आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Sagar Deshpande Artical On Dr.Raghunath Mashalkar

विज्ञानधर्मवादी कीर्तिवंत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्‍ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना नुकताच ‘पद्मविभूषण’ हा सन्मान जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने त्यांचे निकटचे स्रेही आणि ‘जडण-घडण’ मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांचा हा विशेष लेख -
ज्या मुलाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली, शिक्षणाची इच्छा असूनही ते मिळेल की नाही अशी अवस्था, वडलांचं छत्र हरपलेलं, मुंबईसारख्या महानगरीत पडेल ते काम करून ‘त्या’ मातेनं आपल्या मुलाला मोठं करण्याची बाळगलेली जिद्द! आणि हाच जिद्दीचा वारसा अंगी बाणवून प्रखर मातृप्रेमानं आणि देशप्रेमानं भारलेला एक युवक पुढे आंतरराष्‍ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ बनतो, भारतासारख्या खंडप्राय राष्‍ट्राच्या पंतप्रधानांसमोर विज्ञानाच्या व्यासपीठावरून, पुण्यनगरीला साक्षी ठेवून नव्या सहस्रकाचे ‘पंचशील’ मांडतो, 60 हजार शास्त्रज्ञांच्या जागतिक संघटनेचा अध्यक्ष होतो... सारंच अजब, आश्चर्यकारक! सध्याच्या युगाची लढाई पेटंटच्या रूपानं याच देशभक्तानं यशस्वीपणे लढवली. भारताचं ‘स्वामित्व’ अबाधित राखलं, नव्हे त्याला उद्यमशीलतेची जोड दिली. या कर्तृत्वाचे धनी आहेत डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर ! विज्ञानाच्या क्षेत्रात जगाच्या नकाशावर सातत्यानं झळकणारं एक अस्सल भारतीय नाव.
दक्षिण गोव्यातील माशेल हे त्यांचं मूळ गाव. पण परिस्थितीमुळं अनेकांप्रमाणं मुंबईला स्थलांतरित व्हावं लागलं. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी पितृछत्र हरपलं. मात्र आई अंजनीबाई प्रचंड सोशिक, धीराच्या, जिद्दीच्या. मुंबईत गिरगावातील खेतवाडीत एका चाळीतील छोट्याशा खोलीत हे कुटुंब राहू लागलं. उदरनिर्वाह कसा करायचा? ‘‘शिवणकामासाठी एकदा काँग्रेस हाउसजवळ गेले. तिथं गेल्यावर समजलं, की तिसरी झालेल्यांनाच घेतलं जाईल. मी संध्याकाळी मागे फिरले. मात्र त्याच वेळी ठरवलं, आपल्या मुलाला खूप-खूप शिकवायचं. शिक्षणाशिवाय या जगात मान नाही.’’ - डॉ. माशेलकरांच्या मातोश्री सांगायच्या.
गिरगाव खेतवाडीतील महापालिकेच्या शाळेत मराठी माध्यमातच ते शिकले. मुंबईत त्यांचे हरिश्चंद्रमामा होते. तेही जवळच राहायचे. ‘बेस्ट’मध्ये पेंटर म्हणून काम करायचे. रमेशची (डॉ. माशेलकरांचं घरगुती नाव) पाठांतराची प्रचंड तयारी त्यांनीच करून घेतली. त्यांनी लहानग्या रमेशकडून पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, औटकी तोंडपाठ करून घेतली होती. पण त्यांचाही अवघ्या दोनच वर्षांचा सहवास रमेशला लाभला. त्यांचं निधन झालं. मग प्रश्न पडायचा, आता कुणाला शंका विचारणार?
