आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Anand Joshi's Artical On Bodelian Liberary Of Oxford

ऑक्सफर्डचं बॉडलियन ग्रंथालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठांत हजारो वर्षांची संस्कृती असलेल्या भारतातील एकाही विद्यापीठाचं नाव नाही, ही बातमी वाचली. ब्रिटनसारख्या छोट्या देशातील इतक्या शिक्षण संस्था पहिल्या दोनशेत असाव्यात, हेही आपण वाचतो. हे असं का? हा प्रश्न सुजाण संवेदनशील भारतीयांच्या मनात आल्यावाचून राहत नाही. भारतातील विद्यापीठं पहिल्या दोनशेत नाहीत, याची चर्चा सर्व माध्यमांतून होते; पण ब्रिटनमधील इतकी विद्यापीठं पहिल्या दोनशेत का, याची माहिती सगळ्यांना नसते. ती असणं फलदायी ठरण्याची शक्यता आहे.
नुकताच ऑक्सफर्डला गेलो होतो. गावात शिरल्याबरोबर सगळीकडं शैक्षणिक वातावरण. तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींची, त्यांच्या प्राध्यापकांची लगबग. बॅलिऑल, ट्रिनिटी, मर्टन ही सातशे-आठशे वर्षांची ‘तरुण’ कॉलेजेस पाहिली. सेमिनार्स, समर स्कूल्स चालू होती. ऑक्सफर्डचा गुरुत्वबिंदू म्हणजे तेथील बॉडलियन ग्रंथालय. सबंध युरोपमधील खापरपणजोबा ग्रंथालय. स्कॉलर्स याला बॉडली किंवा बॉड असं प्रेमानं म्हणतात. चौदाव्या शतकात याची स्थापना झाली. सोळाव्या शतकापर्यंतचा काळ या ग्रंथालयासाठी कठीण गेला. पुढे ऊर्जितावस्था आली. 1602मध्ये थॉमस बॉडले यांनी या ग्रंथालयाची पुन:स्थापना केली.
सोळाव्या शतकापासून आजपर्यंत या ग्रंथालयानं अनेकदा कात टाकली. प्रत्येक कालखंडाशी मिळतंजुळतं घेत या ग्रंथालयाचा विकास झाला. आजसुद्धा याचं नूतनीकरण चालू आहे. ऑक्सफर्डबद्दलचा विचार बॉडलियनशिवाय होऊच शकत नाही. या ग्रंथालयाच्या पुस्तकांच्या दुकानात गेलो. तिथं बॉडलियननं प्रकाशित केलेली पुस्तकं मिळतात. या ग्रंथालयाचे पुन:संस्थापक सर थॉमस बॉडले यांचं आत्मचरित्र तिथं मिळालं. हे इंग्लिश भाषेतील पहिलं आत्मचरित्र मानलं जातं. ते वाचल्यानंतर काही विचार मनात रुंजी घालू लागले.
समाजाची उत्क्रांती शिक्षणातून होत असते. ब्रिटनमध्ये फ्रान्ससारखी क्रांती झाली नाही; पण उत्क्रांती मात्र घडत राहिली. प्रत्येक शतक नवीन ज्ञान घेऊन आलं. गेल्या सातशे-आठशे वर्षांचा काळ बघितला तर मुख्यत: हे पाश्चात्त्य देशात घडलं. या ज्ञानानं माणसाची स्वत:कडे बघण्याची दृष्टी बदलली. तो स्वत:ला नव्या अवतारात बघू लागला. माणसाची आयडेंटिटि-व्यक्तित्व बदललं. त्यानुसार समाजात बदल होऊ लागले. बदलाला विरोध झालाच; पण येथे उत्क्रांतीची पावलं दमदार पडली. बदलाला धार्जिणी ठरली. ही उत्क्रांती जाणणारे धुरीण समाजात व्हावे लागतात, तसे धुरीण ब्रिटनमध्ये सतत होत गेले. थॉमस बॉडले त्यातील एक.
धर्म, राज्य, अर्थ या तिन्ही सत्ता आपापल्यापरीनं सतत समाजावर संपूर्ण स्वामित्व मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. हे जसं आज घडत आहे, तसं कालही घडलं होतं. यामुळं समाज व पर्यायानं व्यक्ती यांचं जीवन ढवळून निघतं. थॉमस बॉडले यांचा काळही तसाच होता. मेरी ट्युडर या राणीचा 1516 ते 1558 हा जीवनकाल. या राणीनं 1553 ते 1558 या काळात इंग्लंडवर राज्य केलं. तिचा स्पेनच्या कॅथॉलिक राजघराण्याशी संबंध होता.
