आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 टक्के गर्भवती स्त्रिया, कुटुंबीयांना धोकादायक स्थितीची माहितीच नसते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक देशाच्या प्रगतीचा मापक त्या देशाचा जीडीपी असतो. तसेच सार्वजनिक आरोग्यसेवेचा देशाचा मापक म्हणून माता-बाल मृत्यू दर असतो. आमच्या देशाने बरीच प्रगती केली; परंतु सध्या माता आणि बाल मृत्यू दराने भारताची मान शरमेने खाली जाते. श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तानापेक्षा हे प्रमाण अधिक आहे हे आमचे दुर्दैवच.
शासनाचे प्रयत्न, मात्र जनतेचा प्रतिसादच नाही
सुरक्षित मातृत्त्व अर्थात गर्भवती ते प्रसूती, प्रसूतिपश्चात आणि कुटुंब नियोजनापर्यंत स्त्रीची नियमित आणि विशिष्ट कालावधीत काळजी घेणे, हे होय. शासनाद्वारे सुरक्षित मातृत्त्व आता कुंटुब नियोजन आता जननी सुरक्षा योजनेत अंतर्भूत केले गेले आहे. शासनाने विविध योजना आखल्या आहेत; परंतु जनतेकडून प्रतिसाद मिळत नाही.
गर्भवती स्त्रीची तपासणी आणि उपचारांचे उद्देश :
०धोक्याची गर्भावस्था आणि प्रसूती ज्या स्त्रियांमध्ये असू शकते, त्यांना शोधणे.
०गर्भावस्थेतील धोक्याच्या बाबी टाळणे, ओळखणे आणि उपचार करणे.
०लवकर धोक्याची चिन्हे ओळखली तर त्याचे दुष्परिणाम टाळू शकतो.
०नियमित वैद्यकीय सेवा गर्भवतींना पुरवणे.
गर्भवती स्त्रियांना प्रसूतीविषयक मार्गदर्शन करणे. त्यामुळे तिच्या मनाची प्रसूतीसाठी योग्य तयारी होते. ०पती, पत्नी दोघांना प्रसूतीची जागा, तसेच नवजात शिशूची काळजी आणि स्तनपान, बाळाचा आहार याबद्दल योग्य मार्गदर्शन करणे. ०पती-पत्नी दोघांना दोन मुलांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यास प्रवृत्त करणे. ०सुदृढ माता आणि सुदृढ बालक हेच सुरक्षित मातृत्वाचे ध्येय असते.
सामान्य प्रसूती म्हणजे काय?
जेव्हा गर्भारपण 38 ते 40 आठवड्यांपर्यंत (पूर्ण दिवसाचे) असते, बाळ डोक्याकडून खाली असते, स्वत: हून कळा येतात आणि नैसर्गिक प्रसूती होते, तेव्हा आई आणि बाळ सुरक्षित असतात. पहिल्यांदा साधारणत: 12 तासांत, तर नंतरच्या गर्भारपणात 7 ते 8 तासांत प्रसूती झाली पाहिजे, त्याला सामान्य प्रसूती म्हणतात. ब-याचदा गर्भवती स्त्री आणि नातेवाइकांना वाटते की सिझेरियन नको; पण सामान्य प्रसूती काय असते, हेच कळत नाही. पायाळू जुळे जरी सिझेरियनने झाले नाही, तरी त्याला सामान्य प्रसूती म्हणता येत नाही. प्रसूतीसाठी नाव नोंदवताना आपली योग्य माहिती द्यावी. आपली पाळी नियमित वा अनियमित आहे का? कितवे गर्भारपण किंवा गर्भपात? किती मुले आहेत? आपल्या पूर्वीच्या गर्भपाताची, प्रसूतीची माहिती देणे. स्वत:ला असलेला आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग तसेच आपल्या कुटुंबात जर कुणास आनुवंशिक आजार असेल तर तोसुद्धा सांगावा.
