आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Shashikant Gajare's Artical On Human Organ Plantation

अवयव उपलब्ध न झाल्यामुळे दररोज 15 लोक मृत्यू पावतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्यारोपणाचे तीन प्रकार, सर्वप्रथम 1963 मध्ये कोलोरॅडो विद्यापीठात यकृत प्रत्यारोपण
अवयव प्रत्यारोपणाचे तीन मूलभूत प्रकार आहेत. जिवंत संबंधित यामध्ये जवळच्या स्त्री किंवा पुरुष नातेवाइकाकडून व्यक्तीला अवयव दिला जातो. जिवंत असंबंधित यामध्ये अनुरूप असलेल्या कोणत्याही दात्याकडून व्यक्तीला अवयव दिला जातो. मृत- यामध्ये एक मृत, अधिक स्पष्टपणे मस्तिष्क मृत (मेंदू- मृत) व्यक्तीकडून व्यक्तीला अवयव दिला जातो. यकृत प्रत्यारोपणाची सर्वात पहिली शस्त्रक्रिया 1963 मध्ये कोलोरॅडो विद्यापीठात डॉ. थॉमस स्टाइल यांनी केली. सध्या अमेरिका आणि कॅनडा या देशामध्ये 76,000 पेक्षा जास्त स्त्री, पुरुष व बालके जीव वाचवण्यासाठी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक तेराव्या मिनिटाला या यादीत एका नवीन नावाचा समावेश होतो. रोज सरासरी 15 लोक अवयव उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यू पावतात. भारतात प्रत्येक वर्षी तीन ते साडेतीन लाख लोक मूत्रपिंड निकामी होण्याने मृत्युमुखी पडतात. शरीरातील अनावश्यक गोष्टीची विल्हेवाट लावणे, मूत्र निर्मिती करणे, हाडे बळकट करणे, रक्तपेशी तयार करणे यासारखे अति महत्त्वाचे कार्य मूत्रपिंडाचे असतात.
डायलिसिस अंशत: परिणामकारक... दर महिन्याला अंदाजे जास्तीत जास्त 20 ते 25 हजार खर्च :
किडनी निकामी झाल्यावर आयुष्यभर डायलिसिसवर राहणे किंवा मूत्रपिंड बदलून दुस-या मूत्रपिंडाचे रोपण करणे, असे दोन मार्गच असतात. डायलिसिस हा उपचार अंशत:च परिणामकारक असतो. शिवाय बराच खर्चिकही आहे. या उपचारासाठी दर महिन्याला अंदाजे जास्तीत जास्त 20 ते 25 हजार खर्च येऊ शकतो. या उपचारानंतर रुग्ण पुन्हा पूर्वीसारखेच चांगले आयुष्य जगू शकेल ,अशीही खात्री नसते.
मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रियेनंतर व्यक्ती पूर्ववत आयुष्य जगू शकते. म्हणूनच या आजाराच्या शेवटच्या पायरीला असलेल्या व्यक्तीसाठी मूत्रपिंडरोपण हाच पर्याय वैद्यकीय क्षेत्रात भरवशाचा मानला जातो. या रोपण शस्त्रक्रियेसाठी साधारणत: दोन ते तीन लाख इतका खर्च येतो. तसेच पहिल्या वर्षी औषधोपचारासाठी जवळपास इतकाच खर्च येतो. मूत्रपिंड रोपण यशस्वी झाल्यानंतर हा खर्च दर महिन्याला दोन ते तीन हजार इतका खालीही येतो. जिवंत व्यक्ती आपल्या अवयवाचे दान करू शकते. एका मूत्रपिंडाचे दान करूनही दुस-या निरोगी मूत्रपिंडाच्या आधारे सर्वसामान्य आयुष्य जगता येते. काही वेळा यकृताचा किंवा स्वादुपिंड ग्रंथीचा एक भाग दान करून एखाद्या जवळच्या मित्राला किंवा कुटुंबीयाला दीर्घायुष्य मिळवून देता येते. रक्त, अस्थी आणि अस्थिमज्जा यांचेही दान करता येते. यासाठी दानपत्राची आवश्यकता नसते. मृत व्यक्तीचे मूत्रपिंड वापरले जाण्याचे प्रमाण भारतात अजूनही अत्यल्पच आहे. मृतवत व्यक्ती (मस्तिष्क - मृत) म्हणजेच ब्रेन डेड म्हणून घोषित केलेली व्यक्ती, अशा व्यक्तीची कार्यक्षम इंद्रिये काढून घेऊन ती ज्या रुग्णांचा आजार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे, त्याच्यात बसविली जाते.
