आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Amol Annadate Artical On Alopathy Varsus Homiopathy

अ‍ॅलोपॅथी विरूध्‍द होमिओपॅथी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने राज्यात होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी जाहीर केली. त्यानंतर ही परवानगी फक्त ग्रामीण भागापुरतीच मर्यादित असेल, असे शासनाने जाहीर केले. ही बातमी आल्यापासून वैद्यकीय क्षेत्रात एकच वादळ आले आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर अ‍ॅलोपॅथी विरुद्ध होमिओपॅथी डॉक्टर, अशा युद्धातच झाले. ई-मेल, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर तर विरोधी मेसेजेस्, चित्र, कार्टून्सपासून सुरुवात होऊन ‘आम्ही तुमचे बुरखे फाडू’, ‘आम्ही तुम्हाला नामशेष करू’, अशा जाहीर धमक्या देण्यापर्यंत हे लोण पोहोचले.
खरे तर आजही महाराष्ट्रात बहुतांश जनतेला आपल्या डॉक्टरची डिग्री काय आहे व कुठल्या डिग्रीला कुठल्या पातळीपर्यंत उपचार करण्याचे ज्ञान आहे, हेच नीट माहीत नसताना अशा प्रकारचा वादच निरर्थक आहे. त्यामुळे सर्वप्रथम अ‍ॅलोपॅथी व होमिओपॅथी या दोन पॅथी काय आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे. अ‍ॅलोपॅथीमध्ये एम.बी.बी.एस. म्हणजेच बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी या डिग्री अंतर्गत रुग्णाचे शरीरशास्त्र, जीवशास्त्राचा आधार घेऊन त्याच्या लक्षणांचा इतिहास, शरीराची तपासणी करून एखाद्या आजाराचे निदान केले जाते. मग त्या आजारावर उपलब्ध औषधांवर झालेल्या संशोधनावर आधारित काही मार्गदर्शक तत्त्वांचा विचार घेऊन उपचार केले जातात. हा बेसिक अभ्यासक्रम झाल्यावर पुढे विविध विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकता येतो. या उलट होमिओपॅथी ही उपचारपद्धत केवळ रुग्णाचा आजार व त्यावर उपचार, एवढा संकुचित विचार न करता त्याच्या मनाचा ठाव घेते व रुग्णाची मानसिकता हा होमिओपॅथीचा मुख्य आधार आहे.
होमिओपॅथीमध्ये तुमची तहान, भूक, झोप, स्वप्न, तुमचे विचार, भीती, एवढेच काय; पण तुम्ही पाठीवर की पोटावर झोपता, इतका सूक्ष्म विचार करून उपलब्ध अनेक औषधांमधून एक औषध शोधले जाते व त्या नेमक्या औषधाचा एक थेंब रुग्णाचे आयुष्य बदलून टाकतो. ब्लाटा ओरिएंटॅलिस या औषधाचा एक थेंब एखाद्या दम्याच्या रुग्णाला जीवदान देतो, ‘ऑरम मेट’चा एक थेंब एखाद्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करतो, अरसेनीकचे काही डोस एखाद्या अतिचंचल अ‍ॅग्रेसीव्ह मुलाला शांत करतात. असे चमत्कार खरे तर होमिओपॅथी घडवू शकतो. जर सर्व पॅथींचा इतिहास तपासला तर लक्षात येते, की सॅम्युअल हनिमॅन हे स्वत: अ‍ॅलोपॅथ होते आणि त्यानंतरही विल्यम बोरीक, अ‍ॅलेन्स, रायबहादूर विश्वंभर दास असे होमिओपॅथीचे भीष्माचार्य हे अ‍ॅलोपॅथ एम.बी.बी.एस. डॉक्टर होते. अ‍ॅलोपॅथीच्या उपचारांना पूर्णत्व देण्यासाठी या मंडळींनी होमिओपॅथी जन्माला घातली. पण आज अनेक वर्षांनी होमिओपॅथी सोडून अ‍ॅलोपॅथीसाठी डॉक्टरांचे झगडणे हे खरे तर होमिओपॅथीचे दुर्दैव आहे.
