आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञानाचा ध्‍वनी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्णबधिरत्वामुळे जगण्यातला आवाज हरवून बसलेल्या लोकांच्या जीवनात आशेचा नवा आवाज ओतणारं एक संशोधन यशस्वी झालं आहे. संगणकीय विज्ञान, वैद्यकीय विज्ञान व अभियांत्रिकी या विज्ञानतंत्रज्ञानाच्या सहयोगाने हे संशोधन सिद्ध झाले, हे या संशोधनाचे वैशिष्ट्य. मेलबर्न विद्यापीठातील कान-नाक-घशाचे शल्यचिकित्सक
डॉ. ग्रॅहम क्लार्क, युरोपीय महिला इंजिनिअर इनेबोर्ग हॉशमेयर व अमेरिकतील ड्युक विद्यापीठाचे ‘स्पीच सायंटिस्ट’ (वाचातज्ज्ञ) ब्लेक विल्सन या तिघांनी या संशोधनाचे तीन पेड विणले. ‘एकमेका साह्य करू, धरू विज्ञान पंथ’ असे म्हणत या तिघांनी मिळून ‘कॉक्लियर इंप्लांट’ या उपकरणाची निर्मिती केली. आज त्याचा जगभरच्या कर्णबधिरांना उपयोग होत आहे.
कर्णावर्त
बाहेरचा, मधला व आतला असे कानाचे तीन भाग. आतल्या कानात शंखाकृती कर्णावर्त ‘कॉक्लिया’ असतो. या कर्णावर्तात पाण्यासारखा पदार्थ असतो. यात केशपेशी तरंगतात. या केशपेशींपासून निघणारे संवेदनतंतू ‘ऑडिटरी नर्व्ह’ पर्यंत (श्रवणमज्जातंतू) जातात. हे श्रवणमज्जातंतू मग ध्वनीचे संदेश मेंदूतील ऐकण्याच्या केंद्रापर्यंत घेऊन जातात. ध्वनिलहरी कानाच्या पडद्यावर आदळतात. पडदा हलतो. ती स्पंदने केशपेशींपर्यंत पोहोचतात. तरंगणा-या केशपेशी थरथरतात. त्यात निर्माण होणारे विद्युतसंदेश श्रवणमज्जातंतूमार्फतच पुन्हा मेंदूतील ऐकण्याच्या केंद्रापर्यंत जातात. अशा त-हेने आपल्याला ऐकूयेते. ध्वनिलहरी जशाच्या तशा मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत. ध्वनिलहरींचे रूपांतर ‘मेकॅनो-इलेक्ट्रिकल’ संदेशात होते. ध्वनिलहरींमुळे केशपेशींचे थरथरणे हा ‘मेकॅनो’ भाग झाला; तर त्यात विद्युत संदेश तयार होणे, हा इलेक्ट्रिकल भाग. हे विद्युतसंदेश मेंदूपर्यंत पोहोचतात. यातील ध्वनिलहरींचे मेकॅनो-इलेक्ट्रिकल संदेशात रूपांतर होते, हा कळीचा मुद्दा संशोधकांनी हेरला, हे महत्त्वाचे. ज्यांना हिअरिंग एड (श्रवणयंत्र) वापरूनसुद्धा ऐकू येत नाही, ज्यांच्या कर्णावर्ताच्या केशपेशी काम करत नाहीत; पण ज्यांचा श्रवणमज्जातंतू व्यवस्थित काम करतो, फक्त अशाच कर्णबधिरांना ‘कॉक्लीयर इम्प्लांट’चा उपयोग होऊ शकतो, हे मात्र इथे लक्षात ठेवले पाहिजे.
