आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोका पोलिओरूपी जैविक अस्त्राचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वर्षांपूर्वी पत्राचा लिफाफा उघडताना, अँथ्रॅक्स या जीवघेण्या आजाराचे विषाणू त्यात असले तर, अशी भीती सर्वांनीच अनुभवली आहे. रामायण-महाभारताच्या काळात भाले, धनुष्य घेऊन समोरासमोर सैन्यात युद्ध होत. नंतर अणुबॉम्बचा वापर झाला आणि आता शत्रूकडून देशाविरोधात विषाणूंचा अस्त्र म्हणून वापर करण्यापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. पोलिओचा जैविक अस्त्र म्हणून वापर झाल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. ऑक्टोबर 2013मध्ये प्रथमच सिरिया या देशात जैविक अस्त्रांच्या माध्यमातून पसरलेल्या पोलिओच्या 10 केसेस आढळून आल्या. या रुग्णांच्या शरीरातील विषाणूंची तपासणी केल्यावर हे लक्षात आले की, हे विषाणू कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत तयार केलेले आहेत. हे झाले पहिले उदाहरण. अशाच प्रकारे इजिप्तमध्येही पोलिओरूपी जैविक अस्त्राने पाकिस्तानातून प्रवेश केल्याचे उघड झाले. नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, इजिप्त आणि सिरिया या दोन्ही राष्ट्रांमधून 99-2000च्या आसपासच पोलिओ हद्दपार झाल्याचे या दोन्ही देशांनी जाहीर केले आहे. अनेकांना वाटेल की, जगाच्या कुठल्या तरी कोप-यात असलेल्या देशांमधील पोलिओचा आपल्याशी काय संबंध? संबंध असा की, भारत सरकारनेही आता पोलिओमुक्तीची घोषणा केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या 2000 सालच्या एम.बी.बी.एस. परीक्षेत शत्रूराष्ट्र जशी अण्वस्त्र वापरताना सूत्रबद्ध आखणी करते, तशीच आखणी जैविक अस्त्राचा वापर करताना होत असते. ‘आयडियल कँडिडेट फॉर बायोटेररिझम’ म्हणजेच जैविक अस्त्र म्हणून आदर्शवत विषाणूंचे गुणधर्म सांगा, या प्रश्नावर शॉर्ट नोट लिहिताना 15 पैकी 12-13 मार्क कसे पडतील, याचा तेव्हा खूप विचार झाला होता. आज तो विचार आणि अपेक्षित मार्क मिळाल्यानंतरचा आनंद आठवला, की लाज वाटते. पोलिओ विषाणूचे गुण आणि भारताची सामाजिक-भौगोलिक स्थिती पाहता, आज तेच मुद्दे जाहीरपणे लिहिताना मनाचा केवढा तरी थरकाप उडतो. ज्या देशातून तो आजार हद्दपार होणार आहे किंवा झाला आहे, आणि ज्या देशाने त्या आजाराचे लसीकरण बंद केले आहे, असा विषाणू आणि देश जैविक अस्त्राच्या वापरासाठी निवडला जातो. या दोन्ही गोष्टींचा विचार करता पोलिओ विषाणू हा भारतासाठी आदर्श विषाणू ठरतो. त्यातच मलाद्वारे पोलिओची पसरण्याची क्षमता आणि भारताची सामाजिक अस्वच्छता त्याला जैविक अस्त्र म्हणून अधिकच सक्षम बनवते. मुख्य प्रश्न असा आहे की, शासन आणि आपण सारे याविषयी काय करू शकतो? यात सर्वप्रथम पोलिओमुक्तीच्या घोषणेचा पुनर्विचार करावाच लागणार आहे. ही घोषणा फसवी आहे. जर पोलिओमुक्ती जाहीर झाली तर अर्थातच पोलिओ लसीकरणही बंद करावे लागेल. पोलिओमुक्ती जाहीर करायची असेल तर त्याआधी काही वर्षे व नंतर काही वर्षे तोंडावाटे दिल्या जाणा-या लसीबरोबर स्नायूमध्ये म्हणजेच इंजेक्टेबेल पोलिओची लस देणेही गरजेचे आहे. तोंडावाटे दिल्या जाणा-या पोलिओच्या लसीमुळे 35 टक्के प्रतिकारशक्ती प्राप्त होते, त्यासोबत स्नायूंमध्ये दिल्या जाणा-या लसीमुळे ती 99 टक्के मिळते. म्हणून जैविक अस्त्रांच्या रूपाने पोलिओच्या परतण्याचा धोका लक्षात घेऊन स्नायूंमध्ये दिल्या जाणा-या लसीचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.
कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत पोलिओ विषाणू बनवण्यात 2002मध्ये पहिल्यांदा अमेरिकेला यश आले. नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, याच अमेरिकेने अर्थसाहाय्याचे गाजर दाखवून भारतावर पोलिओ लसीकरण मोहीम लादली आहे. आता पुन्हा जैविक अस्त्राच्या धोक्यामुळे हे लसीकरण कधीच बंद न करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पोलिओ उच्चाटन किंवा कुठल्याही आजाराचे उच्चाटन म्हणजे, तो आजार अशा प्रकारे निघून गेला पाहिजे की, आता त्याचे लसीकरण कायमचे थांबवता येईल. उदाहरण द्यायचे झाले तर स्मॉल पॉक्स किंवा देवीच्या आजाराचे देता येईल. भारत पोलिओमुक्त जाहीर होत असतानाच कृत्रिम पोलिओ विषाणू प्रयोगशाळेत तयार झाल्याचे वृत्त अमेरिकन वैज्ञानिक वर्तुळात जाहीर झाले आहे. आता तर पोलिओ विषाणू कृत्रिमरीत्या तयार करण्याचा फॉर्म्युलाही थोडक्यात इंटरनेटवर उपलब्ध झाला आहे. छानशा हिरवळीवर एखाद्या वाटसरूला बसण्यासाठी जागा द्यायची आणि तो विसावला की ‘उठू नको, तुझ्या खाली बॉम्ब आहे; उठलास तर फुटेल’, असे धोरण अमेरिकेने पोलिओ लसीकरणाच्या बाबतीत भारताबाबतीत अवलंबले आहे. यात अमेरिका व्हिलन आणि भारत हीरो, अशी सिनेमॅटिक चर्चा करायची नाही. मुद्दा हा आहे की, कुणी तरी मोफत अर्थसाहाय्य दिले म्हणून गरज नसताना भारताने सामाजिक आरोग्य मोहीम स्वीकारू नये व कुठल्या तरी विकसित देशाची इच्छा म्हणून ती देशावर लादू नये.