मृतांच्या अवयवांचा उपयोग...
मस्तिष्क मृत ही अशी अंतिम अवस्था आहे की, ज्यामध्ये गाढ बेशुद्धावस्थेत असलेला रुग्ण पुन्हा कधीच सचेतन होत नाही. त्याची हृदयक्रिया व रक्ताभिसरण कृत्रिम पद्धतीने चालू ठेवलेले असते. बाकी सर्व प्रकारे वैद्यकीयदृष्ट्या तो मृतच असतो. ज्याक्षणी रुग्णालयातील कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरवणारे यंत्र बंद केले जाते त्याक्षणी तो पूर्णपणे अचेतच होतो. हा प्रसंग रुग्णालयातील अतिदक्षता विभागात संचलित वातावरणात घडत असल्यामुळे अशा मृताचे बहुतेक सर्व अवयव यशस्वीपणे काढून घेऊन त्याचा प्रत्यारोपणासाठी उपयोग करता येतो. एखादी व्यक्ती मस्तिष्क मृत झाल्याचे सरकारने शिफारस केलेल्या समितीचे सदस्य असलेल्या या उपचारात सहभागी न झालेल्या दुस-या एखाद्या रुग्णालयातील डॉक्टरांचा एक गट मस्तिष्क मृत झाल्याचा निर्णय देतो. हे डॉक्टर काही विशिष्ट चाचण्यांची मालिका वापरून त्यानंतरच हा रुग्ण खात्रीशीरपणे मस्तिष्क मृत झाल्याचा निर्णय देतात. यासाठी जगभर नैतिक आणि वैद्यकीयदृष्ट्या सर्वसामान्य असलेली अत्यंत काटेकोर प्रणाली आहे. अशा मृतवत व्यक्तीच्या नातलगांच्या संमतीनेच त्या व्यक्तीच्या अवयवांचे अन्यत्र रोपण केले जाते. अवयव प्रत्यारोपणाच्या कामी सर्वात मोठा अडथळा म्हणजे दान केल्या जाणा-या अवयवांची कमतरता आणि त्याचा वेळच्या वेळी पुरवठा न होणे. तसेच अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेल्या अद्ययावत यंत्रणेचा व तज्ज्ञांचा अभाव.
किशोरही करू शकतो अवयवदान...परंतु पालकाच्या संमतीनेच :
अवयव दान कोणीही करू शकतात. त्यासाठी फक्त तशी इच्छा असणे गरजेचे आहे. 18 वर्षे वयाच्या आतील किशोरही दान करू शकतात, परंतु पालकांच्या किंवा कायदेशीररीत्या जबाबदार व्यक्तीच्या संमतीनेच अवयवदाता होण्यासाठी फक्त दानपत्रावर स्वाक्षरी करून ते सतत पाकिटात घालून बरोबर बाळगावे लागेल, जेणेकरून तुमच्या मृत्यूनंतर कोणीतरी रुग्णालयाला त्याविषयी कल्पना देईल.अवयवदान करण्याची कोणतीही सक्ती नाही. तुमचा विचार बदलला तर फक्त स्वाक्षरी केलेले पत्र फाडून टाकावे अवयव दानाचा मार्ग तुम्ही कोणत्या कारणास्तव स्वीकारला आहे, याविषयी कुटुंबीयांशी चर्चा करणे गरजेचे असते. त्यांना पटवून देण्यासाठी मित्र, आप्त, धार्मिक अधिकारी तसेच समाजसेवकांची मदत घ्यावी. कोणताही धर्म, अवयव दानाच्या आड येत नाही. कारण यात फक्त इतरांना मदत केली जाते. अगदी थोड्या धर्मांमध्ये मात्र हा निर्णय ज्या त्या व्यक्तीवरच सोपवला जातो.