प्रथम तपासणी : यात आपले कार्ड काढून नाव नोंदवल्या जाते. आपली माहिती भरली जाते. या वेळी संपूर्ण तपासणी तसेच आपले वजन, उंची, हृदय, फुप्फुसे, लिव्हर, किडनी, रक्तदाब बाळाची वाढ, पायावर सूज, गर्भजल, बाळाची स्थिती, बाळाचे ठोके तपासले जातात व त्याची योग्य नोंद केली जाते. आपल्या काही तपासण्या एचबी/युरिन, एचआयव्ही, कावीळ, रक्तगट, मधुमेह, थायरॉईड आणि सोनोग्राफी केली जाते. पहिल्या सात महिन्यांत दर महिन्याला तपासणी होते. पहिल्या महिन्यापासून दर महिन्याला तपासणी होते. पहिल्या तिमाहीत गर्भावस्थेचे निदान होते. मळमळ आणि फोलिस अ‍ॅसिडची गोळी दिली जाते. एचबी टक्केवारी, युरिन, एचआयव्ही, एचबीएसएजी (कावीळ) रक्तगट, मधुमेह, थायरॉईड आणि सोनोग्राफी केली जाते.
०दुस-या तिमाहीत धनुर्वाताचे इंजेक्शन. एचबी टक्के, युरिन, मधुमेह तपासला जातो. 18 ते 20 आठवड्यांत बाळाचे अवयव तयार झालेले असतात. त्या वेळी एक सोनोग्राफी होते. या वेळी व्यंग तपासणे सोपे जाते. तिस-या तिमाहीत सातव्या महिन्यापासून दर 15 दिवसांनी तपासतात. नवव्या महिन्यात दर आठवड्याला प्रसूती होईपर्यंत तपासणी करावी.
०प्रत्येक वेळी आपले वजन, बीपी, एचबी टक्के, युरिन, सूज, बाळाची वाढ, गर्भजल अणि बाळाची स्थिती तपासली जाते. काही असामान्य चिन्हे आढळल्यास वारंवार बोलावले जाते.
०सामान्यत: एचबी टक्के साधारणपणे 12 टक्के असावे. त्यासाठी गर्भवतींना लोहयुक्त गोळ्या देतात आणि कॅल्शिअमही देतात. बाळाची वाढ आणि हाडे तयार होण्यासाठी कमजोरी असल्यास प्रथिनयुक्त आहार किंवा पावडर दिली जाते.
व्यायाम आणि विश्रांती
1. रोज सवयीचीच सर्व कामे करावीत. संध्याकाळी व्यायाम जाणवेल इतपत भरभर मोकळ्या हवेत फिरावयास जावे.
2. दुचाकी, स्कूटर, सायकलवर, घोड्यावर बसणे व पोहणे टाळावे.
3. अतिश्रम अथवा धक्का बसेल असा प्रवास टाळावा.
4. दीर्घश्वास आणि प्राणायामाची सवय असल्यास हितावह असते.
5. रात्री सात ते आठ तास आणि दुपारी दोन तास झोप विश्रांती पुरेशी असते.
6. गर्भवतीच्या शारीरिक आरोग्याइतकेच तिचे मानसिक आरोग्यसुद्धा महत्त्वाचे असते. आजकाल नॉर्मल की सिझेरियन होईल, हाच विचार असतो आणि मुलगा होणार की मुलगी? पण कुटुंबाचा आधार अति महत्त्वाचा असतो.
