पार्लमेंटने पंधरा हजार पौंड देऊन हे सगळे नमुने विकत घेतले. त्यातील फक्त दोन हजार पौंड हंटरच्या बायकोला मिळाले. उरलेला पैसा वैद्यकीय शिक्षणासाठी खर्च करण्यात आला. नमुने सांभाळण्याची जबाबदारी ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’वर सोपवण्यात आली. या संस्थेने 1813 मध्ये हंटेरियन म्युझियमची स्थापना केली. समाजाचा विकास असा होत असतो. म्हणून द्विशताब्दीचा उत्साह.
जर्मन सैन्याने 10 मे 1941 रोजी केलेल्या बॉम्बहल्ल्यात हंटेरियन उद्ध्वस्त झाला. हंटरच्या दहा हजार नमुन्यांची राख झाली. तळघरातले नमुने वाचले. काही वर्षांत इमारत पुन्हा उभी राहिली. आज हंटरचे दोन हजार नमुने शिल्लक आहेत. म्युझियम फक्त शल्यचिकित्सक, वैज्ञानिक यांच्यावर चालत नसते; त्यासाठी तंत्रज्ञ, कारागीर, चित्रकार, सेवक यांची मदत लागते. हंटेरियन म्युझियम त्यांना विसरलेले नाही. एका स्वतंत्र दालनात छायाचित्रांच्या साहाय्याने त्यांचे कामाला वाहून घेणे दाखवले आहे. एक महिला जपून ठेवलेल्या कवट्या स्वच्छ पुसून ठेवत असे. काही नमुने अल्कोहोलमध्ये ठेवलेले असतात. अल्कोहोल उडून जातो. असे नमुने व्यवस्थित सांभाळावे लागतात. नमुन्याची निगा राखणे हे एक विज्ञान आहे. म्हणूनच हंटेरियन म्युझियमचे परिरक्षण करणारे सदैव कार्यरत असतात. शस्त्रक्रियेच्या वेदना आणि होणारा जंतुसंसर्ग-इन्फेक्शन हे शल्यचिकित्सकाचे शत्रू. अमेरिकी डेंटिस्ट विल्यम मॉर्टन यांनी 1846 मध्ये अ‍ॅनेस्थेशियाचा-भूल देण्याचा शोध लावला. 1865 मध्ये जोसेफ लिस्टरने निर्जंतुकीकरणाची सुरुवात केली. या दोहोंची त्या काळातील उपकरणे हंटेरियन म्युझियममध्ये आहेत. या दोन शोधांमुळे शस्त्रक्रियेच्या प्रगतीने गती घेतली. पूर्वी शस्त्रक्रियेची शस्त्रे तांब्या-पितळेची होती. यांचे निर्जंतुकीकरण करणे कठीण. पुढे स्टेनलेस स्टीलचा शोध लागला. शस्त्रे अधिक धारदार झाली, निर्जंतुकीकरण सोपे झाले. धातुविज्ञानाचा शस्त्रक्रियेला उपयोग झाला. विज्ञानाच्या शाखा एकमेकांना अशी मदत करत असतात. गतकाळातील शस्त्रे आणि आजची शस्त्रे व उपकरणे यांचे दालन पाहून माणूस थक्क होतो. शल्य कौशल्य कसे सूक्ष्म व सुरक्षित होत गेले, रुग्णाचे जीवन कसे सुखकर झाले, याची कल्पना या दालनात येते.
दोन महायुद्धांनी शल्यचिकित्सेपुढे विलक्षण आव्हाने उभी केली. युद्धामुळे कल्पना करता येणार नाही, अशा प्रकारच्या जखमा घेऊन सैनिक घरी परतले. फाटलेले चेहरे, अर्धवट तुटलेले हातपाय अशा दृश्य व मनावर झालेले आघात अशा अदृश्य जखमांनी रुग्णालये भरली होती. सुघटन शस्त्रक्रिया ही काळाची गरज होती. शल्यचिकित्सकांनी जाणतेपणाने तिचा विकास याच काळात केला. त्याच्या पाऊलखुणा या म्युझियममध्ये जतन करून ठेवल्या आहेत. आज जर हंटरने त्याचे म्युझियम पाहिले, तर पुढील पिढ्यांनी केलेली कामगिरी पाहून तो खुश होईल. हंटरने मानवी तसेच प्राण्यांच्या कवट्या, जबडे, दात यांचा अभ्यास केला. अनेक नमुने जमवले. दातांवर पुस्तके लिहिली. वैद्यक विज्ञानाला दंतविज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. दातांचा उपयोग गुन्हेशोधनासाठी होतो, हे विज्ञानाला समजले. पाश्चात्त्य देशांत प्रत्येक दंतरुग्णाच्या दातांचे एक्सरे, दातांचे ठसे यांच्या नोंदी डेंटिस्टने ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. ‘फॉरेन्सिक डेंटिस्ट्री’ न्यायसाहाय्यक दंतविज्ञान याचा अभ्यासक्रम पाश्चात्त्य विद्यापीठांमध्ये असतो. याचा पाया हंटरसारख्या विज्ञानवंतांनी घातला. गुन्हेशोधनात विकसित देश इतके प्रगत का, याची पाळेमुळे अशी खोलवर गेलेली आहेत. भारतात या अभ्यासक्रमाची सुरुवात आता होत आहे. या विषयाचे भारतात फक्त आठ तज्ज्ञ आहेत. हे म्युझियम सर्वांसाठी खुले आहे. आत जाण्यासाठी शुल्क नाही. मुलांनी, विद्यार्थ्यांनी म्युझियम पाहिल्यानंतर त्यांना काय समजले, हे आजमावण्यासाठी सचित्र प्रश्नपत्रिका आहे. मुलांना नमुन्याची चित्रे काढायची असतील तर कागद, पेन्सिल इ. साधने ठेवली आहेत. भारतात अशा म्युझियमची नितांत गरज आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
dranand5@yahoo.co.in