तिला इंग्लंडमधून प्रॉटेस्टंट पंथ घालवून कॅथॉलिक पंथ आणायचा होता. तिनं बराच खूनखराबा केला म्हणून तिला ‘ब्लडी मेरी’ म्हणतात. बॉडले कुटुंब प्रॉटेस्टंट म्हणून थॉमसच्या वडलांना बायको-मुलांसह युरोपमध्ये वनवास घ्यावा लागला. क्विन मेरी मेली. एलिझाबेथ राज्यावर आली. तिनं इंग्लंडचा धर्मपंथ बदलून प्रॉटेस्टंट पंथ आणला. थॉमस बॉडले युरोपमध्ये शालेय शिक्षण घेऊन लंडनला परतला. उच्चशिक्षणासाठी त्याच्या वडिलांनी त्याला ऑक्सफर्डमध्ये दाखल केलं.
थॉमसने वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ऑक्सफर्डच्या मर्टन कॉलेजात शिक्षणास सुरुवात केली. 1576मध्ये त्याचं शिक्षण पुरं झालं. राज्य शासनाने त्याला युरोपात जाण्याची परवानगी दिली. तो एक पंडित ‘स्कॉलर’ व मुत्सद्दी म्हणून ओळखला जाऊ लागला. 1586मध्ये त्याचा एका श्रीमंत विधवेशी विवाह झाला. देशाटन केल्यामुळे युरोपात ‘पंडित मैत्री’ झाली, राजदरबारी संचार वाढला. या सर्वाचा उपयोग त्यानं ऑक्सफर्डच्या विद्याविकासासाठी केला.
चौदाव्या शतकात स्थापलेलं ऑक्सफर्डचं ग्रंथालय डबघाईला आलं होतं. विद्यापीठाच्या विकासाचा मार्ग ग्रंथालयातून जातो, हे थॉमस बॉडले यानं जाणलं होतं. त्याला त्याच्या पत्नीकडून व वडिलांकडून बरीच स्थावर, जंगम मालमत्ता मिळाली होती; ती सर्व त्यानं या ग्रंथालयाला देऊन त्याची पुनर्बांधणी केली. युरोपमधील पंडित मित्रांकडून ग्रीक, लॅटिन तसेच चिनी भाषेतील ग्रंथ व हस्तलिखितं मिळवली. 1602मध्ये ऑक्सफर्डनं या ग्रंथालयाची बॉडलियन लायब्ररी म्हणून पुन:स्थापना केली. इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकाची एक प्रत बॉडलियन ग्रंथालयाला द्यावी, असा कायदा झाला. ऑक्सफर्डच्या विकासाचा मार्ग सुरू झाला.
त्याच काळातील महाराष्‍ट्राची स्थिती पाहू. ज्ञानेश्वरांचा काळ सरून 300 वर्षे झाली होती. सर्वदूर मोगलशाही होती. शिवशाही अवतरायची होती. हरिनामाचा गजर चालू होता. विद्यापीठं, ग्रंथालयं हे शब्द त्या काळच्या महाराष्‍ट्राच्या इतिहासात वाचायला मिळत नाहीत. पाश्चात्त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीची दुकानं भारतात नुकतीच उघडत होती. जागतिक विद्याविषयक स्पर्धेत त्या काळी भारत कुठेही नव्हता. माणूस इतिहास बदलू शकत नाही, पण घडवू शकतो.
विद्याविकासाच्या या स्पर्धेत भारत चार शतके मागे आहे. त्यामुळे पहिल्या दोनशे विद्यापीठांत भारतीय विद्यापीठाचं नाव नाही, यात नवल वाटण्यासारखं काही नाही. पण या स्पर्धेत तगून राहण्यासाठी हा समाज काय करत आहे, हे महत्त्वाचं. प्रत्येक गावात चांगलं ग्रंथालय, विद्यालय, महाविद्यालय हा त्यावरचा उपाय आहे. तो जितक्या जोमानं होईल, त्यातून विकास साधणार आहे. येथे ‘शॉर्ट कट’ चालत नाही. हाच बॉडलियनच्या इतिहासाचा धडा आहे.