आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘निषिद्ध’: आत्मनाशी जगण्याचा पट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यसनाधीनता या माणसाच्या जीवनावर विदारक परिणाम करणार्‍या समस्येवर आधारलेल्या काही थोड्या साहित्यिक कलाकृतींमध्ये गजानन परब यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘निषिद्ध’ या कादंबरीचा समावेश करता येईल. व्यसनाच्या पाशात अडकलेल्या विश्वास या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखेभोवती कथानक फिरत राहते.
मुंबईत विश्वासच्या चाळीतल्या घरी कामधंद्याच्या निमित्ताने गावाकडून आलेल्या विडी ओढणार्‍या नारायणकडून पहिल्यांदा व्यसनाचा परिचय विश्वासला होतो. नारायणच्या पिशवीतून विडी काढून घरात कोणीही नसताना ती ओढण्याचा पहिला अनुभव विश्वासला खूपच थ्रिलिंग वाटतो. त्या धुराचा काही त्रास न होता उलट त्यामुळेच एक झकास झिंग चढते. पुढे बाजारात एक दिवस ‘पिओ, पिओऽऽ कॅप्स्टन पिओ’ असं पुकारत हिंडणार्‍या उंच व दुसरा बुटका अशा बाहुल्यांना पाहिल्यावर विश्वासच्या बालमनावर त्याचा खूपच प्रभाव होतो. त्यामुळे त्याला सिगारेटबद्दलही मोठे आकर्षण निर्माण होते. पुढे शाळेत भगवान, राणे, कुलकर्णी हे चोरून सिगारेट ओढणारं टोळकं विश्वासला भेटतं. त्यांच्याबरोबर कॅप्स्टनची लज्जत चाखता आली.
विश्वास कॉलेजला जातो, बी. एस्सी. होतो. नोकरीही मिळते. त्याचं धूम्रपानाचं व्यसन वाढतच जातं. हे व्यसन जीवघेणं आहे, याची त्याला कल्पना आहे. शेजारच्या दाभाडेकाकू, आई तंबाखूच्या व्यसनाची शिकार बनतात, हेही त्यानं पाहिलं आहे. परंतु तो स्वत:ला सावरू शकत नाही. विश्वासचा थोरला भाऊ व त्याची पत्नी संचिता हे त्याला या व्यसनातून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. अखेरीस विश्वासही कॅन्सरसारख्या दुर्धर रोगानं पछाडतो. घरातलं सारं वातावरण खिन्न, विषण्ण होतं. असं हे कादंबरीचं कथानक आहे.
कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे लेखकाची कसदार निवेदनशैली. व्यक्तिरेखांच्या अकृत्रिम, सुबोध संवादातून तसेच मानसिक आंदोलनातून प्रकट होणारे निवेदन हे प्रवाही व तितकेच प्रभावीही होत जाते. विश्वासचे सारे कुटुंबीय, दाभाडेकाकू यांच्यातील परस्पर नातेसंबंध आणि त्यातले अपरिहार्यपणे निर्माण होणारे ताणतणाव लेखकाने समरसतेने टिपले आहेत. म्युनिसिपल शाळेतलं वातावरण, उनाड पोरांचे टोळके, त्यांचे मधल्या सुटीतले चाळे, आईचा मृत्यू, पत्नीला स्तनाचा कॅन्सर झाल्याचे भयंकर स्वप्न, चाळीतलं वातावरण, प्रत्येक घरातल्या रेडिओवर वेगवेगळ्या स्टेशनवरची गाणी, रविवारी घराघरातून येणारा मटणाचा वास, जुगाराचे अड्डे, जुगारात गुंगलेल्या बापाला हलवून हलवून उठवणारं त्याचं पोरं हे प्रसंग, वर्णनं कसलेल्या लेखकाची साक्ष देतात. कॅन्सरबद्दल वृत्तपत्रात आलेली सगळी माहिती विश्वास वाचतो. लेखकाने या तंत्राद्वारे कादंबरीच्या रूपबंधात अस्थानी वाटणारी माहितीही अवगुंठित करून दिली आहे. त्यामुळे त्याने कुठेही कादंबरीच्या आस्वादात बाधा येत नाही. आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कादंबरीत प्रबोधनपर आशय लेखकाने अत्यंत संवेदनशीलपणे व ताकदीनं मांडला आहे. त्यामुळे कादंबरी रंजकतेबरोबर बोधकही झालेली आहे.
ही कादंबरी धूम्रपानाच्या व्यसनाचा निषेध करणारी असल्यानं तिचं ‘निषिद्ध’ हे शीर्षक समर्पक असून मुखपृष्ठावरील खेकडा हे कर्करोगाचं प्रतीक अत्यंत सूचक वाटतं. या कादंबरीला समीक्षक प्रा. वि. शं. चौघुले यांनी लिहिलेली प्रस्तावना ही एक जमेची बाजू आहे. आशयसंपन्न व उत्तम निवेदनशैलीचा बाज लाभलेल्या या कादंबरीचं रसिक वाचक स्वागत करतील, यात शंका वाटत नाही.

‘निषिद्ध’
लेखक : गजानन परब
कोमल प्रकाशन
पृष्ठे : 109, मूल्य : 225 रुपये