आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Ravindra Mali Article About Natural Feeling, Divya Marathi

शरीरातील नैसर्गिक संवेदना अडवू नका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेद शास्त्रात रोगनिवारणाइतकेच महत्त्व स्वास्थ्य रक्षणास आहे. आरोग्य रक्षणासाठी आहार - विहारातील योग्यता (पथ्य) पालनाने विकार उत्पत्तीला कारण न घडल्याने विकार होणारच नाही. विहारात आपले सभोवतालच्या वातावरणात राहणे, वागण्याच्या सवयी, हालचाली यांचा समावेश होतो. विकार निर्माण होण्यासाठी विहारातील चुका या कारणीभूत ठरतात. इथे आपण नित्याच्या घडणार्‍या विहारातील अयोग्य अशा बाबींपैकी शरीरातील ‘अधारणीय’ अशा ‘वेगांचे’ धारण करणे हे अनेक विकारांचे कारण कसे ठरते, याचा विचार महत्त्वाचा आहे. प्रथमत: वेग म्हणजे काय हे पाहू. शरीरात घडणार्‍या अनेक क्रियांचे फलस्वरूप काही नैसर्गिक संवेदना, प्रवृत्ती उत्पन्न होत असतात. त्यांचा हा उद्रेक शरीरक्रिया व्यवस्थित चालू राहण्यासाठीच होतो. अशाच संवेदनांना आपण वेग म्हणतो. जसे आहार सेवनानंतर त्याचे पचन व शोषण होऊन त्याचे शरीर धातूंत परिगमन होते. या क्रियांदरम्यान मल, मूत्र हे टाकाऊ स्वरूपात निर्माण होतात. त्यांचे शरीराबाहेर पडणे हे स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य असते. परंतु बर्‍याच वेळा संकोच किंवा इतर काही कारणास्तव आपण हे वेग अडवून धरतो म्हणजेच त्यांचे धारण करतो आणि त्यामुळे प्राकृत शरीरक्रिया बिघडते. वात, पित्त, कफ यांचे प्राकृत स्वरूप बिघडून ते अनेक विकार उत्पन्न होण्यास कारणीभूत ठरते. अशा काही नैसर्गिक संवेदना किंवा वेग पुढीलप्रमाणे आहेत. मलवेग, मूत्रवेग, अपानवायू (गुदद्वारातून सरणारा वायू), शुक्रवेग, छर्दी (उलटी) वेग, शिंक, उद्गार (ढेकर) वेग, जृंभा (जांभई), क्षुधावेग (भूक), तृष्णावेग (तहान), अश्रूवेग, निद्रावेग (झोप), श्वास वेग (परिश्रमाने उत्पन्न श्वासगती).
शरीरात उत्पन्न होणार्‍या काही नैसर्गिक प्रवृत्ती होत. यांची ज्या वेळी संवेदना होईल तेव्हा त्यांस अडवू नये. वेग धारणाने शरीरात काय काय विकृती उत्पन्न होऊ शकतात ते पाहू.

1) मलवेग धारण : ज्या वेळी आपणास मलप्रवृत्तीची जाणीव होईल तेव्हा मलप्रवृत्तीस अडविल्याने मोठे आतडे, शिरोभागी, पोटर्‍यांत वेदना उत्पन्न होतात. तसेच पुढेही नेहमीसाठी मलावष्टंम् (बद्धकोष्टता) उत्पन्न होतो, पोटात गॅसेस साठतात, अस्वस्थता वाढते.

2) मूत्रवेग धारण - मूत्र प्रवृत्तीची संवेदना उत्पन्न झाल्यानंतर मूत्रप्रवृत्ती टाळल्यास मूत्राशय, ओटीपोटात वेदना, शिरोभागी वेदना, मूत्राशयास सूज, मूत्रप्रवृत्ती मोकळी न होणे, अशा विकृती निर्माण होतात.

3) अपानवायू वेग धारण - मोठ्या आतड्यांत निर्माण झालेला वायू हा ज्या वेळी गुदद्वारातून बाहेर पडण्याची संवेदना उत्पन्न होते, तेव्हा जर तो थांबवला तर तो ऊर्ध्व दिशेस जातो व अनेक विकृती उत्पन्न करतो, जसे पोटात वेदना, पोटात वायू धरणे, थकवा, शिर:शूल, पचनाचे विकार, भूकेची विषमता, इतर सर्व वाताचे विकार, नेहमीची सर्दी, दमा आदी.

