आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद नव्हे, चव्हाटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयाची सत्तरी पार केलेल्या एक बाई माझ्याकडे यायच्या. त्यांच्या सगळ्या शारीरिक तक्रारी हळूहळू कमी झाल्या. प्रकृती सुधारली. पुन्हा एकदा आल्या तेव्हा मी त्यांना सांगितलं की, आता वर्षातून एकदा आलात तरी पुरे आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.
त्या थोडा वेळ उगीच बसून राहिल्या. मला समजेना, त्यांना काय म्हणायचं आहे ते. तेवढ्यात त्या म्हणाल्या, ‘‘तुमच्याकडे आलं, घटकाभर बसलं, थोडंसं बोललं, की मला खूप छान वाटतं. मला नुसतंच तुमच्याशी बोलावं वाटलं आणि मी आले, तर किती पैसे घ्याल हो तुम्ही? नाही म्हणजे, पूर्ण तपासणी फी भरावी लागेल का हो?’’ त्यांच्या चेह-यावर इतका केविलवाणा भाव होता; मलाच गलबलून आलं. क्षणात लक्षात आलं की, त्यांना खूप गरज आहे मोकळं होण्याची. बोलण्याची. मी म्हणाले, त्यांना ‘‘येत जा जेव्हा यावंसं वाटेल तेव्हा. बोलत जा. मी पैसे नाही घेणार बोलण्याचे अन् ऐकण्याचे.’’
संवाद ही माणसाची प्राथमिक गरज आहे. जन्मलेलं बाळसुद्धा कधीकधी उगीच रडत असतं. ते रडणं, म्हणजे त्याची केवळ करमणूक असते. आणि थोडंसं मोठं झालेलं मूल घरातील सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ओरडणे, बडबड करणे, नाचणे किंवा कुणी लक्षच दिलं नाही तर मोठ्याने रडणे, हे प्रकार करतच असते.
आयुष्याच्या अंतिम प्रहरात माणसं जरा जास्त एकटी होतात. जुनं खूप आठवत असतं. ते कुणाजवळ तरी व्यक्त करण्याची इच्छा असते, पण इतरांना ते ऐकण्यासाठी वेळच नसतो. शहरी जीवनात तर कुणाजवळ वेळ नसतो. असलाच तर तो स्वत: व्यक्त होण्यासाठी; पण कुणाचं ऐकण्यासाठी नाही.
पूर्वीच्या काळी बायका घरची कामं झाली की वाड्याच्या पाय-यांवर एकत्र जमत. औपचारिकता नसलेलं ते जाणं-येणं, एकत्र जमणं असायचं. सहजता ही त्यातली खासियत होती. एकमेकींशी सुखदु:खाचं बोलणं व्हायचं आणि बायका मोकळ्या होऊन पुन्हा रोजच्या कामाला लागत. दु:खाला उगाळणं नसायचं की सुखाला फार कुरवाळणं... एकीकडे आपली संस्कृती पुरुषांना मुभा देत नाही रडण्याची. स्वत:ला वाटलेली भीती किंवा दडपण व्यक्त करण्याची. मनाचा कणखरपणा दाखविण्याची त्यांना सामाजिक जबरदस्तीच असते. अन् मग अशी माणसं आतून पोखरून जातात. बाई बोलते, व्यक्त होते, चिडते, रडते. त्यामुळे आतून मोकळी होऊन जाते. पुन्हा नव्याने जगण्याचं ओझं वागवत, सोसत, चिकाटीने जगत राहते. पूर्वीच्या एकत्र कुटुंबात, वाड्यामध्ये हे सगळं नैसर्गिकपणानं आपोआप घडत असे. आता चित्र खूप बदललं आहे. माणसं सधन आहेत. स्वतंत्र आहेत. स्वत:च्या पायावर उभी आहेत. पण आनंद, दु:ख व्यक्त करण्यासाठी खरी जिव्हाळ्याची माणसं कमी झाली आहेत. पटकन भेटायला वेळ नाही. त्यामुळे नव्या माध्यमांचा उपयोग अटळ झाला आहे. फेसबुक, मोबाइलवरची नवनवी अ‍ॅॅप्लिकेशन्स माणसांना जोडण्याचे प्रयत्न करतच आहेत; पण तरी खूप मोठा फरक उरतोच. फेसबुक नामक प्रकारात माणूस स्वत:ची ओळख लपवू शकतो. आपल्याला संपूर्णपणे अनोळखी असणा-या व्यक्तीशी मनातलं वाटेल ते बोलू शकतो. पण अनोळखी व्यक्तीशी बोलण्यातली ही निर्भयता बरीच धोकादायकही असते.
