आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Sandip Hamberde Artical On Child's Urinal Problems

बालकांमधील मूत्रमार्गाचे आजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालकांमध्ये किडनी गर्भावस्थेत 28 व्या दिवशी तयार होते. आईच्या गर्भातील पाणी हे बालकाच्या लघवीमुळे तयार होते, परंतु हे पाणी जेव्हा कमी होते, त्यास ओलिगोहायड्रामनिओस असे म्हणतात. हे गर्भावस्थेतील सोनोग्राफीवरून निदान करता येते. गर्भावस्थेतील पाणी कमी होते याला बहुतांशी बालकाच्या मूत्रमार्गातील अडथळे कारणीभूत असतात. काही जास्त प्रमाणात आढळणारे आजार :
मूत्रमार्ग जंतुसंसर्ग : या आजारात बाळाला ताप येतो. बाळ किरकीर करते, दूध व्यवस्थित घेत नाही, कधी-कधी बाळाला पातळ संडास होते. या आजारात बाळाची लघवी तपासून रोगनिदान करता येते. यावर वेळीच उपचार न केल्यास किडनी किंवा आजूबाजूच्या अवयवांमध्ये पू तयार होऊ शकतो.त्यास पायोनेप्रोसिस किंवा पेरीनेफ्रीक अ‍ॅब्सेस असे म्हणतात.
क्रॉस्ड रिनल इक्वेपिया : या आजारात एका बाजूची किडनी दुस-या बाजूच्या किडनीबरोबर जोड तयार करते व त्यामुळे किडनीमध्ये लघवी जमा होऊन मूतखडे तयार होऊ लागतात.
हॉर्सशू किडनी : या आजारात दोन्ही किडनीचा खालचा भाग जोडला जाऊन मूत्रमार्गात अडथळा तयार होतो.
पॉलिसिस्टिक किडनी डिसिज : या आजारात किडनीमध्ये पाण्याच्या गाठी तयार होतात व किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. लिव्हरमध्ये सूज येऊन कावीळ होण्याची भीती असते.
पेल्व्हियूरेटेरिक जंक्शन ऑप्स्ट्रक्शन : या मूत्रपिंड व मूत्रवाहिन्यामधील जोडच्या ठिकाणी अडथळा तयार होऊन मूत्रपिंडात लघवी जमा होते व हळूहळू मूत्रपिंडाला सूज येऊ लागते. या आजारात बाळाचे पोट फुगू लागते. पोटाला हात लावल्यास किडनी हाताला लागते. काही बालकांमध्ये लघवीमधून रक्तस्राव होण्याची शक्यता असते.
ऑब्स्ट्रक्टेड मेगायूरेटर : या आजारात मूत्रवाहिनी व मूत्राशयामधील जोड बंद पडते व त्यामुळे मूत्रपिंड व मूत्रवाहिनीला प्रचंड सूज येऊ लागते. त्यामुळे हळूहळू किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते. तसेच मूत्रमार्गात मूतखडा तयार होणे व मूत्रपिंडात पू तयार होणे असे धोके संभवतात.
व्हेसायकोयूरेटेरिक रिफ्लक्स : या आजारात लघवी मूत्राशयातून मूत्रवाहिनीमध्ये उलटी जाते,त्यामुळे मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग होतो. बाळाची भूक मंदावते, ताप येतो व बाळ वारंवार आजारी पडते.
यूरेटेरोसील : या आजारात मूत्रवाहिनी मूत्राशयात ज्या ठिकाणी उघडते त्या ठिकाणी पडदा तयार होऊन लघवीचा फुगा तयार होतो, त्यामुळे किडनीवर सूज येते व किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते.
मूत्राशयातील मूतखडा : लघवीमधील मूत्रमार्गातील जंतुसंसर्गामुळे खड्डे तयार होतात. बाळाचे पोट दुखू लागते व बाळ वारंवार आजारी पडते.
