आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉरिच-एक विलक्षण साहित्यनगरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वेळेला इंग्लंडला आलो की नॉरिच ही साहित्यनगरी बघायचीच, असं ठरवलं होतं. तसा योग नुकताच आला. आम्ही राहत होतो इंग्लंडच्या उत्तर भागात. नॉरिच दक्षिण भागात. पण दक्षिण भागात आलो होतो, त्यामुळं वाकडी वाट करून नॉरिचला जाणं शक्य होतं. इथं डोंगर नाहीत; जमीन पसरली आहे सरळ समुद्रापर्यंत. एक्स्प्रेस-वे नाही, रस्ते दुहेरी किंवा एकेरी वाहतुकीचे. आजूबाजूला राखून ठेवलेलं वन आहे. नॉरिचकडे जाणारा रस्ता त्याच्या बगलेतून जातो. पण एवढा नॉरिचला जाण्याचा अट्टहास कशासाठी? त्याला कारणही तसंच झालं. ‘न्यू स्टेट्समन’मध्ये नॉरिचवरचा लेख वाचला.
युनेस्कोनं ‘नॉरिच-सिटी ऑफ लिटरेचर’ असं 2012मध्ये घोषित केलं होतं. युनेस्कोनं सहा साहित्यनगरी घोषित केल्या आहेत. एडिंबरा, मेलबर्न, डब्लिन, अयोवा सिटी, रेज्विक आणि नॉरिच ही सहावी नगरी. हा
मान लंडनलासुद्धा मिळालेला नाही. एडिंबरा, डब्लिन, मेलबर्न या नगरी पाहिल्या होत्या. नॉरिच आज नजरेनं वाचणार होतो.
गेली 900 वर्षं नॉरिचला साहित्याची परंपरा आहे. ही विविध कल्पनांच्या निर्मितीची नगरी. इथे शब्दांच्या शक्तीनं जनजीवन बदललं. पार्लमेंटरी डेमॉक्रसीची सुरुवात इथं झाली. क्रांतीसाठी लागणा-या विचारांचा विस्तव इथं फुलला. गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याच्या झगड्यात या नगरीनं अहमहमिकेनं भाग घेतला. साहित्यिक कलेचे रूप पालटण्याचे प्रयत्न या नगरीत निरंतर चालू असतात. पुस्तक प्रकाशनासाठी हा केंद्रबिंदू. नॉरिचचे नागरिक ‘कल्चर-संस्कृती’साठी ब्रिटनमधील इतर शहरांपेक्षा जास्त खर्च करतात. कवी, कादंबरीकार, चरित्रलेखक, नाटककार असे साहित्यिक यांचे अंतिमस्थान नॉरिच नगरी असतं. लेखक म्हणजे परिवर्तनाचा पाईक. त्याच्या स्वागतासाठी नॉरिच सदैव तयार.
1395मध्ये ज्युलियन या महिलेनं इंग्लिशमधील पहिलं पुस्तक लिहिलं नॉरिचमध्ये. तो काळ होता प्लेगच्या साथीचा, युद्धाचा, आणि धार्मिक तंट्याचा. त्या काळातील घटनांनी व्यथित होऊन, सखोल चिंतन-मननानं तिला वैश्विक प्रेम आणि आशा यांचा प्रकाश दिसला. तो तिनं ‘रिव्हिलेशन्स ऑफ डिव्हाइन लव्ह’ या पुस्तकात शब्दबद्ध केला. 16व्या शतकातील ‘ब्लॅक व्हर्स’ या प्रकारातील पहिली कविता हेन्री हॉवर्डनं इथंच लिहिली. 1701मध्ये वर्तमानपत्र प्रकाशित झालं इथूनच. 1970मध्ये ‘यूके’मधील पहिला ‘क्रिएटिव्ह रायटिंगचा’ एम. ए.चा अभ्यासक्रम नॉरिचच्या ईस्ट अँग्लिया विद्यापीठात माल्कम ब्रॅडबरी व अँगस विल्सन या दोन लेखकांनी सुरू केला. आजचा मॅनबुकर मिळवणारा आयन मॅकइवान हा या अभ्यासक्रमाचा पहिला पदवीधारक.
