आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनशैलीचे वैद्यकीय विज्ञान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनशैली- ‘लाइफ स्टाइल’ हा आजचा परवलीचा शब्द. या जीवनशैलीतील ‘फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी’- शारीरिक व्यायाम, चलनवलन हा महत्त्वाचा घटक. लॅन्सेट या जागतिक वैद्यकीय पत्रिकेनं नुकतंच एक सर्वेक्षण केलं. व्यायाम न केल्यामुळे व बैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर काय परिणाम होतात ते अभ्यासणं, असं या पाहणीचं सूत्र होतं. जगात ‘नॉन कम्युनिकेबल डिसिजेस’ म्हणजे संसर्गामुळे जे रोग होत नाहीत, अशा रोगांचं प्रमाण वाढत आहे. मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयविकार, कर्करोग हे संसर्गानं होणारे रोग नाहीत. या रोगांना अनेक कारणं आहेत. पण यातील सहा ते दहा टक्के रोग शारीरिक व्यायामाच्या अभावामुळे होतात. भारतात जीवाणू, विषाणू यांपासून होणारे संसर्गजन्य रोग आहेतच; त्याबरोबर मधुमेह, अतिरक्तदाब अशा रोगांचं प्रमाण वाढतं आहे. भारतावर दोन्ही प्रकारच्या रोगांचं ओझं आहे. धूम्रपान व जाडेपणा हे जसे तीव्रतेनं रोगाला कारण ठरतात, तितकीच रोगकारक तीव्रता शारीरिक व्यायामाच्या अभावाची असते, ही महत्त्वाची बाब आहे. नऊ टक्के अकाली मृत्यू- ‘प्रिमॅच्युअर डेथ’ व्यायामाच्या, चलनवलनाच्या अभावामुळे होतात, अशी जागतिक आकडेवारी आहे. भारतासारख्या मध्यम उत्पन्नाच्या-‘मिड्ल इनकम’ देशात व इतर कमी उत्पन्नाच्या देशात व्यायामाचा अभाव विकसित व श्रीमंत देशापेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे व्यायामाचा, चलनवलनाचा अभाव रोगाला आमंत्रण देतो; याची जाणीव भारतासारख्या अविकसित देशात बहुसंख्य लोकांना नाही, असंही आढळून आलं आहे.
1953मध्ये लॅन्सेटमध्ये एक शोधनिबंध प्रकाशित झाला. लंडनच्या बसचालकांच्यात हृदयविकाराच्या धोक्याचं प्रमाण बसच्या कंडक्टरांपेक्षा (बस वाहकांपेक्षा) जास्त होतं, असं या शोधनिबंधात दाखवून दिलं होतं. बसमध्ये तिकिटं देण्यासाठी सतत फे-या मारणारा कंडक्टर चलनवलनाचं प्रतीक ठरला. व्यायामाचा आभाव व हृदयविकाराचा धोका याचा संबंध वैद्यकीय विज्ञानाच्या लक्षात आला. शारीरिक व्यायामाच्या आधुनिक लोकविज्ञानाचा पाया घातला गेला. या दिशेनं जगभर संशोधन होऊ लागलं. पुराव्यावर आधारित आधुनिक वैद्यकीय विज्ञान असं पुढं गेलं. जगातील कोणत्याही वयोगटातील, समाजआर्थिक स्तरातील ‘नॉर्मल’ लोकांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी दर आठवड्याला कमीत कमी 150 मिनिटे व्यायामाची गरज असते. ‘मॉडरेट इन्टेसिटि अ‍ॅरोबिक फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी’ असं या व्यायामाचं वर्णन केलं जातं. सुलभतेनं सांगायचं झालं तर ब-यापैकी घाम येईल, असं चलनवलन. जरा ‘फास्ट’ चालणं हा उत्तम व्यायाम. सगळ्यांना ‘जिम’ व्यायामशाळेत जाणं शक्य नसतं. पण उठल्यासुठल्या रिक्षा वा बस घेणं टाळलं तरी आरोग्यदायी चलनवलन होऊ शकतं. सायकलींचा वापर हेसुद्धा कमी खर्चाचं चलनवलनाचं साधन आहे. कुमारवयीन तरुण-तरुणींसाठी रोज एक तास सर्व शरीराला होईल अशा जोमदार व्यायामाची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. असा व्यायाम जीवनभर करायचा असतो, हे महत्त्वाचं. पुढील आरोग्यपूर्ण जीवनाचा पाया कुमारवयात घातला जातो, हे विसरून चालणार नाही.
शुद्ध अन्नपाणी व स्वच्छ वातावरण हे सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे शारीरिक व्यायाम, चलनवलन हा सार्वजनिक आरोग्याचा घटक आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 80 टक्के लोक मध्यम व कमी उत्पन्नाच्या देशात राहतात. मधुमेह, अतिरकक्तदाब अशा रोगांचं जे जागतिक ओझं आहे; त्याचं 80 टक्के ओझं मध्यम व कमी उत्पन्नाच्या देशांवर आहे. त्याच्यातील मोठा भाग भारत व चीन या देशांवर आहे. तेव्हा या देशातील शारीरिक व्यायामाचा अभाव हा सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. या देशातील सरकारांनी यावर युद्धपातळीवर उपाय योजले पाहिजेत.
व्यायामाचा अभाव, त्याचबरोबर रोगांचं वाढतं ओझं, हे प्रश्न प्रामुख्यानं भारतासारख्या विकसनशील देशांचे आहेत. पण याबाबतचं संशोधन
मात्र विकसित देशात होतं; हे खेदानं नमूद करावं लागतं, असं लॅन्सेटकारांनी म्हटलं आहे.
योग्य व नियमित व्यायाम, ही रामबाण गोळी आहे. या गोळीचा सुप्रभाव शरीरातील मेंदू धरून सगळ्या अवयवांवर होतो. व्यायामाचे दृश्य तसेच अदृश्य परिणाम असतात. यकृतापासून जठरापर्यंत सगळ्या अवयवांवर व्यायामाचा प्रभाव असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. शरीराच्या आतली यंत्रणा व्यायामामुळे सुधारते.
धूम्रपानाचे वाईट परिणाम दाखवले जातात, तसेच व्यायामाच्या अभावाचे परिणाम दाखवले पाहिजेत. रोज जर पंधरा ते तीस मिनिटे व्यायाम केला नाही तर त्या व्यक्तीसाठी कर्करोग, हृदयविकार, लकवा व मधुमेह यांचं प्रमाण 20 ते 30 टक्क्यांनी वाढतं व आयुर्मर्यादा तीन ते पाच वर्षांनी कमी होते, अशी आकडेवारी लॅन्सेटनं दिली आहे.
भारतात क्रिकेटसारखे खेळ बघण्यास प्रचंड गर्दी होते; पण खेळ खेळण्याचा मात्र अभाव असतो. खेळासाठी लागणारी मैदानं व इतर सुविधा तुटपुंज्या असतात. त्या निर्माण करणं हे लोकांच्या हातात आहे. खेळ- ‘स्पोर्ट’ हा शारीरिक चलनवलनाचा चांगला मार्ग आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. फ्लेटो या पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्याने व्यायामाचं महत्त्व ओळखलं होतं. ‘व्यायामाच्या अभावामुळे शरीराची असलेली चांगली स्थिती नाश पावते व नियमित व्यायामाने ती टिकवली जाते’, असं प्लेटोनं लिहून ठेवलं होतं, ते आजही खरं आहे.