आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळवा आतडीच्या कर्करोगाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठी आतडी ही आपल्या पोटातील पचन संस्थेतील सर्वात शेवटचा भाग आहे. अन्नाची पचनक्रिया पूर्ण झाल्यावर जी विष्ठा तयार होते ती या आतडीमध्ये साठवली जाते आणि गुदद्वारावाटे बाहेर टाकली जाते.
७5 - ९5 % आतडीचा कर्करोग असणा-यांमध्ये कर्करोगाची आनुवंशिक पार्श्वभूमी असते. पुरुषांमध्ये आणि उतार वयामध्ये व 40 वर्षानंतर या आजाराचे प्रमाण जास्त आढळते. अतिचरबीयुक्त किंवा तेलकट जेवण, मांस खाणे, दारू पिणा-यांमध्ये,धूम्रपान करणा-यांमध्ये,लठ्ठपणा असणे, शरीराची हालचाल कमी किंवा बसून काम करणा-या व्यक्तीमध्ये हा कर्करोग होण्याचा जास्त धोका असतो. ज्या लोकांमध्ये मूळव्याधीचा त्रास वारंवार होतो अशा लोकांना कालांतराने हा आजार होण्याचा धोका असतो.
या आजारचे निदान
कसे करणार.....
आपल्याला जर वरीलपैकी लक्षण जाणवत असतील तर लगेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे खूप आवश्यक आहे. आजाराचे निदान जर प्रथम अवस्थेत झाले तर त्याचा उपचारानंतर फायदा जास्त होतो. निदान करण्यासाठी एक साधी पोटाची सोनोग्राफी करावी जर त्यात काही आढळले नाही आणि जर आपल्याला वरीलपैकी लक्षणं जाणवत असतील तर एक कोलोनोस्कोपी म्हणजे गुदद्वारावाटे मोठ्या आतडीची तपासणी करून घेणे. जर कोलोनोस्कोपित काही गाठ आढळली तर, त्याची बायोप्सी म्हणजे त्या गाठीचा तुकडा काढून त्याची कर्करोगाची तपासणी करून घेणे.
गरज पडल्यास सिटी स्कॅन किंवा एम आर आय ची तपासणी करावी या तपासणीमध्ये आजार किती पसरला हे लक्षात येते. एक नवी एंडोस्कोपिक सोनोग्राफी नावाची तपासणी विकसित झाली असून, या तपासणीद्वारे आजार किती पसरला हे अचूकपणे शोधता येते ही तपासणी आता उपलब्ध आहे.
उपचार ..
या आजारावर तीन प्रकारे उपचार केले जातात
1) शस्त्रक्रिया करून आजार पूर्ण काढून टाकणे.
2) रसायनशास्त्रानुसार किमोथेरपी देणे.
3) रेडिएशन म्हणजे कर्करोग झालेल्या ठिकाणी शेक देणे.
शस्त्रक्रिया करण्याचे प्रकार......
1) एआर - म्हणजे या प्रकारामध्ये शस्त्रक्रिया करून आजार पूर्ण काढून त्या बरोबर दूषित आतडीचा काही भाग काढला जातो आणि शौचाचा मार्ग आहे तसाच ठेवला जातो, यामध्ये काही दिवसांसाठी शौचाचा मार्ग बदलून पोटाच्या वरच्या भागावर बाहेरून केला जातो आणि कालांतराने तो पुन्हा नैसर्गिक मार्गात रूपांतर केला जातो.
2) एपीआर - म्हणजे या प्रकारात शस्त्रक्रिया करून आजार पूर्ण काढून त्याबरोबर दूषित आतडीचा काही भाग काढला जातो आणि शौचाचा मार्ग कायमसाठी बदलून पोटाच्या वरच्या भागावर बाहेरून केला जातो. यामध्ये एक पिशवी लावली जाते जी हाताळण्यास अगदी सोपी असते या पिशवीमध्ये संडास जमा होते आणि नंतर ती गरजेनुसार रिकामी करता येते.
3) टोटल कोलेक्टोमी - यामध्ये मोठे आतडे पूर्णपणे काढले जाते आणि शौचाचा मार्ग कायमसाठी बदलून पोटाच्या वरच्या भागावर बाहेरून केला जातो.
वरील शस्त्रक्रिया
दोन प्रकारे केली जाते.....
1) पोटावर चीर देऊन टाके मारून ही शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला ८ ते 10 दिवस दवाखान्यात राहावे लागते, दवाखान्यातून सुटीनंतर त्याला 2 - 3 महिने आराम करावा
लागतो लगेच कामावर जाता येत नाही वजन उचलता येत नाही कारण टाके तुटण्याचा धोका असतो.
2) लॅप्रोस्कोपी - या पद्धतीमध्ये रुग्णाच्या पोटावर चीर मारण्याची गरज नसते, फक्त तीन छिद्रे करून त्यातून दुर्बिण सोडून शस्त्रक्रिया केली जाते आणि नंतर ती दुर्बिण पुन्हा काढून घेतली जाते. या पद्धतीमध्ये शस्त्रक्रिया केल्यास जास्त फायदा होतो कारण पोटावर टाके द्यावे लागत नाही, रुग्णाला जास्त दिवस दवाखान्यात राहावे लागत नाही चौथ्या पाचव्या दिवशी रुग्णाची सुटी होते आणि रुग्ण लवकरात लवकर सर्व कामे पूर्र्वीप्रमाणे करू शकतो त्याला कुठलेही टाके नसल्यामुळे टाके तुटण्याची भीती नसते.
या आजारामध्ये प्रामुख्याने दिसणारी लक्षणे
1) वारंवार जुलाब आणि मलबद्धता होणे.
2) संडासाबरोबर रक्तस्राव होणे.
3) पोटात वारंवार कळ येण्यासारखी संडास आल्याची संवेदना लागणे.
4) शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणे.
5) वजन कमी होणे, भूक कमी होणे.
आतडीचा कर्करोग
टाळण्यासाठी
काय काळजी घ्यावी ...
आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत सुधारणा करणे जास्तीतजास्त कडधान्य खाणे, भरपूर हिरव्या भाज्या व फळे खाणे, नियमित व्यायाम करणे. बंद पाकिटातील व शिळे अन्न सेवन न करणे, मांसाहार न घेणे, दारू, सुपारी तंबाकूचे सेवन टाळणे, धूम्रपान न करणे. जर आपलं वय 50 च्या वर असेल आणि जर वरीलपैकी काही लक्षणे जाणवत असतील तर आपण स्वत:ची पूर्ण प्रकृतीची नियमित तपासणी करून घेणे किंवा वरीलपैकी काही लक्षणे जाणवत असतील किंवा आपल्या घरामध्ये नात्यात कोणाला कर्करोगाची पार्श्वभूमी असेल आपल्याला मूळव्याधीचा त्रास होत असेल आपण इंजेक्शनद्वारे किंवा इतर पद्धतीने त्याचा उपचार केला असेल तर, आपल्या पोटाची सोनोग्राफी व कोलोनोस्कोपी करणे आपल्याला गरजेचे आहे, कारण हे लक्षण कर्करोग होण्यापूर्वीचे असू शकतात आणि जर ते लवकर लक्षात आले तर वेळीच उपचार करून आपण या भयानक आजारापासून वाचू शकतो.