परंपरा आणि नवता या एकमेकांच्या विरोधात असतात, असा सर्वसाधारण समज; पण मला येथे यांचा संगम दिसतो. येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या संस्था नवीन परंपरा निर्माण करताना दिसतात. परंपरा म्हणजे फक्त जुन्याला धरून राहणे नव्हे, तर गुणवत्तेला ओळखून त्याला वाव देण्याची परंपरा जोपासणे. परंपरा व व्यक्तिस्वातंत्र्य हातात हात घालून जात नाही, असाही एक समज. पण परंपरा कशा तयार होतात, हे खोलात जाऊन पाहिलं तर या समजाला धक्का बसतो. परंपरा तयार होत असताना त्यात वेळोवेळी सूक्ष्म बदल होत असतात. हे बदल व्यक्तींनीच केलेले असतात. व्यक्तिस्वातंत्र्याचा अदृश्य हात सतत काम करत असतो. परंपरेचा योग्य वापर केला तर व्यक्तीची मुस्कटदाबी न होता व्यक्तीच्या कौशल्याला वाव मिळतो. हेच तर खरं परंपरेचं सौंदर्य असतं.
1608मध्ये पहिलं जिल्हा ग्रंथालय नॉरिचमध्ये स्थापलं. पहिला ‘पब्लिक लायब्ररी अ‍ॅक्ट’ 1850मध्ये नॉरिचमध्ये अमलात आणला गेला. नॉरिच येथील कॅथिड्रल ग्रंथालयात 1500 सालापासूनचे ग्रंथोबा संशोधकांसाठी उपलब्ध आहेत. जोन इनेस केंद्रात जैवविज्ञानाचा व इतर दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आहे. ही झाली परंपरा.
आज नॉरिचच्या मध्यवर्ती भागात मॉलसारखी आकर्षक पारदर्शक वास्तू उभी आहे, धावते जिने वगैरे. मी तिथं गेलो. माझा विश्वास बसेना, ते आहे मिलेनियम ग्रंथालय. आधुनिक वाचकाला आकर्षित करण्यासाठी ग्रंथालयाचं बाह्यरूप बदलेलं आहे. पण आत संगणकीय यंत्रणा, इंटरनेट, वाय-फायबरोबर हजारो पुस्तके, नियतकालिके वाचकांसाठी तयार आहेत. आत गेलो तर कोणी वाचत होते, मासिकं चाळत होते, संगणकावर क्लिक क्लिक करत होते. संशोधकांसाठी वेगळी खोली होती. संदर्भ ग्रंथांचा विभाग होता. ही झाली नवता.
साहित्याच्या विकासासाठी 2004मध्ये नॉरिचमध्ये ‘रायटर्स सेंटर’ स्थापन झालं. त्याची कार्यकक्षा आंतरराष्‍ट्रीय आहे. नवोदितांसाठी कार्यशाळा, शिक्षणक्रम, स्पर्धा असे अनेक कार्यक्रम हे केंद्र राबवतं. शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुटीमध्ये साहित्याचे खास कार्यक्रम योजले जातात.
‘समर रीडिंग कँपेन’ यातून उन्हाळ्यात हजारो वाचकांशी संपर्क साधला जातो. नॉरिच सिटी कौन्सिल, ईस्ट अँग्लिया विद्यापीठ अशा विविध संस्थांच्या साहाय्यानं ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर रायटिंग’ची स्थापना 2012मध्ये रायटर्स सेंटरनं केली आहे. काही देशांत लेखकांवर बराच राजकीय दबाव असतो. अशा पीडित लेखकांसाठी नॉरिच आश्रय नगरी आहे. ‘इंटरनॅशनल सिटीज ऑफ रेफ्युज नेटवर्क’ या जागतिक संस्थेची नॉरिच ही संस्थापक सदस्य आहे.
स्वतंत्र प्रज्ञेच्या लेखकांची परंपरा नॉरिचला लाभलेली आहे. येथील लेखकांनी लेखणीनं जग बदललं आहे. नॉरिचचा थॉमस पेन याच्या ‘कॉमन सेन्स’ या पुस्तकाच्या प्रभावानं अमेरिकन क्रांतीनं वेगळंच वळण घेतलं, हा इतिहास आहे. त्याचंच ‘राइट्स ऑफ मॅन’ हे आजही जगभर वाचलं जातं. हॅरिएट मारटिन्युनं ‘लिंग-वंश’ याच्या समानतेबाबत, पुरावानिष्ठ विज्ञान, सर्वसमावेशक अर्थव्यवस्था अशा अनेक विषयांवर मौलिक लेखन केलं आहे. बहुविद्याव्यासंगी थॉमस ब्राऊन अशा अनेकांनी नॉरिच हे आपलं घर मानलं. अशी नॉरिच नगरी जवळून पाहण्याचा योग आला. परतीच्या प्रवासात महाराष्‍ट्रातील एखादी नगरी कधी जागतिक साहित्यनगरी होईल का, असा विचार उगाच मनात तरळून गेला.
dranand5@yahoo.co.in