आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरसंपदेसाठी पौष्टिक खावे मात्र व्यायामही हवाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात थंडीची चाहूल लागली की सुखावतो. हे आल्हाददायक वातावरण आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते. थंडीमुळे त्वचेतील घाम कमी होतो. शरीरातला अग्नी बाहेर न जाऊ शकल्याने या दिवसात आपला अग्नी उत्तम असतो. तीक्ष्ण असतो. त्यामुळे हिवाळ्यात भूक जास्त लागते आणि आपली पचवण्याची क्षमताही चांगली असते. म्हणून या काळात आहार इतर ऋतूंच्या मानाने जड असला तरी चालतो. पचायला जड पदार्थर्ही आपण या दिवसांत चांगल्या पचनशक्तीच्या साहाय्याने नीट पचवू शकतो.
हिवाळ्यात पौष्टिक आहार म्हणून उडदाचे लाडू, डिंकाचे लाडू, आळिवाचे लाडू, मेथीचे लाडू, आल्याच्या वड्या आदी या सगळ्या पदार्थांपासून आपल्याला प्रथिने, लोह, कॅल्शियम सोबतच इतर महत्त्वाचे व्हिटॅमिन व मिनरल्स मिळतात. हिवाळ्याच्या दिवसात हिरव्या पालेभाज्या व इतर भाज्यासुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते तसेच आयर्न व कॅल्शियम सोबतच इतर खनिज तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हिरव्या पालेभाज्या म्हणजे फक्त पालक, मेथी किंवा चवळी या तीन भाज्याच लोक जास्त प्रमाणात खातात, पण दुस-या पालेभाज्या म्हणजे शेपू, मुळ्याची पाने, पातीचा कांदा, बीटरुटची पाने, फुलकोबीची पाने या भाज्यांचा पण आहारात समावेश करावा. शिवाय वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी यांचाही समावेश आहारात करावा.
लहान मुले व स्त्रियांमध्ये आयर्न व कॅल्शियमची बहुधा कमतरता असते, त्यामुळे त्यांनी आपल्या आहारात सर्व भाज्या, पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा. दिवसातला कुठलाही एक आहार जसे नाष्टा, किंवा दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण यापैकी एक पौष्टिक असून चालत नाही तर संपूर्ण दिवसभराचा आहारच पौष्टिक असावा जेणेकरून शरीर सुदृढ राहू शकेल व मन प्रफुल्लीत होईल. कॅल्शियम, आयर्न (लोह) किंवा मल्टिव्हिटॅमिन औषध घेण्यापेक्षा आपल्या आहारात नैसर्गिक स्वरूपात त्याचा समावेश कसा करता येईल, हे आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जाणून घ्यावे. शरीराचे वजन नियंत्रणात ठेवून हिमोग्लोबिन वाढवता येऊ शकतो. या हिवाळ्यात प्रत्येकाने आपल्या आहारात थोडा बदल केला व रोज थोडाफार व्यायाम केला तर नक्कीच हा हिवाळा ऋतू आरोग्यदायी ठरेल.
हिवाळ्यातील
उत्तम आहार
हिवाळ्यात मसाल्याच्या पदार्थांपैकी जिरे, लसूण, मोहरी, सुंठ यांचा आहारातील वापर वाढवावा तसेच दही, दूध, अंडी यांचे सेवन करावे. या ऋतूत भरपूर व्यायाम करावा. गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी यांचे आहारातील प्रमाण वाढवावे. सोयाबीन, डाळी, ड्राय फ्रूटचे प्रमाण वाढवावे. दुधापासून बनवलेले विविध पदार्थ खावेत. विविध प्रकारची उपलब्ध फळे खावीत. या काळात मांसाहारही उत्तम ठरतो. हिवाळ्यात अनेकांची त्वचा फाटते, पायांना भेगा पडतात, ओठ फुटतात. यासाठी कोरडा आहार न घेता दूध, तूप यांचा समावेश असलेला स्निग्ध आहार घ्यावा. आहार या काळात घेताना तो गरम आणि ताजा असा घ्यावा. कारण थंड आहार या दिवसांत त्रासदायक ठरू शकतो. हिवाळ्यात अति थंड पदार्थ खाण्याची सवय ठेवली तर त्यामुळे अनेकांना सर्दी-पडसे, खोकला, वात, अंग जड होणे, सांधेदुखी असे वेगवेगळे त्रास सुरू होऊ शकतात. हिवाळ्यात पाणी पितानाही ते थोडेसे कोमट करून मग प्यावे. माठ किंवा फ्रिजमधील पाणी या काळात टाळावे.