आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यभान कशासाठी? कोणासाठी?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक काळ होता, जेव्हा रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांसाठी आरोग्य शिक्षणाची मोठी गरज वाटायची. ‘मलेरिया-लक्षणे व उपचार’, ‘डोळ्यांची निगा’, ‘बाळाची काळजी’, ‘आला उन्हाळा, तब्येत सांभाळा’ असे लेख मोठ्या चवीने वाचले जायचे. पण आता माहिती-तंत्रज्ञान क्रांतीमुळे खरे तर तुम्ही म्हणाल त्या आजारावर डॉ. गुगल हा 24 तास ऑन कॉल असलेला डॉक्टर विनामूल्य तुमच्या सेवेत उपलब्ध असतो. प्रत्येक आजारावर काही लाख पाने उपलब्ध असताना मग आरोग्यासाठी वाहिलेला एक स्तंभ कशासाठी, असे प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे.
सध्या डॉक्टरांसमोर येणारे रुग्ण दोन टोकांच्या मतप्रवाहाचे आढळून येतात. एक म्हणजे ‘डॉ. गुगल’चे खास पेशंट; जे के बिनमध्ये येताना हातात डाऊनलोड केलेली माहिती आणि प्रश्न घेऊनच येतात. आणि दुसरे म्हणजे ग्रामीण अशिक्षित रुग्ण; जे अंधविश्वासाने आपला देह डॉक्टरांना अर्पण करतात. बरे या दोघांना उपदेश करणारा डॉक्टर तरी कुठे सर्वज्ञ असतो? तोही दर रुग्णागणिक शिकतच असतो. वैद्यकीय व्यवसायाला ‘प्रॅक्टिस’ का म्हणतात, हे मला प्रॅक्टिस सुरू केल्यावरच कळले. एक इंग्रजी सुभाषित असे सुचवते की, तुम्ही एमबीबीएस झाल्यावर तुम्हाला वाटते की तुम्हाला आता सगळे येते. तुम्ही एमडी झाल्यावर तुम्हाला कळते की तुम्हाला इतर डॉक्टरांच्या मानाने काहीच येत नाही. आणि तुम्ही डी. एम. झाल्यावर लक्षात येते की इतरांनाही काही येत नाही. थोडक्यात, वैद्यकीय क्षेत्र असे क्षेत्र आहे जिथे देणारा आणि घेणारा दोघेही अपूर्ण असतात आणि जमेल तितके पूर्णत्व मिळवण्यासाठीच या स्तंभाचे प्रयोजन केले आहे.
वैद्यकीय शिक्षण, संशोधन व तंत्रज्ञानामुळे झालेल्या माहितीच्या स्फोटामुळे आजारांचे, आरोग्य समस्यांचे प्रमाण तसूभरही कमी झालेले नाही. रुग्णांना मिळणारी अर्धवट माहिती ‘नीम हकीम खतरे जान’ म्हणजे मारकच ठरते आहे. इंटरनेटवरून माहिती मिळवून किंवा जाहिराती बघून डॉक्टरकडे जाणे म्हणजे चॅट करून, प्रत्यक्ष न भेटताच एखाद्या मुलीशी विवाह ठरवण्यासारखे आहे. या माहितीवंत रुग्णासारखाच अंधविश्वासाने डॉक्टरकडे जाणारा अडाणी रुग्णही तितकाच फसवला जातो आहे. कारण आमच्याकडे माहिती आहे; पण त्या आजारांविषयीचे, आरोग्य समस्यांविषयीचे भान आमच्याकडे नाही. आरोग्याविषयीचे हेच भान या स्तंभातून आपण सगळे विकसित करणार आहोत. या स्तंभात आपल्याला 100 टक्के माहिती, विचार, भान मिळेल हे सांगता येणार नाही; पण आरोग्यभान मिळवण्याची सुरुवात नक्की होऊ शकेल. प्रत्येक जण डॉक्टरकडे खूप मोठ्या अपेक्षा घेऊन येत असतो. गंभीर रुग्णाला बरे होण्याची हमी देणे म्हणजे साक्षात परमात्म्यालाच चॅलेंज करणे. मुळात जगात केवळ 86 आजारांवरच हमखास औषध उपलब्ध असताना डॉक्टर तरी काय वेगळे करणार? पण ‘बाबा रे! फक्त 86 आजारांवरच औषध उपलब्ध आहे.’ ही जाणीव करून देणे म्हणजे आरोग्यभान. उरलेल्या आजारांवर औषध आहे, आरोग्यभान.
सहसा प्रवासात डॉक्टर म्हणून ओळख दिली की सहप्रवाशाच्या प्रश्नांचा असा काही भडिमार होतो, की जणू काही मी भूतलावर आता शेवटचा डॉक्टर उरलो आहे. हाच रुग्ण जेव्हा फी भरून कन्सल्टिंग रूममध्ये येतो, तेव्हा वेगळाच असतो. तेव्हा त्याला कुठलेही आरोग्यज्ञान नको असते; त्याला हवे असते फक्त प्रिस्क्रिप्शन. मी एका ज्येष्ठ डॉक्टरांना त्यांच्या यशस्वी प्रॅक्टिसचे रहस्य विचारले. त्यांनी सांगितले, यशस्वी प्रॅक्टिशनर व्हायचे असेल तर रुग्णांचे त्या क्षणाचे प्रॉब्लेम फक्त सोडव; पेशंटच्या फार भानगडीत पडू नकोस. या ‘भानगडी’ म्हणजे नेमके काय? रुग्ण डॉक्टरकडे येऊन औषध घेऊन जातो, या घटनेमागे या रुग्णाच्या आरोग्य शिक्षणापलीकडे त्याची आर्थिक घडी, औषधांच्या किमती, त्या गावातील सरकारी दवाखान्याची गत, न ओळखता आलेली साथ, खासगी डॉक्टरांचे त्या आजाराबद्दलचे ज्ञान, शासनाचे त्या आजाराबद्दलचे धोरण अशा ब-याच ‘भानगडी’ लपलेल्या असतात; पण या गोष्टींची फारशी चर्चा होतच नाही. झाली तरी ती दबक्या आवाजात होते. ही चर्चा या स्तंभातून घडवून आणायची आहे.
चर्चेच्या ओघात वैद्यकीय क्षेत्रातील कुप्रथांवर आसूड ओढण्याचे कामही आपल्याला या स्तंभातून करायचे आहे. त्याबद्दल कुणी नकारात्मक विचार करू नये. कारण हुशार विद्यार्थ्याच्या एखाद-दुस-या दुर्गुणांबद्दल त्याचे आई-वडील त्याला टोचत असतात. तो अजून मोठा व्हावा, एवढाच त्यांचा हेतू असतो. आपली टोचणी अशीच सकारात्मक असणार आहे. यावरून सगळे वैद्यकीय क्षेत्रच काळवंडले आहे, असा विचार करू नये. कारण ‘तुम्ही इथे सांगितले ते तसेच स्वीकारण्यासाठी नाही, त्यावर प्रश्न उपस्थित करण्यासाठी आहात’, हा वैद्यकीय शिक्षणाचा मूळ गाभा आहे. हा ‘स्तंभ वाचा आणि आयुष्य वाढवा’ असा मार्केटिंगबाज दावा मुळीच करणार नाही; पण या ‘आरोग्यभाना’तून आपले आयुष्य निरामय होईल, एवढे नक्की!
amolaannadate@yahoo.co.in
( वैद्यक व्यावसायिक , सामाजिक नि आरोग्यविषयक प्रश्नांचे जाणकार.)