आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए.आर.टी. मुळे रुग्णांचा जीवनकाळ व कार्यक्षमता वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात 2012 मध्ये एच आय व्हीचे सुमारे 2.3 दशलक्ष रुग्ण आढळून आले. जगभरात सुमारे 35.3 दशलक्ष लोक एचआयव्हीसह जगत आहेत. 2005 मध्ये 2.3 दशलक्ष लोक एड्समुळे मृत्यू पावले होते. त्याचे प्रमाण आता कमी होऊन 2012 मध्ये 1.6 दशलक्ष लोक एड्समुळे मृत्यू पावलेले आहेत. (द्वारा - यूएनएड्स ग्लोबल रिपोर्ट- 2013)
भारतामध्ये नवीन एपीडेमिओलॉजीकल डाटा नुसार 2000 मध्ये 2.74 लाख लोक एड्समुळे मरण पावले. त्याचे प्रमाण कमी होऊन 2011 मध्ये 1.16 लाख एवढे झाले. मागील 10 वर्षे भारतामध्ये प्रौढ एच आय व्ही संक्रमण 57 टक्क्यांनी कमी झाले. 2011 मध्ये भारतात एच आय व्हीसह जगणारे 21 लाख लोक आहेत.
भारतामध्ये राष्‍ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (एन.ए.सी.पी.) ए. आर. टी.औषधांमुळे एड्सने होणारे मृत्यूचे प्रमाण 29 टक्क्यांनी घटले आहे. 1990 मधील झिडोओडीन हे पहिले एफडीए मान्यताप्राप्त एड्सवरील औषध आहे. 1996 पर्यंत काही अ‍ॅँटिरेट्रोव्हायरल औषधी व औषधींचे मिश्रण एफडीएद्वारे त्यांना मान्यता प्राप्त झाली. त्यालाच एच. ए.ए.आर.टी. (हार्ट) असे म्हणतात. यामध्ये दोन एन.आर.टी.आय. आणि एक एन. एन.आर.टी.आय. आहे, जे की एचआयव्ही रुग्णांची प्रतिकार क्षमता चांगल्या प्रकारे वाढवतात. पण हे खूप खर्चिक होते. त्यामुळे शासनाने 1992 मध्ये राष्‍ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (नॅको) व राष्‍ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम (एन.ए.सी.पी.) याची भारतात स्थापना करण्यात आली. भारतातील एचआयव्हीचा उद्रेक इतिहासातील एक आव्हान होते. 2006 पासून एन.ए.सी.पी. अंतर्गत ए.आर.टी.ची औषधी व मोफत एच. आय.व्ही. निदान करण्यात येत आहे, तसेच संधिसाधू आजारावर मोफत उपचार करण्यात येतात.
भरपूर प्रकारची ए.आर.टी. औषधी उपलब्ध झाल्याने एच.आय.व्ही. संसर्ग आटोक्यात आणण्यास मदत झाली. एच.आय.व्ही.संसर्ग आवाक्यात आला. परंतु एड्स तज्ज्ञांच्या मतानुसार एच.आय.व्ही. विषाणू विकसित औषधींनादेखील आताच्या घडीला प्रतिकार करत आहेत. याच काळात नवीन ए.आर.टी.ची नवीन औषधी विकसित झाली. जसे की टेनोफोवीर, रिटोनावीर, लोपीनावीर, अ‍ॅटझानावीर इत्यादी औषधी आता रुग्णांना परवडणा-या किमतीत उपलब्ध झाली आहेत. तसेच नॅकोच्या ए.आर.टी. कार्यक्रमांतर्गत दुस-या पायरीवरील औषधी मोफत उपलब्ध झाली आहेत. आता सुमारे 20 प्रकारची ए.आर.टी. औषधी भारतात तसेच जगभरात उपलब्ध आहेत. एच.आय.व्ही या विषाणूला आटोक्यात आणणे संशोधकांना व डॉक्टरांना शक्य झाले आहे. एच. आय.व्ही / एड्स म्हणजे मृत्यू हे समीकरण आता राहिले नाही. एच.आय.व्ही. बाधित रुग्ण हे आता ए.आर.टी.च्या औषधांमुळे सर्वसाधारण आजारांच्या रुग्णांसारखे झाले आहेत. ए.आर.टी.मुळे रुग्णांचा जीवनकाळ व कार्यक्षमता वाढली आहे. त्यासाठी लवकरात लवकर निदान करणे व त्यावर उपचार करणे हे अत्यावश्यक आहे. परंतु दुस-या पायरीवरील औषधींच्या दीर्घकालीन विपरीत परिणामामुळे वय आणि जीवनशैलीशी निगडित असलेले रोग जसे की, मधूमेह, हृदयरोग, कॅन्सर यांचे प्रमाण वाढले आहे. एच.आय.व्हीच्या सुरुवातीच्या काळामध्ये ए.आर.टी. औषधे ही उशिरा चालू केली जायची किंवा सीडी 4 काउंट ज्यावेळेस 200 च्या खाली असेल त्यावेळेस चालू केले जायचे. परंतु आताच्या घडीला ए.आर.टी. कधी चालू करायची यावर अजूनही भिन्न मते आहेत.
आजच्या परिस्थितीत आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सीडी - 4 हा 500 च्या वर असतानाही ए.आर.टी. चालू करावी, असे सांगितले आहे. ज्यामुळे संधिसाधू आजारांची लागण होण्याची शक्यता कमी होते. गर्भवती मातेपासून होणा-या बाळास एच.आय.व्ही. विषाणूंची लागण न होऊ देण्यास ए.आर..टी.ला यश आले आहे. हल्लीच्या काळात एच.आय.व्ही. व्यवस्थापनाचा दृष्टिकोन एड्सपासून मृत्यू प्रतिबंधित करण्यापासून नवीन एच.आय.व्ही. संक्रमण रोखण्याकडे वळला आहे. 2015 पर्यंत संपूर्ण भारतातील एच.आय.व्ही. बाधित रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण हे त्यांच्या वयाची पन्नाशी उलटलेले असतात. हे विचारात घेता रुग्णांचे वाढते वय आणि वाढत्या वयाबरोबरच वाढणारे एच.आय.व्हीचे संक्रमण व संसर्ग यांचा औषधींना होणारा प्रतिकार लक्षात घेता औषधींमध्ये वैज्ञानिकांकडून आणखी सखोल संशोधन होणे अपेक्षित आहे.