4) शुक्रवेग धारण - मैथून समयी शुक्रवेग अडविल्याने मूत्रेंद्रिय, वृषण यात वेदना होतात. शुक्राशय, हृदय, पौरुषग्रंथी यात वेदना व सूज उत्पन्न होते. शुक्रधातूचे प्राकृत स्वरूप बिघडते, मूत्रप्रवृत्ती मोकळी होत नाही. कधी कधी याचा परिणाम मानसिकतेवरही होतो.

5) छर्दी (उलटी) वेग धारण : उलटीची संवेदना होत असताना जर उलटीचा वेग अडवला व असे वारंवार घडत राहिले तर अन्नाबाबत तिटकारा, तोंडाची चव जाणे, त्वचा विकार, ताप, मळमळ, शिर:शूल, पचन विकृती उत्पन्न होतात. सुरुवातीला दोष बाहेर पडत असल्याने उलटीचे काही वेग अडवू नये. शरीरातून पाणी प्रमाण कमी होऊन थकवा वाटायला लागल्यानंतर मात्र उलट्या थांबवण्यासाठी उपचार करावा.

6) शिंकेचा अवरोध - शिंकेची नैसर्गिक प्रेरणा अडविल्याने मानेत ताठरता, शिर:शूल, अर्धशिशी, ज्ञानेंद्रियांची दुर्बलता, इतर शिरोविकार, सर्दी असे विकार होतात. नेहमी अवरोध होत असल्यास चेहर्‍याचा लकवा होण्याची भीती असते. गंध ग्रहण विकृतीही याने संभवू शकते.

7) उद्गार वेग धारण - ढेकर वेग अडविल्यास उचकी, हृदय व छातीत जखडल्यासारखे होणे, जेवणावर अनिच्छा, कंप उत्पन्न होतात.

8) जृंभावेग धारण - जांभई आल्यानंतर ती थांबविल्याने सर्वांग जखडल्याप्रमाणे वाटते, शरीरात कंप, शून्यता उत्पन्न होते, डोके जड वाटते, शिरोविकार व नेहमीच्या अशा अवरोधाने झटके येणे, अशा विकृती उत्पन्न होतात.

9) क्षुधावेग धारण - भूक संवेदना जेवण न घेतल्यास कृशता, दुर्बलता, शरीराचा वर्ण परिवर्तन, जेवणात अरुची, चक्कर येणे, भूक अनियमित, अशा विकृती उत्पन्न होतात.

10) तृष्णावेग अवरोध - तहान लागल्यावर पाणी न पिल्याने घसा व तोंडास कोरड पडणे, कर्णबधिरता, थकवा, हृदयात पिडा उत्पन्न होतात. शरीरात तहान लागल्यावर आवश्यक असताना पाणी न पिल्यास रसक्षयाची लक्षणे उत्पन्न होतात.

11) अश्रूवेग धारण - आनंदाश्रू अगर दु:खाश्रू यांना अडविल्याने सर्दी, नेत्ररोग, हृदयांचे विकार, थकवा, जेवणात अरुची, चक्कर येणे, मानसिक विकृती उत्पन्न होतात.

12) निद्रावेग धारण (झोप) - रात्री नैसर्गिक झोपेची प्रवृत्ती उत्पन्न झाल्यानंतर झोप न घेतल्यास अंगात जखडल्याप्रमाणे होणे, एकप्रकारची तंद्रा, अस्वस्थता येणे, शिर:शूल, डोळे जड होणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होणे, मानसिक विकार, पित्तविकार व वातविकार उत्पन्न होतात.

13) श्रमजन्य श्वास अवरोध - धावपळ केल्यावर धावण्याने उत्पन्न झालेली श्वसनगती म्हणजे जलद श्वसन असताना श्वसनवेग अडविल्याने हृदयरोग, श्वसनविकार, शरीरास योग्य प्राणवायू न मिळणे, फुफ्फुसांचे विकार उत्पन्न होतात.

लोभ, ईर्षा, द्वेष, मत्सर या प्रवृत्तींना आवर घालणे आवश्यक
मल व मूत्र वेगाचे धारण करू नये, असे असले तरी या क्रिया बळजबरीनेही उत्पन्न करू नये हे लक्षात घ्यावे. त्यामुळेही विकार उत्पन्न होतात. जसे वरील अधारणीय वेगांचे धारण करणे हे स्वास्थ्यप्रद असतात. जसे लोभ, ईर्षा, द्वेष, मत्सर अशा प्रवृत्ती आपल्यात निर्माण होऊ नये म्हणजेच त्यांचे धारण करावे. अगदी सहज घडणार्‍या दैनंदिन जीवनातील काही चुका आपणास एखाद्या गंभीर विकाराकडे घेऊन जातात. त्यातीलच हे अधारणीय वेगांचे धारण करणे हे एक.
(ravindra.mali33@gmail.com)