आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कट'चा वैद्यकीय कचाटा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैद्यकीय क्षेत्रात गेल्या दोनएक दशकांमध्ये जे काही ठळकबदल झाले, त्यातील या क्षेत्राचे अर्थकारण पूर्णपणे बदलून टाकणारा बदल म्हणजे ‘कट’ प्रॅक्टिस. भारतातील वैद्यकीय व्यवसायातील रुजलेल्या या कट प्रॅक्टिसची नोंद ‘लॅन्सेट’ आंतरराष्ट्रीय जर्नलने घेतल्याने जगभर यावर चर्चा होत आहे. खरे तर सुरुवातीला कट प्रॅक्टिसचा लिखाणातून कुठे संदर्भ आला की ‘कशाला आपली घरातील धुणी चौकात धुतोस’, असा मला ज्येष्ठांचा सल्ला मिळायचा. पण आता ही प्रथा वैद्यकीय क्षेत्रात इतकी खोलवर रुजली आहे, आणि इतकी राजरोसपणे सुरू आहे, की त्यात लपवण्यासारखे काही राहिले आहे, असे वाटत नाही. ही प्रथा रुग्ण व डॉक्टरांनी मिळूनच वैद्यकीय क्षेत्रात रुजवल्यामुळे व या प्रथेशी रुग्णाच्या खिशाचा थेट संबंध असल्याने त्यावर खुलेपणाने चर्चा करण्याइतपत आपण नक्कीच प्रगल्भ झालो आहोत.
खरे तर या प्रथेची सुरुवात अनेक वर्षांपूर्वी ज्येष्ठ डॉक्टरांकडून व स्पेशालिस्टकडून आनंदाने बंधुभाव वाढावा म्हणून झाली. दसरा-दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यापासून झाली. हळूहळू तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात वरचढ होऊ लागले, तसतसे एक्स-रे, सोनोग्राफी, सी. टी. स्कॅन, एम. आर. आय. अशा तपासण्या रूढ होऊ लागल्या. हे तंत्रज्ञान आले तेव्हा या मशीनची किंमत काही कोटींमध्ये होती. बहुतेक डॉक्टर कर्ज काढूनच ही मशिन्स खरेदी करत आणि त्यामुळे रोज बँकेत भरावा लागणारा आकडा सतत डोळ्यांसमोर असे. विशेष म्हणजे, रेडिओलॉजी या शाखेचा रुग्णाशी थेट संबंध येत नसे आणि म्हणून रुग्ण पाठवण्याच्या बदल्यात रेफर करणा-या डॉक्टरला रुग्णाच्या फीमधील थोडी रक्कम देण्याची प्रथा रूढ झाली. तसेच ‘गुंतवणूक परतावा’ या गणितात अडकलेल्या डॉक्टरला आपल्याकडे रुग्ण येतील की नाही, ही असुरक्षितता छळू लागली. दिवसेंदिवस सी. टी. स्कॅन, एम. आर. आय. मशिन्समध्ये भर पडत गेली आणि वाढणा-या स्पर्धेमुळे कटची प्रथा अधिकच रुजून गेली. आता ही प्रथा रक्ताच्या तपासण्या, रॅडिऑलॉजीपुरती मर्यादित न राहता प्रत्येक शाखेत पसरली आहे. 300 रुपये मिळाले तरी 90 रुपये रेफर करणा-या डॉक्टरला द्यायचेच आहेत, हा वैद्यकीय व्यवसायाचा अलिखित नियमच होऊन बसला आहे. त्याही पलीकडे तो आता रेफर करणा-या डॉक्टरचा हक्क होऊन बसला आहे.
आपल्याला रेफर केल्याबद्दल आपल्या डॉक्टरला काही पैसे मिळतात, हे रुग्णाला कळते की नाही, या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे. हे न कळण्याइतपत तो रुग्ण भाबडाही राहिलेला नाही, कारण त्याच्या नोकरी-व्यवसायातही तो कुठे ना कुठे अशा प्रकारच्या व्यवसायाला सामोरा जातच असतो. पण स्पेशालिस्ट डॉक्टरवर किंवा अनोळखी डॉक्टरवर लक्ष ठेवण्यासाठी, त्याच्याशी चर्चा करण्यासाठी व वेळ पडल्यास बिल कमी करण्यासाठी कोणी तरी हवा, या भावनेतून कदाचित त्याला कोणाची तरी सोबत हवी असते. कदाचित स्पेशालिस्ट डॉक्टर रुग्णांशी तो संवाद साधण्यास कमी पडत असतील; पण रुग्णांना ही मध्यस्थी हवी असते, एवढे नक्की. पण ज्या कारणांसाठी रुग्ण या मध्यस्थाला नेमतात, तो हेतू साध्य होतो की नाही, हे सांगता येणार नाही. पण आकड्यांची जुळवणूक करताना रेफर झालेल्या रुग्णांच्या बिलात नियमित बिलाच्या 30 टक्के रक्कम वाढते. फक्त नशीब एवढेच, की आज तरी ही रक्कम 30 टक्क्यांवरून 40 किंवा 50 टक्क्यांवर गेलेली नाही.
कट प्रॅक्टिसची चर्चा करताना एका ज्येष्ठ डॉक्टरांच्या वागणुकीची आवर्जून आठवण होते. मुंबईतील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. पोद्दारांकडे एखाद्या कनिष्ठ डॉक्टरने रुग्ण पाठवला, की ते त्याची तपासणी करून त्याविषयीचे मत पत्रात लिहून, त्या डॉक्टरला देण्यास रुग्णाकडे देत. तो रुग्ण पैसे देऊ लागला, की ते त्यांची ठरलेली फी घेत आणि पत्र रेफर केलेल्या डॉक्टरला देण्यास सांगत. अर्थात, तेव्हा रेफर करणा-या डॉक्टरांच्या मनातही कटचा व्यवहार शिवत नसे. आज तसा जनरल प्रॅक्टिशनर, स्पेशालिस्ट आणि महत्त्वाचे म्हणजे तो रुग्णही राहिलेला नाही. आता कॉर्पोरेट हॉस्पिटल म्हणजे अनेक शेअर होल्डर्सच्या सहकार्याने चालणारी एक कंपनी आहे. कटच्या रूपात रुग्ण पाठवणा-या डॉक्टर्सना नफ्यातील भाग देणे, आता उपचारांची ती व्यवस्था चालवण्याचा एक भाग आहे. फक्त रुग्ण म्हणजे त्या कंपनीतून बाहेर पडणारे ‘प्रॉडक्ट’ नाही, एवढे आम्ही विसरलो नाही, तरी खूप झाले. नुकतेच एका रुग्णाचे बिल पाहिल्यावर त्यात थेट एक तक्ताच होता, ‘रेफरिंग डॉक्टर्स फीस’. काही दिवसांनी रुग्णांच्या बिलामध्ये ‘प्रामाणिकपणाचे एवढे’, ‘सदाचाराचे एवढे’, असे तक्ते दिसले नाही म्हणजे मिळवले!
amdaannadate@yahoo.co.in
www.amolaannadate.com