आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांमधील डोकेदुखीमुळे कमी होऊ शकते त्यांची कार्यक्षमता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांमध्ये डोकेदुखीची मुख्य कारणे कोणती असतात ?
मुलांमध्ये प्रामुख्याने आढळणारी डोकेदुखीची मुख्य कारणे टेन्शन, हेडॅक व मायग्रेन (अर्धशिशीचा त्रास) या व्यतिरिक्त चष्म्याचा नंबर असणे, सर्दी व सायनसचा त्रास, डोक्यावरील ताण वाढणे, क्लस्टर हेडॅक, मेंदूत इन्फेशन होणे (जंतूसंसर्ग) अशा विविध कारणांमुळे डोकेदुखी होऊ शकते.
टेन्शन हेडॅक म्हणजे काय ?
टेन्शन हेडॅक हा 10 वर्षांपुढील मुलांमध्ये होणारा डोकेदुखीचा सर्वात प्रमुख त्रास होय. डोकेदुखीचे कारण हे रोजचे होणारे ताणतणाव, धावपळ, अभ्यासाचा ताण, कमी झोप ही असू शकतात. ब-याचदा वरीलपैकी काही कारणे नसूनही डोकेदुखीचा त्रास होतो. साधारण दुपार ते संध्याकाळी डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. परंतु कधी-कधी दिवसभरसुद्धा डोके दुखते. त्यात डोके आवळल्यासारखे व डोके चढल्याचा भास होतो. डोकेदुखीच्या प्रकारामध्ये त्यांचे रुटीन चालू ठेवू शकतात, परंतु त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
मायग्रेन (अर्धशिशी) डोकेदुखी म्हणजे काय ?
मायग्रेन (अर्धशिशी त्रास) साधारणत: 20 पैकी एका शालेय विद्यार्थ्यांमध्ये आढळतो. मायग्रेनचा त्रास लहान बालकांमध्ये (3 वर्षांवरील) सुद्धा होऊ शकतो, पण त्यांच्यामधील त्रास वेगळ्या प्रकारचा असल्याने त्यांचे निदान होत नाही. मायग्रेन अटॅकमध्ये ब-याचदा हातोड्याने मारल्यासारखे ठणठण डोके दुखते. काही मुलांमध्ये डोकेदुखी सुरू होण्यापूर्वी डोळ्यांपुढे काळे-पांढरे ठिपके अथवा रेघा दिसतात. किंवा हाता-पायांना मुंग्या येतात, परंतु मोठ्या माणसांपेक्षा यांचे प्रमाण फारच कमी असते. लहान मुलांमध्ये मायग्रेनची डोकदुखी पूर्ण डोक्यात होते. अर्धशिशीचे प्रमाण मोठ्या व्यक्तींपेक्षा कमी असते. डोकेदुखी सुरू झाल्यावर ब-याचदा उलटी आल्यासारखे वाटते किंवा प्रत्यक्षातदेखील उलटी होते. मायग्रेन अटॅकमध्ये साधारणत मुले आपले रुटीन चालू ठेवू शकत नाही व अंधारलेल्या खोलीत झोपून राहणे पसंत करतात. झोपेतून उठल्यानंतर डोकेदुखी कमी होते. मायग्रेन हा ब-याचदा आनुवंशिक असतो व एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये हा त्रास आढळतो.
मेंदूतील प्रेशर वाढल्याने कुठल्या प्रकारची डोकेदुखी होते? व त्याची कारणे काय असू शकतात ?
मेंदूतील प्रेशर वाढण्याचे प्रमुख कारण हे ब्रेन ट्युमर (मेंदूतील गाठ) असू शकते. या व्यतिरिक्त मेंदूत रक्तस्राव होणे, पाणी साठणे व अशुद्ध रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉक तयार होणे हीदेखील कारणे असू शकतात. कुठल्याही कारणामुळे मेंदूचे प्रेशर वाढले तर विशिष्ट प्रकारची डोकेदुखी होऊ शकते. ही डोकेदुखी प्रामुख्याने आडवे झाल्यावर / झोपेत वा झोपेतून उठल्यावर होते. ब-याचदा उलटी आल्यावर डोकेदुखी कमी होते. उठून बसल्यावर किंवा चालताना डोकेदुखी कमी होऊ शकते. खोकल्यानंतर किंवा शौचाच्या वेळेस जोर केल्याने ही डोकेदुखी वाढू शकते. अशा प्रकारे होणा-या डोकेदुखीचे त्वरित निदान व उपचार करणे गरजेचे असते.
डोकेदुखीचा मुलांमध्ये कुठला उपचार करतात ?
उपचारापूर्वी डोकेदुखीचे योग्य निदान होणे अत्यावश्यक असते. यासाठी योग्य डॉक्टरांची (पेडियाट्रिक न्यूरॉलॉजिस्ट) यांची भेट घेतल्यानंतर डॉक्टर प्रथम आपणास डोकेदुखीबद्दल माहिती विचारून योग्य त्या तपासण्या सांगतात. निदान करण्यासाठी विविध तपासण्या केल्या जाऊ शकतात. (उदा- सिटी स्कॅन, एम.आर.आय. स्कॅन, रक्त व लघवी तपासणी) ब-याचदा आपण दिलेल्या माहितीवरून सुद्धा निदान करणे शक्य होते व तपासण्यांची गरज पडत नाही. डोकेदुखीचा उपचार त्याचे कारणांवर व निदानावर अवलंबून असतात. ब-याचदा गोळ्या किंवा पाणी साठले असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. तुमचे न्युरॉलॉजिस्ट याबद्दल आपल्याला अधिक माहिती देऊ शकतात.
डोकेदुखीचा त्रास असणा-या मुलांची कोणती काळजी घ्यावी
डोकेदुखीच्या गोळ्या (पेनकिलर्स) जास्त प्रमाणात किंवा दररोज घ्यायचे टाळावे. नियमितपणा ठेवावा. झोपण्याची व उठण्याची वेळ शक्यतो नियमित ठेवावी. कमीतकमी 6 ते 7 तास झोपावे. नियमित व्यायाम करावा. मायग्रेनचा त्रास असलेल्या रुग्णांनी शक्यतो चॉकलेट, चीझ, संत्री, कॉफी व कोका-कोलासारखे पदार्थ टाळावेत. शालेय विद्यार्थ्यांनी वर्षातून एकदा डोळे तपासणी करून घ्यावी.