रुग्णांचे साहाय्य
1957 मध्ये पॅरिस येथील एका शल्यचिकित्सकाने एका कर्णबधिर माणसाचा श्रवणमज्जातंतू मेंदूत इलेक्ट्रोड घालून विजेने उद्दीपित-विद्युपित केला, तेव्हा त्या माणसाला ढोबळमानाने काही आवाज ऐकू आले. ही बातमी अमेरिकेतील एका कर्णबधिर व्यक्तीने ‘लॉस एंजलिस टाइम्स’मध्ये वाचली. तो ही बातमी घेऊन डॉ. विल्यम हाउस या कान-नाक-घशाच्या शल्यचिकित्सकाकडे गेला. डॉ. हाउस यांनी 1960च्या सुमारास एका तारेचा इलेक्ट्रोड कर्णावर्तातून श्रवणमज्जातंतूपर्यंत सरकवून विद्युपित केला. रुग्णाला ढोबळ आवाज ऐकू आले. ‘मेंदूला इजा होईल, कानाला/ मेंदूला जंतुसंसर्ग होईल’, अशा शंका इतर डॉक्टरांनी काढल्या. डॉ. हाउस यांच्यावर बरीच टीकाही झाली. पण सुरू झालेले संशोधन थांबले नाही. सुरुवातीच्या काळात युरोप व अमेरिकेतील कर्णबधिरांनी कर्णवैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेत हजारो तास उपकरणांसमोर बसून श्रवणमज्जातंतू विद्युपित करण्याच्या संशोधनाला साहाय्य केले; म्हणून आजचे यश दिसते आहे, असे पुरस्कार विजेत्या संशोधकांनी सांगितले आहे. कर्णबधिरांचे हे साहाय्य वैज्ञानिक विसरलेले नाहीत.
युरोपातील व्हिएन्ना येथे राहणारे कॉनी व तिचा भाऊ दोघेही कर्णबधिर. महिला इंजिनिअर हॉशमेयर यांना कॉनीने सांगितले, ‘माझ्यावर कॉक्लियर इम्प्लांट करा, मी तुमच्या प्रयोगशाळेत माझ्यावर प्रयोग करून घेण्यासाठी रोज येईन.’ कॉनीवर कॉक्लियर इम्प्लांट करण्यात आले. प्रयोगासाठी हजर राहण्याचा शब्द तिने आजपर्यंत पाळला आहे.
उपकरणाची निर्धोकता
श्रवणमज्जातंतू सतत विद्युपित केल्यामुळे त्याच्यावर कोणते परिणाम होतील? यावरसुद्धा संशोधन झाले. उपकरणाची जैविक सुरक्षितता सर्व बाजूंनी तपासण्यात आली. हे उपकरण जीवनभर वापरायचे असल्यामुळे, अनेक अंगांनी हे उपकरण तावून-सुलाखून घेतले गेले. म्हणून असे संशोधन प्रत्यक्षात येण्यात बराच काळ जातो.
कॉक्लियर इम्प्लांट
गुडघ्याचा सांधा बदलून नवा सांधा घालतात, तसा कॉक्लियर इम्प्लांट नसतो. कॉक्लियर इम्प्लांटमध्ये नवा कर्णावर्त कानात घालत नाहीत. ‘कॉक्लियर इम्प्लांट’ हा उपकरणांचा समूह असतो. मायक्रोफोन, स्पीच प्रोसेसर, रिसीव्हर, ट्रान्समिटर व इलेक्ट्रोड अ‍ॅरे असे कॉक्लियर इम्प्लांटचे भाग आहेत. यातील इलेक्ट्रोड कर्णावर्तातून श्रवणमज्जातंतूपर्यंत जातात. हे इलेक्ट्रोड निर्जंतुक केलेले असतात. इलेक्ट्रोड शस्त्रक्रियेने कर्णावर्तात घालायचे असतात. ही कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया कान-नाक-घशाचे शल्यचिकित्सक करतात. बाकीचे भाग बाहेर कानाच्या मागे बसवलेले असतात. मायक्रोफोनमधून ध्वनिलहरी रिसीव्हरमध्ये व स्पीच प्रोसेसरमधून ट्रान्समिटरमध्ये येतात. या मार्गात ध्वनिलहरींचे विद्युत संदेशात रूपांतर होऊन, ते अनेक इलेक्ट्रोडद्वारे कर्णावर्तातून श्रवणमज्जातंतूद्वारे मेंदूतील ऐकण्याच्या केंद्रात पोहोचतात. अशा त-हेने कॉक्लियर इम्प्लांट वापरून व्यक्तीला ऐकू येते. ऐकण्याच्या ‘क्वालिटी’मध्ये सुधारणेला अजूनही खूप वाव आहे. जशी इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रगती होईल तशी श्रवणाची क्वालिटी सुधारेल, असा संशोधकांचा विश्वास आहे.
dranand5@yahoo.co.in