पडतील ते कष्ट घेऊन जिद्दीनं अंजनीबार्इंनी रमेशचं शिक्षण चालू ठेवलं. गिरगावातून लोअर परळपर्यंत डोक्यावर कापडाचे दोनदोनशे वाराचे तागे घेऊन सिल्क मिलमध्ये त्या चालत जायच्या. युनियन हायस्कूलमध्ये शिकणा-या रमेशची दर शनिवारी चाचणी परीक्षा असायची. त्यासाठी घरून न्यावयाची तीन पैशाची उत्तरपत्रिका नेणंही अशक्य व्हायचं. पण त्याही परिस्थितीत चौपाटीवरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करून रमेशनं 1960मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत संपूर्ण महाराष्‍ट्रात तिसावा येण्याचा मान मिळवला. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत अनवाणी चालणा-या रमेशनं पुढं बारावीच्या परीक्षेतही बोर्डात अकरावा येण्याचा मान मिळवला. परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणं अशक्य वाटू लागलं. अशा वेळी सर दोराबजी टाटा ट्रस्टनं मदतीचा हात पुढे केला. दर महिना साठ रुपये अशी सहा वर्षांची शिष्यवृत्ती टाटा ट्रस्टनं दिली. आजही या साठ रुपयांचं मोल त्यांना अमूल्य वाटतं.
मोलमजुरी करून आपल्या मुलाला वाढवताना त्यानं काही वावगं वागू नये, याकडंही अंजनीबार्इंचं लक्ष होतं. रमेशनं लहानपणी गोट्या, पत्ते खेळलेलं त्यांना चालत नसे. एकदा त्यांनी रमेशला गोट्या गटारात फेकायला लावल्या होत्या. पत्ते हातात दिसल्यावरही त्या रागावल्याच. परीक्षेसाठी कागद आणायचा म्हणजे त्या मातेच्या डोळ्यांत पाणी येई. परीक्षेनंतर उरलेल्या कागदांची रफ वही करून हातात धरताही येत नसे एवढ्याशा पेन्सिलनं रमेश त्यावर लिहीत असे.
जयहिंद महाविद्यालयातील शिक्षणानंतर रमेश मुंबई विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान विभागात उच्च शिक्षणासाठी दाखल झाला. रासायनिक अभियंता म्हणून पदवी घेतल्यानंतर नोकरी शोधू लागला. पण आईनं विचारलं, ‘तुझ्या विषयातील पुढची पदवी कोणती? ती मिळव.’ परदेशात संशोधनाची संधी असतानाही त्यांनी भारतातच प्रो. शर्मांच्या हाताखाली अवघ्या तीन वर्षांत डॉक्टरेट मिळवली.
इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून जगभरात नाव कमावलेल्या माशेलकरांचं परिचयपत्र म्हणजे खरं तर एक पुस्तकच होईल. नॉन न्यूटोनियन फ्लूइड मेकॅनिक्स, जेल विज्ञान आणि पॉलिमर अभिक्रिया या अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आपल्या मूलभूत संशोधनाद्वारे वेगळी वाट चोखाळणा-या माशेलकरांना शास्त्रीय संशोधनाबद्दल 12, तंत्रज्ञान आणि उद्योगातील संशोधनाबद्दल 9, नेतृत्वाबद्दल 2, तर अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा गौरव करणारे 6 असे 50हून अधिक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची 18 पुस्तकं आणि 250 संशोधनपर निबंध प्रकाशित झाले असून 28 पेटंट्स त्यांच्या नावावर नोंदवली गेली आहेत. गेल्या तीन शतकात लंडनच्या रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळवणारे 35 भारतीय शास्त्रज्ञ झाले. डॉ. माशेलकर हे त्यापैकी पहिले महाराष्‍ट्रीय शास्त्रज्ञ आणि तिसरे भारतीय अभियंते आहेत. रॉयल फेलो म्हणून ज्या पुस्तिकेमध्ये आइन्स्टाइन, न्यूटननी सही केली, तीमध्ये सही करण्याचा मान मिळाला तो क्षण आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा होता, असं डॉ. माशेलकर अत्यंत मोकळेपणानं सांगतात.
