आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Prakash Joshi Artical On India's Research Centra At Antartica

लिस्‍ट ट्रॅव्हल्ड बाय...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरं म्हणजे, या विषयाशी संबंध नसला तरी माझं वैयक्तिक मत म्हणून सांगावंसं वाटतं, माझी सध्याची वर्षं ही महोत्सवी वर्षं आहेत. आमच्या एसएससीच्या बॅचचा गेल्या वर्षी सुवर्णमहोत्सव साजरा झाला. पुढच्या वर्षी आमच्या ‘गिरिसंचार’ संस्थेचा रौप्यमहोत्सव साजरा करण्याचं घाटतंय. ‘गिरिसंचार’ ही परमाणू ऊर्जा विभागाची निसर्ग अभ्यास तथा गिरिभ्रमणासाठी स्थापन झालेली संस्था. शिवाय हे वर्ष आमच्या अंटार्क्टिक मोहिमेचंही रौप्यमहोत्सवी वर्ष. 25 वर्षांपूर्वी आम्ही अंटार्क्टिकावर भारताचं ‘मैत्री’ स्टेशन उभारलं. त्या ‘मैत्री’पर्वाच्या आठवणी मनात पुन्हा उजळल्या. शाळा तथा ‘गिरिसंचार’ संस्थेत माझी बरीच वर्षं व्यतीत झालेली. अंटार्क्टिक मोहीम हा त्यामानाने फक्त काही महिन्यांचा अनुभव; परंतु जीवनाला एका वेगळ्या अनुभवाची अनुभूती देऊन गेली.
हिमालयात ट्रेकिंग करताना रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेची आठवण व्हायची-
Two roads diverged in a yellow wood
I took the one less travelled by
And that made all the difference
अंटार्क्टिकावर yellow wood हा निसर्ग नसला तरी, रॉबर्ट फ्रॉस्टच्या या काव्यपंक्ती लागू पडतात आणि less travelled
ऐवजी least travelledहे शब्द वापरावे लागतील. या वर्षी रौप्यमहोत्सव साजरा करत असलेली आमची आठवी भारतीय उन्हाळी मोहीम होती. अंटार्क्टिकातील उन्हाळा आणि हिवाळा या संकल्पनाच मुळी नवलाईच्या आहेत. अंटार्क्टिक हा ध्रुवीय प्रदेश. ‘ज्या प्रदेशात ‘काही’ दिवस पूर्ण उजेडाचे असतात व ‘काही’ दिवस पूर्ण अंधाराचे असतात, असे प्रदेश ध्रुवीय प्रदेश होत.’ ही ध्रुवीय प्रदेशाची भूगोलीय व्याख्या.
व्याख्येतील ‘काही’ हा शब्द महत्त्वाचा आहे. ब-याच जणांची अशी कल्पना असते, की ध्रुवीय प्रदेशात सहा महिने सूर्यप्रकाश आणि सहा महिने अंधार असतो. उजेड-अंधाराचा हा खेळ थोडा वेगळा असतो. पूर्ण अंधार, पूर्ण उजेडाचा कालावधी हा त्या स्थळाच्या अक्षांशांवर अवलंबून असतो. अक्षांश ही संकल्पना शालेय भूगोल अभ्यासक्रमात असतेही आणि शालेय शिक्षण परीक्षार्थी असेल तर ती विसरूनही जाते. त्या संकल्पनेची थोडक्यात कल्पना अशी-
ही संकल्पना वैज्ञानिक कल्पनाविलासच आहे. वैज्ञानिकांनी पृथ्वीचे दक्षिण आणि उत्तर असे दोन काल्पनिक भाग केले. उत्तर भाग हा उत्तर गोलार्ध म्हणून ओळखला जातो, तर दक्षिण भाग हा दक्षिण गोलार्ध. हे भाग मध्यभागी विषुववृत्त या रेषेने विभागले गेलेत (हे भाग काल्पनिक असल्यामुळं ही रेषादेखील काल्पनिकच). विषुववृत्त हे 0 अक्षांशावर मानलं गेलंय आणि त्याच्या दक्षिण व उत्तरेची पृथ्वी 0 ते 90 अंशांत (अक्षांश) विभागली गेली आहे. 90 अंश उत्तरेला उत्तर ध्रुव आणि 90 अंश दक्षिणेला दक्षिण ध्रुव. अक्षांश नोंद 90 0 द, 90 0 उ अशा त-हेने केली जाते. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर बरोबर सहा महिन्यांची रात्र आणि सहा महिन्यांचा दिवस असतो. अन्य ध्रुवीय प्रदेशांवर दिवस-रात्रीचा कालावधी अक्षांशानुसार कमी कमी होत जातो. त्या स्थानी होणा-या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या आलेखावरून ध्यानात येतं की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी साधारणपणे हे तीन महिने तिथं पूर्ण उजेडाचे असतात; तर मे, जून, जुलै हे अंधाराचे. मार्च आणि सप्टेंबर साधारणपणे आपल्या इकडल्यासारखेच, म्हणजे 12-12 तास उजेड आणि अंधाराचे. तथापि उत्तर अगर दक्षिण ध्रुव या बिंदूंवर (90 अक्षांशावर) रात्र आणि दिवस सहा-सहा महिन्यांचे असतात.
हे असं का? हा मिलियन डॉलर्स क्वेश्चन. त्याचं उत्तर मिळालं की हा प्रवास ‘लीस्ट ट्रॅव्हल्ड बाय’ का हे समजू शकेल. त्याविषयी पुढच्या वेळी जाणून घेऊया.
(ज्येष्ठ गणितज्ञ, निसर्ग विज्ञानाचे जाणकार)