या संदर्भात एक खूप गंभीर घटना ऐकली. युवती शिबिर घेत होते मी. एका मुलीने सांगितलं, की ती ओळख लपवून फेसबुकवरून एका मुलाशी मैत्री करत होती. खूप मोकळं बोलून झालं. प्रेमात पडणं ओघानंच आलं. भेटायचं ठरलं हॉटेलमध्ये. जेव्हा ती गेली अन् पाहिलं तर तो मुलगा चक्त तिचा भाऊच निघाला! सध्या दोघांनाही अपराधी भावनेनं पछाडलं आहे. यातून कसं बाहेर पडावं, हे कुणालाच कळत नाहीये.
संवादाची भूक कधी कधी अशी जिवावर बेतते माणसांच्या. लहानपणी आम्ही गावी जायचो, तेव्हाचं एक चित्र आठवतं- बैलांना चारा देताना आमचा शेतातला गडी बैलांशी खूप गप्पा मारायचा. कधी एखादा बैल रुसतही असे. पण त्या रुसलेल्या बैलाचे लाड करून, चुचकारून मगच तो गडी स्वत: जेवायचा. निसर्गातल्या सगळ्याच घटकांशी संवादातून मैत्र करता आलं तर मनाला किती स्वच्छ, हलकं, निकोप ठेवता येतं, हे जुन्या जगण्यातून लख्खपणानं उलगडतं.
विपश्यना शिबिरातील माझा एक अनुभव. तिथं दहा दिवस मौन पाळायचं असतं, या जाणिवेनेच मला जाण्यापूर्वीच दडपण आलं होतं. न बोलता कसं राहायचं? हा प्रश्न मनात घेऊनच गेले तिथे. प्रथमत: दोन दिवस जडच गेलं मौन, परंतु तिस-या दिवसापासून त्या मौनाची गोडी लागत गेली. पुढेपुढे दिवसागणिक मी माझ्याशीच संवाद करत राहिले. दहाव्या दिवशी तर मन इतकं तृप्त, इतकं शांत, की वर्णन करायला शब्दच नाहीत! अकराव्या दिवशी बोलण्याची परवानगी होती. बरीच माणसं भडाभडा बोलत राहिली. काही शांत होती. मला बोलण्याची गरजच वाटली नाही. इतरांशी नाही अन् स्वत:शीदेखील नाही. आयुष्यात कधी नव्हे इतकं मी स्वत:शी बोलून घेतलेलं होतं. कारण, मौनाचा तो अनुपम आनंद समजला होता. बोलणं, मोकळं होणं, सुखदु:खाच्या भावनांची देवघेव करणं, हे गरजेचं असतं. परंतु स्वत:च्या आत्यंतिक वैयक्तिक गोष्टी इतरांपुढे प्रदर्शित करणं ही प्रकृती नव्हे; विकृतीच्या जवळ पोहोचणारी बाब झाली. पूर्वी अशा गोष्टीसाठी ‘चव्हाट्यावर आणणे’ असा शब्दप्रयोग होता. मी सुंदर दिसतेय किंवा नव-याने आणलेल्या दागिन्यांचे फोटो काढून सर्वांना दाखवणे, मी दु:खी आहे; नाराज आहे; अशा गोष्टी जाहीरपणानं सांगणं, हे प्रकार म्हणजे संवाद नसून चव्हाट्यावर आणणं झालं! मौनाचं वैभव कळणं प्रत्येकालाच सहज शक्य नसेल; पण निदान संवाद आणि चव्हाटा यातला फरक समजला तरी पुष्कळ!
vrushaleekinhalkar@yahoo.com