डॉक्टरेट मिळाल्यानंतर इंग्लंडमध्ये काही वर्षे ते अध्यापन करत होते. त्याच वेळी भारतातील शास्त्रज्ञांनी स्वदेशी परत यावं, यासाठी पंतप्रधान इंदिराजी जाणीवपूर्वक प्रयत्न करत होत्या. डॉ. माशेलकरांचे गुरू बी. डी. टिळक आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे त्या वेळचे महासंचालक डॉ. नायडूम्मा यांनी माशेलकरांना मायदेशी येण्याविषयी आवाहन केलं. ‘इथं कुठं, किती पगारावर यायचं, हे माहीत नसतानाही भारतात परतण्याच्या आंतरिक इच्छेमुळं आपण भारतात 1976मध्ये परत आलो’, असं डॉ. माशेलकर सांगतात.
1989 ते 95 या काळात पुण्यातील राष्‍ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एन. सी. एल.) ते संचालक होते. पुण्यात एन. सी. एल.मधील ही त्यांची सहा वर्षांची कारकिर्द गाजली. भारतातील प्रयोगशाळा या जागतिक संशोधन आणि विकास क्षेत्रातील व्यासपीठ व्हाव्यात, हे स्वप्न बाळगून त्यांनी सी. एस. आय. आर.च्या महासंचालकपदाची सूत्रं हाती घेतली आणि त्याच वेळी ‘सी. एस. आय. आर. 2001 : व्हिजन अँड स्ट्रटेजी’ याबद्दलचं धोरण जाहीर केलं. उदारीकरण आणि जागतिकीकरणाची आव्हानं पेलण्याची क्षमता या संस्थेनं प्राप्त केली ती त्यांच्याच नेतृत्वाखाली. गेले दशकभर कल्पक, नवतेच्या संस्कृतीचे आणि बौद्धिक संपदा हक्कांचे ते उद्घोषक होते. त्याचाच परिपाक म्हणजे, जखमेवरील जंतुनाशक म्हणून नावाजलेल्या हळदीच्या अमेरिकी पेटंटला आव्हान देण्याकामी नेमलेल्या संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वी केली. भारतासारख्या देशांकडील पारंपरिक ज्ञानाच्या ठेव्याचं जतन व्हावं, म्हणून जागतिक पातळीवर देश एकत्र आले. त्यांच्या पुढाकारातून पारंपरिक ज्ञानाची डिजिटल लायब्ररी तयार झाली.
जानेवारी 2000मध्ये पुण्यात झालेली 87वी राष्‍ट्रीय विज्ञान परिषद ही तर डॉ. माशेलकरांच्या कल्पक नियोजनाचं आणि प्रज्ञेचं मूर्तिमंत उदाहरण होतं. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात त्यांनी मांडलेलं ‘पंचशील’ खूप गाजलं. सायन्स काँग्रेस ही लोकांपर्यंत पोहोचली. नोबेल विजेत्यांसमोर तळागाळातील अशिक्षित सर्जनशीलांना बोलण्याची संधी मिळाली. काही वर्षांनी डॉ. माशेलकरांच्याच अध्यक्षतेखाली ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’ची स्थापना झाली, त्याचंही काम आता देशभर पसरलंय.
राष्‍ट्रीय स्तरावर डॉ. माशेलकरांचं नाव एव्हाना गाजू लागलं होतंच. ‘बिझनेस इंडिया’ने 1997मध्ये स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय पथ-प्रवर्तक ज्या 50 महनीय व्यक्तींची निवड केली, त्यामध्ये त्यांचा समावेश झाला. 1998चा टाटा उद्योग संस्थेचा नेतृत्वाबद्दलचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले शास्त्रज्ञ ठरले. 30पेक्षा अधिक देशी-विदेशी विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट देऊन त्यांचा गौरव केलाय. तर भारताच्या राष्टÑपतींनी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि आता पद्मविभूषण या किताबांनी गौरवलं आहे.
देशात दर वर्षी पीएच्. डी. मिळवणारे सुमारे सहा हजार संशोधक आहेत. पण आतापर्यंत केवळ तीनच भारतीय शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळालंय. त्यातही भारतात राहून, इथंच संशोधन करून नोबेल पुरस्कार मिळवणारे सी. व्ही. रामन हे एकमेव. यंदा त्यांचे 125वे जयंती वर्ष सुरू आहे. त्याबाबत बोलताना ‘नोबेल मिळवणं हा भारतीयांचा छंद व्हायला हवा’, अशा शब्दांत आपली उत्तुंग स्वप्नं आणि न कोमेजणारा आशावाद व्यक्त करणारे माशेलकर हे वाचन, लेखन आणि शास्त्रीय संगीतामध्ये रमतात.
