आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Ajay Mane, Dr.Sanjay Padole Artical On Homiopathic Medicine

होमिओपॅथिक औषधी सर्वात जास्त फायद्याची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
० गर्भजल : गर्भजल म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे जल जे गर्भाशयामध्ये गर्भाच्या बाजूने असते. ज्यात गर्भ तरंगत असतो. त्या कोषाला गर्भजल कोष (अम्निओटिक क्यॅव्हिटी) असे म्हणतात. जो गर्भधारणेनंतर 4 आठवड्यांनी निर्माण होतो. हे जल आईच्या रक्तातून गर्भजल कोषात त्याच्या आतून असणा-या विशिष्ट आवरणातून पाझरत असते. काही प्रमाणात हे जल गर्भाच्या लघवीपासून तयार होते. त्यामध्ये पाणी, क्षार (इलेक्ट्रोलाइट), शर्करा (ग्लुकोज), वसा (लिपिड) इत्यादी मिश्रणाने युक्त हे जल बनलेले असते, हे सर्व गर्भाच्या वाढीसाठी पोषक असते.
० समस्या : यामध्ये गर्भजल पातळी कमी होणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त वाढणे, दोन्ही गोष्टींचा परिणाम गर्भाच्या वाढीवर होतो. गर्भजल पातळी कमी होणे, या समस्येचे प्रमाण जास्त आढळते. साधारण ८ व्या ९ व्या महिन्यामध्ये ब-याच गरोदर स्त्रियांमध्ये ही समस्या आढळून येते. सरासरी ८% महिलांना या समस्या निर्माण होतात. त्यातल्या 50% महिलांमध्ये गरोदरपणाचे 42 आठवडे पूर्ण झाल्यावर, तर 12% महिलांमध्ये गरोदरपणाचे 41 आठवडे पूर्ण झाल्यावर या समस्या निर्माण होतात. यामध्ये जरी गर्भजल कमी झाले असले, तरी घाबरण्याचे कारण नसते. कारण बाळाची वाढ होण्याचे दिवस पूर्ण झालेले असतात. राहिलेल्या 3८ % महिलांमध्ये काळजी करण्यासारखे असते.
० गर्भजल कमी होण्याची कारणे : यासाठी अनेक कारणे असतात. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत...
1) गर्भजल कोषाला छिद्र पडणे. ज्यामुळे आतील जल पूर्णपणे बाहेर वाहू लागते आणि गर्भजल पातळी कमी होते.
2) गरोदर असताना आईच्या आरोग्यामध्ये काही बिघाड झाला किंवा आई आजारी पडली, तर त्याचा नकळत परिणाम गर्भजलावर होऊ शकतो. आईला जर मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल आणि त्याच्या साठी काही गोळ्या घेत असेल, तर त्याचा परिणामदेखील गर्भजलावर होऊ शकतो.
3) गरोदरपणामध्ये काही जंतुसंसर्ग झाला असेल, त्यानेदेखील या समस्या उद्भवतात.
4) गरोदरपणामध्ये जर आईला सकस आहार मिळाला नाही आणि आईची प्रकृती अशक्त राहत असेल, तर गर्भजल कमी होण्याच्या समस्या उद्भवतात.
5) जर गर्भामध्ये काही आनुवंशिक व्याधी निर्माण होत असतील. उदा. त्याच्या फुप्फुसामध्ये किंवा किडनीमध्ये व्याधी असणे. यामध्ये जर गर्भाच्या या अवयवाचा विकास व वाढ जर व्यवस्थित झाली नाही, तर या समस्या गर्भधारणेच्या पहिल्या ६ महिन्यांत निर्माण होतात. किडनीचा विकास न झाल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते. परिणामी, गर्भजल पातळी कमी होते.
6) कधी कधी ही समस्या गर्भाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत झालेल्या अडथळ्यामुळे होऊ शकतात. या अवस्थेत उपचार खूप कठीण असतात.
7) प्रसूतीच्या दिलेल्या तारखेच्या वर जर 2 आठवडे झाले असतील, तर ही समस्या येऊ शकते.
० या समस्येपासून होणारे दुष्परिणाम : जर गरोदरपणाच्या पहिल्या ६ महिन्यांत जर ही समस्या निर्माण झाली, तर गर्भाचा विकास होत नाही, ब-याच वेळेस जर निष्काळजीपणा झाला, तर गर्भ मृत होऊ शकतो. ही समस्या गरोदरपणाच्या शेवटच्या एक-दोन महिन्यांत निर्माण झाली, तर ब-याच वेळेस गर्भाची वाढ अपुरी राहते. त्याचे सर्व अवयव पूर्णपणे विकसित होत नाहीत. गर्भजल पातळी कमी असेल, तर नैसर्गिक प्रसूती होण्यास अडथळे येतात. ब-याच वेळेस अशा अवस्थेत तज्ज्ञ डॉक्टर कृत्रिम प्रसूती करण्याचा सल्ला देतात आणि ती करावीच लागते.
उपचार
इतर उपचार पद्धतींमध्ये गर्भजल वाढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सलाइन आईला दिले जातात; परंतु यामध्ये गर्भजल पातळीत 30% वाढ होऊ शकते. गरोदर आईने सकस आहार घेणे, रोजच्या रोज नियमित व्यायाम करणे, कुठल्याही प्रकारचा ताण-तणाव न घेणे आवश्यक आहे.
होमिओपॅथिक उपचार : आजपर्यंतच्या संशोधनाने हे सिद्ध झालेले आहे की, होमिओपॅथिक औषधी गर्भजल पातळी वाढवण्यासाठी सर्वात जास्त फायद्याची ठरत आहे आणि या औषधीचा इतर औषधींपेक्षा ब-याच रुग्णांवर जास्त फायदा झाल्याचे सिद्ध झाले आहे. होमिओपॅथिक औषधी आईच्या रक्तातील क्षार आणि पाणी यामध्ये निर्माण झालेला असमतोल सुधारून समतोल तयार करतात. परिणामी, गर्भजलपातळी वाढते. होमिओपॅथिक औषधी तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावी. योग्य निवडलेले औषध लवकरात लवकर फायदा मिळून देते. ब-याच रुग्णांमध्ये उपचाराच्या पहिल्या ६ ते ७ दिवसांतच फायदा झाल्याचे दिसून आले आहे.
उपचाराचे फायदे : होमिओपॅथिक उपचाराने गर्भजलपातळी लवकरात लवकर वाढते आणि गर्भजलपातळी वाढून बाळाची वाढदेखील चांगली होण्यास मदत होते. नैसर्गिक प्रसूती होण्यासदेखील याचा फायदा झाल्याचे सिद्ध झाले आहे.