आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Ravi Javalgekar, Solapur Article About Medicine Tinospora, Niramay Divya Marathi

औषधी वनस्पती गुळवेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नावे - संस्कृत - गडूची, अमृता. हिंदी - गिलोय. इंग्रजी- tinospora. लॅटीन- tinospora cordifplia.
>वर्णन - गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्‍या बारीक दोर्‍यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते.

गुळवेलीची अमृतासमान, रसायनी वा वयस्था (तारुण्याचे रक्षण करून म्हातारपण व रोगाचा नाश करणारी) अशी आयुर्वेदीय समर्पक नावे आधुनिक संशोधनाने यथार्थ ठरली आहे.

> कांड - गुलवेलीचे कांड हे मांसल, गोलाकार हिरवे असून चवीला कडवट असते. कांडातून जागोजागी बारीक दोर्‍यासारखे तणाव फुटतात व त्यांच्या आधारानेच गुलवेल वर चढते. वाळलेले कांड बाहेरून धुसर रंगाचे, वर पातळ पापुद्रा असणारे ढिसूळ सहज तुटणारे, आतून चक्राकार दिसणारे असते. कांड मध्यम उष्ण गुणाचे असते.

> पाने - पाने हिरवीगार हृदयाकाराचे गुळगुळीत, चवीला कडवट व मध्यम उष्ण गुणाची असतात. कांड व पानामध्ये गिलॉइन या नावाचे मुख्य औषधी तत्त्व असते.

औषध उपयोगी अंगे- कांड व पाने
> मात्रा - वाळलेले कांड व पानाचे पूर्ण 1-3 चमचे दिवसातून 3-4 वेळा घेऊन वर दूध साखर घ्यावे.
> काढा - 4-8 चमचे दिवसातून 2-3 वेळा घेऊन वर पाणी प्यावे.
> गुळवेल सत्त्व - पाव ते अर्धा चमचा दिवसातून 3-4 वेळा घेऊन वर दूध साखर घ्यावी.

उपयोग
1. रसायन कार्यासाठी - प्रत्येकाने दररोज सकाळ व संध्याकाळ 1-1 चमचा घेऊन वर गाईचे दूध पिल्यास आरोग्य चांगले राहून तारुण्याचे रक्षण होते. मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमधील प्रा. डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी केलेल्या संशोधनात गुळवेलीमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते व निरोगी राहते असे आढळून आले आहे.
2. मधुमेहात उपयुक्त - गुळवेलीमुळे मधूमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होते. तसेच मधुमेहामध्ये होणारे मज्जादाह(न्यूरायटिस), अंधत्व (आॅप्टिक न्यूरायटिस) इत्यादी उपद्रव टळण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढते.
3. हृदयरोगात उपयोगी - गुळवेलीमुळे रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते. वृद्ध लोकांनी व हृदयविकाराच्या रुग्णांनी गुळवेलसत्त्व किंवा अमृतारिष्ट घ्यावे.
4. मुरलेल्या जुन्या तापामध्ये- गुळवेलसत्त्व फार गुणकारी ठरते.
5. यकृतविकार, कावीळ- गुळवेलसत्त्व अर्धा चमचा अधिक हळद अर्धा चमचा अधिक मध 1 चमचा दिवसातून 3-4 वेळा देणे.
6. पंडुरोग रक्तक्षय- गुळवेल रक्त घटक वाढवते. गुळवेलसत्त्व वा अमृतारिष्ट घ्यावे.
7. शुक्रधातूवर्धक (व्रण्य)- स्त्री-पुरुषांच्या जननसंस्थेच्या विकारावर गुळवेल फार उपयोगी आहे. गुळवेलीचे चूर्ण घेऊन वर दूध साखर घ्यावे.
8. मानसिक ताणतणाव कमी होतो- गुळवेलीमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. असे आता अधुनिक शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झाले आहे. गुळवेलीचा परिणाम अ‍ॅड्रिनल या अंत:स्रावी ग्रंथीवर होऊन त्या ग्रंथीच्या अ‍ॅड्रिनॅक्लीज या अंत:स्रावावर नियंत्रण येते. या अंत:स्रावामुळे यकृतातून रक्त प्रवाहात जी शर्करा मिसळली जाते. गुळवेलीमुळे इन्शूलिन या अंत:स्रावाची शर्करेवर चांगली प्रक्रिया होऊन परिणामी रक्तामधील साखरेचे नियंत्रण राखले जाते. त्याचा मधुमेहीला चांगलाच उपयोग होतो.

गुळवेलीचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्व थोडक्यात
1. यकृतोत्तेजक कार्य - यकृत हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. सुमारे 500 महत्त्वाची कार्ये व 1000 विविध पाचक स्राव निर्माण करणारे शरीरातील हे एकमेव इंद्रिय आहे. गुळवेलीमुळे यकृताचे कार्य चांगले होऊन आपले आरोग्य चांगले रहाते, कारण यकृतामुळे शरीराच्या सर्वच अवयवांचे कार्य सुधारते.

2. हृदय कार्य - गुळवेलीमुळे हृदयाचे रक्ताभिसरण सुधारतेच, शिवाय मानसिक ताण कमी होत असल्याने सध्याच्या तणाव युगातील (stress-age) सततच्या मानसिक ताणतणावामुळे हृदयावर होणारे दुष्परिणामही टळून हृदय बळकट बनते.

3. रसायन कार्य - आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यामुळे गुळवेलीचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते. म्हणूनच आपण प्रत्येकाने अगदी तुळशीप्रमाणेच गुळवेलही आपल्या परसात लावून दररोज गुलवेलीची ताजी 4-6 पाने चावून खावीत. ते शक्य नसल्यास गुळवेलसत्त्व खात्रीच्या जुन्या आयुर्वेदिक कंपनीचेच वापरावेत, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. दररोजच्या गुळवेलीच्या सेवनाने आपले तारुण्यरक्षण होऊन म्हातारपण दूर राहीलच, पण व्याधीचाही प्रतिकार होऊन शरीर निरोगी, सतेज राहील यात शंका नाही.

बाजारात मिळणारी गुळवेलीची औषधे
अमृतारिष्ट, गुडुच्यादी चूर्ण, गुडुच्यादी क्वाथ (काढा). गुडुची लोह (पंडुरोगात अत्यंत उपयोगी) गुडुची सत्त्व. गुडुची तेल - त्वचारोग व वेदना कमी करण्यासाठी बाहेरून लावावे.