आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. Parag Joshi Article About Attention Deficit Disorder Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ध्यानशून्यतेची विकृती; ‘अ‍ॅटेंशन डिफिसिट डिसॉर्डर’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचा पालक हा एक जागृत पालक आहे व आपल्या पाल्याच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल संवेदनशील आहे. काही पालक आमच्याकडे ज्या तक्रारी घेऊन येतात त्या अशा -
1) मुलाची अभ्यासात गती नाही
2) तो एकलकोंडा झाला आहे
3) त्याची एकाग्रता फार कमी आहे
4) तो फार चंचल आहे. एका जागी स्थिर राहत नाही. सारखा इकडून-तिकडे करत राहतो
5) याला शिक्षकांना फार रागवावे लागते
6) याला चांगले मित्र नाहीत, वगैरे...
पालकांनो सावध व्हा. ही सगळी लक्षणे एका मानसिक आजाराची असू शकतात. ज्याला ‘ध्यानशून्यतेची विकृती’ किंवा ‘अ‍ॅटेंशन डिफिसिट डिसॉर्डर’ असे म्हणतात. या आजाराचे नेमके कारण अजून स्पष्टपणे सांगता येणार नाही, परंतु काही ठोकताळ्यांवरून असे लक्षात येते की,
मुदतपूर्व प्रसूतीत जन्मलेली बाळे, खूप कमी वजनाची बालके, जन्माच्या वेळी चुकून बालकाच्या मेंदूला काही इजा झाली असल्यास किंवा जन्माच्या वेळी प्राणवायूची
कमतरता पडली असल्यास ही विकृती पुढे जाऊन अशा बालकांमध्ये निर्माण होऊ शकते.
या आजाराची ठळक लक्षणे
पुढीलप्रमाणे सांगता येतील
1) अशा मुलांना डावे-उजवे असा फरक लवकर समजत नाही. कोणता जोडा कोणत्या पायात घालावा, लेस कशी बांधावी ते जमत नाही.
2) अशी इंग्रजी मुळाक्षरे, ज्यांना आपण ‘दर्पण प्रतिमा’ म्हणतो, त्यांना ओळखण्यात गोंधळ होतो. उदाहरणार्थ बी व डी, पी व क्यू, ‘आर’ हे उलटे लिहितात. डीबाबतही तसेच.
3) अशा मुलांना वाचनाचा कंटाळा असतो
4) एखाद्या कृतीचे अनुकरण करणे त्यांना कठीण जाते
5) पुस्तकातील आकृती वहीवर उतरवताना त्रास होतो
6) सांघिक खेळात किंवा ज्या खेळात वैयक्तिक निर्णय क्षणार्धात घ्यावे लागतात किंवा अचूक वेळ पाळावी लागते त्यात ही मुले मागे पडतात. बॅटिंग, क्षेत्ररक्षण व अचूक झेल घेणे त्यांना जमत नाही.
7) कप्तानाने, शिक्षकाने दिलेली आज्ञा ते पाळू शकत नाहीत. कारण त्यांच्यात संदिग्धता किंवा सतत गोंधळ असतो.
8) अशा मुलांची शीघ्र स्मरणशक्ती (शॉर्ट मेमरी) कमी असते. त्यामुळे आज शिक्षकाने काय शिकवले ते सांगता येत नाही. आठवून लिहिता येत नाही. स्मरणचित्रे काढता येत नाहीत
9) लक्ष लवकर विचलित होते. स्थिरता नाही. अतिचंचलता व क्षणोक्षणी उत्तेजित होणे (हायपरअ‍ॅक्टिव्ह अँड इम्पल्सिव्ह) सारखी वस्तूंची चाळवाचाळव करणे. इकडून तिकडे उगाचंच येरझारा घालणे इत्यादी.
उपचार
या रोगावर सांघिक व एकत्रित उपचाराची गरज आहे. बालमानस रोग तज्ज्ञ, समुपदेशक, आई-वडील, शिक्षक, बालरोग तज्ज्ञ या चमूने मदत करावी. मुलांना सतत दूषणे लावू नये. वयाच्या मानाने आगाऊ आहे, सतत अस्वस्थ असतो. चूपचाप राहत नाही, असे वारंवार म्हणू नये. रोगाचे व्यवस्थापन शांतपणे, सहजपणे व टप्प्याटप्प्याने करावे.
संपूर्ण साफल्याची अपेक्षा ठेवू नये. उपचार करणार्‍या चमूने भाषणबाजी करत राहू नये. रोग्याला शांतपणे समजून घ्यावे. ऐकून घ्यावे. रोग्याची स्तुती व टीका याचे संतुलन ठेवावे. क्रियाकल्प व्यवस्थित संचालित करावा. निरनिराळ्या योजलेल्या क्रिया व अभ्यास योजनाबद्ध पद्धतीने करून घ्यावा.
शाळेतल्या शिक्षकाचा यात महत्त्वाचा वाटा आहे. त्याने अशा मुलाला झिडकारू नये. त्याचा चार चौघांसमोर पाणउतारा करू नये. त्याला विश्वासाचे मित्र मिळवून द्या. मित्रांसमोर त्याला चांगले म्हणा. त्याला कठीण जात असेल असे गृहकृत्य किंवा अभ्यास टप्प्याटप्प्याने करवून घ्या. तो ज्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपला हलके सुलभ गृहकृत्य द्या. ते यशस्वी केल्यास शाबासकी द्या. सारखे प्रोत्साहन देत चला व प्रगतीचा उल्लेख डॉक्टरांना देत चला.
औषध योजना
अशा प्रकारच्या सगळ्याच मुलांना तोंडावाटे औषधे देण्याची गरज नसते. बरीचशी मानसोपचाराने व घरातील योग्य वातावरणानेच सुधारतील, परंतु थोड्या मुलांना
विवाक्षित प्रकारची दीर्घकालीन औषध योजना लागण्याची गरज असावी. ती त्या मुलाच्या सामान्य प्रकृतीवर व लक्षणांच्या तीव्रतेवर अवलंबून राहील व त्या औषध योजनेचा निर्णय डॉक्टरवरच सोपवलेला बरा!