मुळात होमिओपॅथी डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीची परवानगी मागणे आणि शासनाने ती देणे, यात चूक किंवा बरोबरपेक्षा त्यांनीच नव्हे तर कुठल्याही डॉक्टरने कुठे थांबायचे, हे त्याला कळायला हवे. फक्त जुजबी आजारांसाठी लक्षणे कमी करणारी किंवा आपोआप बरे होणा-या आजा-यांसाठी आधार देणारी औषधे देण्याचे बंधन जर डॉक्टर स्वत:वर घालून घेणार असतील आणि त्या वेळेला त्या रुग्णाच्या अवतीभवती तुमच्यापेक्षा जास्त शिकलेला डॉक्टरच उपलब्ध नसेल तर मग कोणीही तुम्हाला उपचार देण्यापासून रोखू शकणार नाही. पण जर तुम्ही ज्ञान व प्रशिक्षण नसताना ऊठसुट अँटिबायोटिक देऊन रुग्णाच्या प्रतिकारशक्तीचा जीव घेणार असाल, इतर उच्चशिक्षित डॉक्टर उपलब्ध असतानाही रुग्णावर तुमचे उपचार लादणार असाल, तर तुमच्यावर अंकुश ठेवणारा कायदा कशाला हवा? तुमची सद्सद्विवेकबुद्धी त्यासाठी पुरेशी आहे. ही गोष्ट होमिओपॅथीच कशाला, सर्वच पॅथींच्या डॉक्टरांना लागू पडते. असे निर्णय जाहीर करताना खरे तर त्या त्या पॅथींशी चर्चा करून, सर्वांना मान्य होईल असा निर्णय जाहीर करण्याऐवजी शासनाने घाईघाईने हा निर्णय जाहीर केला. त्यातच हा निर्णय फक्त ‘ग्रामीण भागासाठी’ असे म्हणून थेट शहरी, ग्रामीण असा भेदभाव शासनाने केला आहे. उलट ग्रामीण भागातील आरोग्य समस्या अधिक तीव्र असताना, तिथे केवळ एक वर्ष औषधशास्त्र शिकलेला डॉक्टर कशासाठी? उलट त्याला तर अधिक प्रशिक्षण द्यायला हवे.
पॅथींच्या या तंट्यात काही वैयक्तिक अनुभव आवर्जून नमूद करू इच्छितो. गेली काही वर्षे अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करताना होमिओपॅथीच्या पुस्तकांनी मला अक्षरश: झपाटले. दम्याच्या रुग्णांमध्ये स्टिरॉइडचा वापर कमी करण्यासाठी आयुर्वेद व होमिओपॅथच्या सल्ल्याने दम्यासाठी मोनटेलकास्ट हे आयुर्वेदातील औषध, ब्लाटा ओरिएंटॅलिस हे होमिओपॅथी व सैंधव, तीळ या आयुर्वेदातील औषधांचा एकत्रित वापर करून त्याचा प्रयोग केला. यामुळे स्टिरॉइडचा वापर थेट 50 टक्क्यांवर आला. म्हणूनच प्रत्येक पॅथी आपल्या जागी श्रेष्ठ आहे.
रुग्ण अतिगंभीर असतो तेव्हा अ‍ॅलोपॅथी; त्याच्या वात, पित्त, कफ प्रकृतीनुसार आयुर्वेद; व त्याची मानसिक स्थिती लक्षात घेऊन होमिओपॅथी, अशा तिन्ही पॅथींनी हातात हात घेऊन काम केले तर रुग्णाचे कल्याण होईल. जर बालरोगशास्त्रातील अ‍ॅलोपॅथीचे डॉ. यशवंत आमडेकर हे माझे आद्य गुरू असतील तर अ‍ॅलोपॅथ
असूनही आयुर्वेदाचा प्रसार करणा-या डॉ. शरदिनी डहाणुकर याही माझ्या गुरू आहेत; तसेच होमिओपॅथीचे डॉ. दीपक पाठकही मला तितकेच वंदनीय आहेत.
amdaannadate@yahoo.co.in