‘माझी आई माझं प्रेरणास्थान आहे, तिनं मला जीवनमूल्यं शिकवली’, असं अत्यंत नम्रपणे आणि कृतज्ञतेनं सांगणा-या माशेलकरांना आपली पत्नी वैशाली यांचाही विलक्षण अभिमान आहे. त्या चित्रकार आहेत.
मोठमोठ्या व्यक्तींची आत्मचरित्रं वाचण्याचा डॉ. माशेलकरांना छंद आहे. विमान प्रवासात त्यांच्याकडे एक तरी आत्मचरित्र असतंच. विज्ञान हाच आपला धर्म मानणा-या माशेलकरांना अजूनही संशोधनामध्ये मिळणारा आनंद नेहमी सुखावतो. तीच आपली विश्रांती असल्याचं ते सांगतात. क्रिकेटची त्यांना विलक्षण आवड असून सचिन तेंडुलकरचे ते चाहते आहेत. मुलासमवेत दिल्लीत पाहिलेल्या भारत-पाक सामन्याची आठवण आजही त्यांच्या बोलण्यात येते. वर्षातून तीन-चार वेळा गोव्यात गेले की ते न चुकता आपल्या मूळ गावी माशेलला, शांतादुर्गा-रवळनाथ अशा देवालयांमध्ये जातात. गणेशोत्सवाला त्यांच्याकडं फार महत्त्व आहे. त्यांची आई गणेशभक्त. त्यामुळं जगात एरवी कुठंही भ्रमंती सुरू असली तरी गणेशोत्सवाच्या आठवड्यात ते पुण्यात, आपल्या घरी असतात.
जगात कोठेही गेले तरी आपल्या आईला तीन दिवसांतून एकदा पत्र लिहायचा त्यांचा नियम होता. ते सी.एस.आय.आर.चे डायरेक्टर जनरल असताना दिल्लीत राहात. जेव्हा जेव्हा पुण्यातील घरातून दिल्लीला जायला निघत, तेव्हा आपल्या खिशातील शिल्लक रक्कम आईला देत. त्यांच्या आईनेही प्रेमाने ते पैसे जपून ठेवले होते. आपल्या मृत्यूनंतर त्याचा चांगला उपयोग करावा, असं त्यांनी लिहून ठेवलं होतं. आजही त्यांनी लिहिलेल्या 'फी्रल्ल५ील्ल३्रल्लॅ कल्ल्िरं' या पुस्तकाच्या रॉयल्टीतून आणि या पैशातून ‘सर्वसमावेशक संशोधन करणा-या (स्वस्त आणि सर्वांना उपयोगी) संशोधकास ‘अंजनी माशेलकर इनक्ल्युझिव्ह इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड’ देण्यात येतं. आजही ते आपल्या आईच्या आठवणीने गहिवरून जातात. त्यांच्या 'रिहन्व्हेटींग इंडिया' या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही त्यांनी अशी लिहिली आहे - Dedicated to my mother who is no more and yet is everywhere.
त्यांचं आईवर जसं उत्कट प्रेम आहे, तसंच आपल्या मातृभूमीविषयीदेखील त्यांना उदंड प्रेम आहे. ‘ज्ञान आणि नवनिर्माण’ ही आजच्या युगाची चलनी नाणी आहेत. त्यांचा उपयोग करून भारत पुन्हा वैभवशाली होईल, याबद्दल त्यांना दुर्दम्य आशावाद आहे. एकाच वाक्यात सांगायचं तर डॉ. माशेलकर म्हणजे जगाच्या व्यासपीठावर भारतासाठी जणू ‘आधार कार्ड’च आहेत.
jadanghadan@gmail.com