पोस्टेरियर यूरेथ्रल व्हाल्व्ह : या आजारात मूत्राशयाच्या तोंडाभोवती पडदा तयार होतो. त्यामुळे लघवी तुंबून राहते आणि मूत्राशय, मूत्रपिंड व मूत्रवाहिनी यांना सूज येते व किडनी अकार्यक्षम होते
.
एक्स्ट्रोफिक इपिस्पेडियास : मूत्राशय व लघवीची जागा पोटावर पूर्णत: उघडी असते, त्यामुळे मूत्राशयात जंतुसंसर्ग होऊन बाळाच्या जिवाला धोका संभवतो.
हायपोस्पेडियास : या आजारात बाळाच्या लघवीची जागा समोर नसून खालच्या भागाला असते. त्यामुळे बाळाला जंतुसंसर्ग होऊ शकतो व लघवीला त्रास होतो.
युरिनरी इन्कॉन्टिनन्स : बाळाचे लघवीवरील नियंत्रण व्यवस्थित नसते. सुरुवातीला औषधोपचार करून किंवा गरज भासल्यास शस्त्रक्रिया करून या आजाराचे निरसन जरूर करता येते.
मूत्रपिंडाचा कर्करोग : यास विल्मस ट्यूमर म्हणतात. बाळाला अंघोळ घालत असताना त्याच्या पोटात दगडासारखी गाठ लागते व बाळाच्या लघवीतून रक्त जाऊ लागते. यावर मूत्रपिंड शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकणे हा यावरील एकमेव उपचार आहे.
इतर आजारांमध्ये बाळाची वारंवार पुनर्तपासणी करून बाळाच्या किडनीची सूज व कार्यक्षमतेवर लक्ष ठेवावे लागते. आवश्यक पडल्यास शस्त्रक्रियेद्वारे हे सर्व आजार चांगले करता येऊ शकतात. अत्याधुनिक रोगनिदान व सहज उपचारपद्धतीमुळे बालकांमधील किडनीचे आजार यांचा शोध लावणे व त्यावर योग्य उपचार करणे, आता यशस्वीपणे शक्य झाले आहे.
रोगनिदान
1) लघवीची तपासणी (युरिन कल्चर)
या तपासणीमध्ये मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग ज्या जंतुमुळे झाला आहे त्याचे निदान होते व त्यानुसार प्रतिजैविके सुरू करता येतात, यास किमोप्रोफायलॅक्सिस असे म्हणतात.
2) किडनीचा एक्स-रे
यात क्ष किरणांच्या तपासणीत मूतखडा तसेच किडनीची सूज यांचे रोगनिदान करता येते.
3) किडनीची सोनोग्राफी
सोनोग्राफीद्वारे किडनीला तसेच मूत्रवाहिनीला आलेली सूज कळते. तसेच मूत्राशयाला आलेली सूज व मूत्रमार्गातील आलेला पडदा व मूतखडा याचे निदान होते.
4) मिक्च्यूरेटिंग सिस्वेयुरेथ्रोग्राफी
या तपासणीत लघवीच्या जागी नळी दाबून औषध टाकून लघवीकरता एक्स-रे घेतला जातो. यात लघवी उलटी जाणे व मूत्रमार्गातील पडदा याचे अचूक निदान करता येते.
5) इन्ट्राव्हिनस पायलोग्राफी
या तपासणीत रक्तामध्ये डाय सोडला जातो व ठरावीक वेळेच्या अंतरावर वारंवार एक्स-रे काढून यात मूत्राशयाची सूज, मूत्रपिंडाची कार्यक्षमता मूत्रमार्गातील अडथळे, मूतखडा, पडदा व जन्मजात मूत्रमार्गातील दोष, लघवी उलटी जाणे या सर्व आजारांचे निदान करता येते. तसेच किडनीच्या कार्याबद्दल ब-यापैकी माहिती मिळते.
6) रिनल स्कॅन
अत्याधुनिक न्यूक्लिअर मेडिसीनच्या साहाय्याने किडनीच्या अचूक कार्यक्षमता तसेच लघवी तयार करण्याची क्षमता व ती बाहेर टाकण्याची क्षमता यावर अचूकपणे प्रकाश टाकता येतो.