प्रसूती रुग्णालयातच झाली पाहिजे, याची तयारी ठेवावी. आपल्या रुग्णालयाचा पत्ता, फोन नं., आपली सर्व कागदपत्रे, रिपोर्ट, पैसे सोबत असावे याची दक्षता द्यावी. तेल, कंगवा, भांडे, साबण कपडे सोबत घ्यावे. सर्व बॅग आधीच भरून ठेवावी जेणे करून गडबडीत आपण घरी काही विसरणारही नाही. कळा सुरू झाल्यावर साधारणपणे पहिलटकरणीस 12 तासांत, तर दुस-या खेपेस 7 तासांत झाली पाहिजे. अति वाट पाहिल्यास आई किंवा बाळाला धोका होऊ शकतो. प्रसूतिपश्चात बाळास स्तनपान अर्ध्या तासात लगेच सुरू करावे. स्तनपानाची पूर्वतयारी गर्भावस्थेत करावी. स्तनपानाचे फायदे, योग्य स्तनपान कसे करावे? आणि स्वत:चे दूध कसे काढून ठेवावे? त्याचा संग्रह कसा करावा? पुन्हा बाळाला ते कसे पाजावे? याबाबत आधीच जाणून घेतल्यास प्रसूतिपश्चात योग्यरीतीने यशस्वी स्तनपान केल्या जाते.
प्रसुतीपश्चात व्यायाम : पोटाचे आणि योनीमार्ग पूर्वस्थितीत येण्याचे व्यायाम करावे. बाळासोबतच जागणे व झोपणे असे करावे.
पोटाच्या स्नायुंचे व्यायाम : - पाठीवर झोपा व पाय गुडघ्यात वाकवा ओटीपोटाखाली हात ठेवा व पोटाचे स्नायू आत ओढत आपले माकड हाड छातीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा व याच वेळी पाठ पुर्णपणे गादीला चिकटवा या स्थितीत सहा सेकंद राहा व हळूहळू मुळपदावर या हा व्यायाम सहा वेळा करा.
-पेल्व्हिक रोटेशन
पाठीवर झोपा व पाय गुडघ्यात वाकवा हात दोन्ही बाजूस ठेवा हात व पाठ सरळ ठेऊन दोन्ही गुडघे डावीकडे झुकवा हळूहळू मुळपदावर या. हाच प्रकार उजविकडे करा.
-आहार :- प्रसुतीपश्चात गर्भवती अवस्थेपेक्षा थोडा (20 %) जास्त आहार घ्यावा. तसेच लोहयुक्त आणि कॅल्शीयमयुक्त गोळ्यांचे सेवन करावे.
कुटूंबनियोजनाची साधने :- दोन मुलांमध्ये किमान 3 वर्षांचे अंतर असावे त्यामुळे आईच्या शरीराची झालेली झीज भरून येते आणि बाळाची योग्य वाढ होते. त्यासाठी प्रसूतीनंतर दीड महिन्याने परत गर्भधारणा होऊ शकते. पाळी नाही आली तरीही त्याला आपण मिंध बाळ राहिले, असे म्हणतो. म्हणूनच प्रसुतीनंतर आपणास योग्य ठरतील ती कुटुंबनियोजनाची साधने वापरावीत.
...तर मातामृत्यू टाळता येतो
मातामृत्यूची जेव्हा सखोल चौकशी होते, तेव्हा असे आढळून येते की, 75 टक्के कुटुंबीय आणि गर्भवती स्त्रियांना आपण धोकादायक परिस्थितीत आहोत, असे माहीतच नसते. जर गर्भवतीची नियमित आणि योग्य तपासणी झाली तसेच रुग्णालयात प्रसूती झाली आणि दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवले, तर मातामृत्यू टाळता येतो.
गर्भावस्थेतील आहार (एका दिवसाचा) असा असावा
धान्य : 2 मूठ भात, 6 घडीच्या पोळ्या, 3 पातळ भाकरी, डाळी - 1 कप, तेल,तूप - 5 चहाचे चमचे, पालेभाज्या - 1 , 1/2 वाटी घट्ट, साखर गुळ - 10 चहाचे चमचे, कंद व मुळे - गाजर, बीट, कांदा, रताळी, फळे - 1 ते 2 केळी, 1 संत्री, 1 मोसंबी, 1 सफरचंद, फळभाज्या - गवार, घेवडा, दुध्या, भेंडी, 1 वाटी दुध, दही - 4 कप.