आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकपंचमांश रुग्णांना पडते आयव्हीएफ उपचाराची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयव्हीएफ उपचारांमधील सर्वात महत्त्वाची बाब इतकीच असते की, शुक्रजंतूच्या मदतीने बीजफलन केले जाते आणि त्यानंतर हे फलित बीज गर्भाशयात सोडले जाते, जेणेकरून एक सुदृढ गर्भ आकारास येऊ शकेल. मात्र यामध्ये समस्या ही आहे की गर्भधारणेच्या या संकल्पनेशी अनेक घटक जोडलेले असतात.
० वंध्यत्वाची कारणे अनेक : यामध्ये पुरुष जोडीदाराच्या काही समस्या-कमतरता(40 टक्के), स्त्री जोडीदाराच्या समस्या-कमतरता (40 टक्के) किंवा दोघांमध्येही काही समस्या असणे (10 टक्के) अशी कारणे आढळतात. 10 टक्के जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचे असे काहीही विशिष्ट कारण आढळत नाही. प्रत्येक दांपत्याची स्वत:ची अशी काही वैशिष्ट्ये असतात, ज्यानुसार ही प्रक्रिया निश्चित होते. आयव्हीएफ करून घेण्यासाठी साधारणपणे दिसून येणारी जी सामायिक लक्षणे असतात ती म्हणजे पुरुषांमधील वंध्यत्व, एन्डोमेट्रियोसिस, ओटीपोटात होणारी जळजळ, पीसीओ आणि अंडाशयातील बीजनिर्मिर्ती क्षमतेमध्ये झालेली घट.
० वंध्यत्वावरील उपचार : या पद्धतींमध्येही अनेक प्रकार आहेत. यामध्ये काही महिने वाट पाहण्यापासून अगदी आधुनिक उपचारांपर्यंत अनेक पर्याय आहेत. खरं तर, जननक्षमता प्राप्त करण्याच्या या प्रवासामध्ये अनेक टप्पे येतात. जसे की संप्रेरकांचे परीक्षण, एन्डोस्कोपी, फॉलिक्युलर मॉनिटरिंग, अंडाशयास उत्तेजित करणे आणि आययूआय यासारख्या विविध प्रक्रियांचा समावेश आहे.
० आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर : वंध्यत्वावर उपचार करून घेण्यासाठी आलेल्या रुग्णांपैकी अंदाजे एकपंचमांश रुग्णांना आयव्हीएफ उपचार करून घेण्याची गरज पडते. उर्वरित रुग्णांपैकी बहुतेकांच्या बाबतीत इतर मूलभूत उपचार यशस्वी ठरतात. जी जोडपी शेवटी आयव्हीएफ उपचारांकडे वळतात, त्यांच्यावरील उपचार पद्धतींमध्येही अनेक प्रकारचे वैविध्य असते.
० आयव्हीएफ उपचार पद्धती : या पद्धतीमध्ये अगदी सुरुवातीस रुग्णास गोनॅडोट्रोफिन्सची (पुनरुत्पादक संप्रेरके) इंजेक्शन्स 10 ते 14 दिवसांपर्यंत (अंडाशयास उत्तेजित करण्यासाठी) दिली जातात. त्यानंतर जनरल अ‍ॅनेस्थेशिया (संपूर्ण भूल) देऊन उसाइट पिकअप नावाची एक छोटी प्रक्रिया केली जाते, ज्यामध्ये अंडाणू पूर्वस्थितीत येण्यासाठी अल्ट्रासाउंड मशीनचा वापर केला जातो. इनक्युबेटरमध्ये बीज सुरक्षितपणे स्थापित केल्यानंतर शुक्रजंतू आणि बीज यांना एकत्र आणण्यासाठी योग्य पद्धत ठरवली जाते. ही प्रक्रिया आयव्हीएफ पद्धतीने होऊ शकते, ज्यामध्ये प्रत्येक बीजामागे 100,000 शुक्रजंतू या पद्धतीने बीजाभोवती शुक्रजंतू सोडले जातात. किंवा इन्ट्रा सायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसआय) या पद्धतीमध्ये प्रत्येक शुक्रजंतूबरोबर प्रत्येक बीज स्वतंत्रपणे इंजेक्ट केले जाते. एकदा ही बीजफलनाची प्रक्रिया पार पडली की त्यातून तयार झालेले गर्भ वेगवेगळ्या काळासाठी इनक्युबेटरमध्ये ठेवले जातात. हा कालावधी संपल्यानंतर त्यापैकी उत्कृष्ट गर्भ निवडून गर्भाशयामध्ये पुन:स्थापित केले जातात. या प्रक्रियेस एम्ब्यो ट्रान्सफर (ईटी) असे म्हटले जाते.
० सरोगसी : ज्या जोडप्यांना शुक्रजंतू किंवा बीज आणि अगदी गर्भदान प्राप्त करणे गरजेचे असते, त्यांच्याकडे पुनरुत्पादक पेशींचा कुशल उपयोग करून घेण्याची जी क्षमता असते, त्यानुसार त्यांना मदत करणे सोपे जाते. सरोगसी (एखाद्या जोडप्याकरिता त्रयस्थ स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भधारणा करण्याची पद्धत) या प्रक्रियेविषयी आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे. पण अजूनही याकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहिले जाते. ज्या स्त्री रुग्णांमध्ये गर्भधारणा शक्य नसते, विशेषत: काही स्त्रियांचे गर्भाशय सक्षमपणे काम करत नसते किंवा गर्भाशयच नसते, अशा वेळेसच या पर्यायाचा विचार केला जातो.
आयव्हीएफ उपचारांत शुक्रजंतूच्या मदतीने केले जाते बीजफलन
गर्भाशयाचे आतील आवरण
आणि गर्भावर भवितव्य अवलंबून
अशा पद्धतीने गर्भाची गर्भाशयामध्ये पुन:स्थापना झाल्यानंतर गर्भाशयाचे आतील आवरण आणि गर्भ यांच्यातील परस्पर नात्यावर या उपचारपद्धतीचे पुढील भवितव्य अवलंबून असते. जर हे दोन्ही घटक एकमेकांशी समरस झाले तर गर्भधारणेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होते आणि तसे न झाल्यास मात्र गर्भ सुकून जातो आणि गर्भधारणा होत नाही.