अवयव विकण्याची परवानगी नाही :
अवयव दानाची इच्छा, तसेच कुटुंबीयांचा सल्ला घेणे फारच महत्त्वाचे आहे. कारण हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. अवयव काढून घेण्याच्या प्रक्रियेसाठी कोणताही खर्च द्यावा लागत नाही. शरीराचे रूप बदलत नाही, साधारणपणे कपड्यांनी झाकल्या जाणा-या भागावर छेद घेतले जातात. अवयव दानामुळे शरीराच्या अंतिम संस्कारात कोणतीही बाधा येत नाही. अवयव विकण्याची परवानगी नाही. मानवीय अवयव प्रत्यारोपणाच्या 1994 च्या कायद्यानुसार अवयवांचा व्यापार करण्याची सक्त मनाई आहे.
भारतात उदासीनता.... - मस्तिष्क मृत (ब्रेन डेड)चे निदान झाल्यावर अवयवदाता होऊ शकणारी व्यक्ती निश्चित केली जाते. अवयवदात्याच्या कुटुंबीयांकडून संमती घेतली जाते. त्यानंतरच अवयव काढले जातात. ते योग्य प्रकारे संरक्षित करून आवश्यकतेनुसार त्यांचे रोपण केले जाते.
जगभरात संकल्पना मान्य :
शस्त्रक्रियेनंतर आवश्यक त्या सर्व गोष्टी नियंत्रणाखाली ठेवण्यात येतात. मृत व्यक्तीच्या अवयव दानाबद्दल आज जगभरातही संकल्पना चांगलीच मूळ पकडत असली तरी सध्या भारतात मात्र या संदर्भात उदासीनताच आहे. भारतात ही कल्पना मूळ न धरण्यामागे काही अडथळे आहेत. यात सामान्य जनतेत अवयव रोपणासंबंधात अत्यंत कमी जाणीव. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक बाबी व आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव.
मरावे परी अवयवरूपी उरावे :
भारतात दरवर्षी होणा-या प्राणघातक अपघातांमध्ये साधारणत: 8 ते 9 हजार लोक मृत्युमुखी पडतात. हे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. यापैकी देशाच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कुठल्या ना कुठल्या अतिदक्षता विभागात 8 ते 9 ब्रेन डेड व्यक्ती आढळतात. या वक्ती तिथल्या तिथं असणारी अवयवांची गरज सहजतेने पूर्ण करू शकतात. अवयव निकामी होण्याने मृत्युपंथाला लागलेल्या अनेक व्यक्तींना, एक मृत व्यक्ती चांगल्या आयुष्याचे दान देऊ शकतो. प्रत्येक मृतवत व्यक्तीच्या शरीरातून हृदय, फुप्फुसे, यकृत, स्वादुपिंड, दोन मूत्रपिंड आणि दोन डोळ्यांचे बाह्यपटल इतके अवयव कार्यक्षम स्थितीत काढता येऊ शकतात. मरावे परी अवयवरूपी उरावे, असेही म्हटले जाते. सप्टेंबर 2000 मध्ये अहमदाबाद येथील इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसिसेज व रिसर्च सेंटर सिव्हिल हॉस्पिटल येथे मस्तिष्क मृत लहान मुलांच्या दोन्ही किडनी काढून लहान मुलीला यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्यात आलेले आहे.
’’ Don’t take your organs to heaven for god knows they are needed here’’
एकाकडून सहा जणांना जीवदान
मृतवत व्यक्ती त्याचबरोबर कोणीही जिवंत व्यक्ती अवयवदान करू शकतात. अशी जागृती समाजात मोठ्या प्रमाणात घडवून आणणे ही आता सर्वात मोठी निकडीची गोष्ट आहे. याची तातडी लोकांना जाणवणे, गैरसमजुतींना फाटा देणे आणि मृत्यूनंतरच्या या श्रेष्ठदानाला प्रत्येकाने सिद्ध होणे, हीच आता काळाची गरज आहे. एक अवयवदाता इतर सहा जणांचे जीव वाचवू शकतो. एवढेच नव्हे तर वैद्यकीय शास्त्र व संशोधन कार्यासाठी संपूर्ण देहदान करणे शक्य असते. त्यामुळे वैद्यकीय संशोधकांना वेगवेगळे रोग, त्यावरील औषधे व उपचार पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणून जीव वाचविण्याच्या कार्यासाठी ज्ञान अवगत होऊ शकते.