आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चष्मा नको? मग लॅसिक लेसर शस्त्रक्रिया करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दृष्टी असेल तर सृष्टी दिसेल हे अगदी खरे आहे. दृष्टिदोषामुळेच मनुष्य आपल्या आसपासचे ज्ञान प्राप्त करू शकतो. जीवनाचा वास्तविक आनंद घेऊ शकतो. जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता, कॉम्प्युटर, दूरदर्शन आणि मोबाइलचा अतिवापर, प्रदूषण या अनेक कारणांनी चष्मा लागतो असे सांगितले जाते, परंतु आनुवंशिकता हेच खरे सर्वात महत्त्वाचे कारण असते. आनुवंशिकता नसतानाही चष्मा लागतो.
सुसंधी वाया जातात : चष्मा लागण्याचे कारण काहीही असो. ज्या वयात आयुष्याची घडी बसवायची असते त्या वयात चष्मा लागला तर ब-याच युवक-युवतींना जीवनातील सुसंधींना मुकावे लागते. पायलट होण्यासाठी सैन्यात आणि नौसेनेत भरती होण्यासाठी नाटक सिनेमा आणि स्पोर्ट्स यामध्ये करिअर करण्यासाठी आणि त्याचबरोबर मुला-मुलींचे लग्न जमण्यासाठी चष्म्यामुळे बरीच अडचण येते.
आपल्याला चष्मा का लावावा लागतो?
मनुष्याचा डोळा हा जवळजवळ कॅमेरासारखे काम करतो. डोळ्यामध्येदेखील कॅमेरासारखेच, परंतु दोन भिंग असतात. एक म्हणजे बुबुळ आणि दुसरा म्हणजे डोळ्याचा आतील भिंग. यापैकी बुबुळ हे सर्वात महत्त्वाचे काम करते. बुबुळामुळे एखाद्या वस्तूकडून येणारे प्रकाशकिरण एकत्रित होऊन दृष्टिपटलावर त्या वस्तूची प्रतिमा तयार होते. मग अशा प्रकारे आपल्याला दिसते. जेव्हा बुबुळ, डोळ्याच्या आतील भिंग आणि डोळ्याची रचना यांच्यात सांगड बसत नाही, त्यावेळेस वस्तूची प्रतिमा ही दृष्टिपटलावर न पडता त्याच्या मागे पडते. त्याला ‘प्लस नंबर’ म्हणतात. जेव्हा ही प्रतिमा दृष्टिपटालाच्या पुढे पडते, त्याला ‘मायनस नंबर’ म्हणतात. हिच गोष्ट कमी दिसणे, डोळ्यांवरील ताण वाढणे, डोळ्यांना थकवा जाणवणे आणि डोकेदुखीला कारणीभूत ठरते. या त्रासापासून सुटका होण्यासाठी आपल्याला चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याची गरज भासते. येथे नमूद करावेसे वाटते की कोणत्याही औषधाने, व्यायामाने किंवा तथाकथित काही उपाचाराने चष्म्याचा नंबर कमी करता येत नाही. चष्मा नकोच असेल तर लॅसिक लेसर शस्त्रक्रिया करून घेणे गरजेचे असते.
अशी होते शस्त्रक्रिया : या शस्त्रक्रियेत ‘मायक्रोकेरॅटोम’ यंत्राच्या साह्याने बुबुळावरील अतिशय पातळ आवरण बाजूला सारून त्याखालील भागावर लेसर किरणांच्या साह्याने सूक्ष्म प्रमाणात बुबुळाची गोलाई बदलली जाते. त्यानंतर बाजूला केलेले आवरण पुन्हा त्याच जागेवर बसवले जाते. शस्त्रक्रियेनंतर वस्तूची प्रतिमा बरोबर दृष्टिपटलावर पडेल अशा प्रकारे चष्म्याचा नंबर घालविता येतो. रुग्णास सुंदर दृष्टी प्राप्त होते. दोन्ही डोळ्यांवर एकाच वेळेस हा उपचार करता येतो. साधारणत: 10-15 मिनिटांच्या कालावधीत ही वेदनारहित शस्त्रक्रिया पूर्ण होते. रुग्ण लगेचच घरी जाऊ शकतो. लेसर किरणांच्या साहाय्याने बुबुळाच्या आकरात केलेला बदल हा अतिशय सूक्ष्म असल्यामुळे उघड्या डोळ्यांनी इतर कुणाच्याही ते लक्षात येत नाही.
शस्त्रक्रियेचा लाभ कुणाला घेता येतो?
साधारणत: चष्म्याचा नंबर 18 व्या वर्षी स्थिर होतो. ज्यांचे वय 18 पेक्षा जास्त आहे त्यांना ही शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते. काही रुग्णामध्ये एका डोळ्यांची नजर पूर्णत: सामान्य असते, परंतु दुस-या डोळ्यात खूपच मोठ्या चष्म्याचा नंबर असतो. अशा रुग्णांनी वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी देखील शस्त्रक्रिया केली तरी चालते. वयाची चाळिशी ओलांडलेल्या व्यक्तींचा दूरच्या चष्म्याचा नंबर जरी कमी झाला तरी लिखाण-वाचनाशी जवळचा चष्मा वापरणे गरजेचे असते. अशा व्यक्तींनी सर्व बाबींचा विचार करून संबंधित नेत्रतज्ज्ञांचा सल्लामसलत करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेणे योग्य ठरेल.
कोणत्या व्यक्तींना या शस्त्रक्रियेचा लाभ घेता येत नाही
* ज्या व्यक्तींचा चष्म्याचा नंबर वयाच्या 18 व्या वर्षानंतरही स्थिर राहत नाही.
* ज्यांच्या डोळ्यात अश्रूंचे प्रमाण कमी आहे.
* ज्यांच्या डोळ्यात केरॅटोकोनस किंवा इतर काही बुबुळाचे आजार आहेत.
* ज्यांच्या डोळ्यात बुबुळ अतिशय पातळ आहे.
* काचबिंदू किंवा डोळ्याचे इतर आजार असल्यास ही शस्त्रक्रिया टाळावी.
* मधुमेह, संधिवाताच्या रुग्णांनी तसेच गरोदरपणात स्त्रियांनी ही शस्त्रक्रिया टाळावी.