आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Amol Annadate Article About Cord Blood Banking

फसवणुकीची नाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय-बच्चन सध्या दूरचित्रवाहिनीवर ‘कॉर्ड ब्लड बँकिंग’ किंवा ‘स्टेम सेल बँकिंग’ करणार्‍या एका खासगी बहुराष्ट्रीय कंपनीची जाहिरात करते आहे. या जाहिरातीत ‘मी माझ्या बाळासाठी हे केले आहे, आपणही करणार का?’ असा भावनिक प्रश्न पालकांना विचारते आहे. या भावनिक आवाहनाला भुलून अनेक मध्यमवर्गीय पालक अगदी मासिक हप्त्याने एक-दीड लाख रुपये भरून आपल्या नवजात बालकाच्या नाळेतील रक्त या कॉर्ड ब्लड बँकिंग करणार्‍या साठवणूक केंद्रांकडे देत आहेत किंवा देण्याचा विचार करत आहेत.
स्टेम सेल्स अथवा मूलपेशी म्हणजे काय आणि कॉर्ड ब्लड बँकिंग कशाला म्हणतात, याची यत्किंचितही माहिती नसलेल्या आपल्या समाजाची या कॉर्ड ब्लड बँका किती सहज फसवणूक करत आहेत, हेच यावरून स्पष्ट होत आहे. तुमच्या बाळाला भविष्यात कुठलाही असाध्य रोग झाला, तर तुम्ही दिलेल्या नाळेच्या तुकड्यातून आम्ही अमृत काढून तो त्याचा आजार बरा करू, हा दावा करणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्या आपली भावनिक फसवणूक करत आहेत, हे लोकांना कोणी तरी सांगायला हवे. मुळात स्टेम सेल्स म्हणजे काय, हे आपण समजून घेऊया. स्टेम सेल्स म्हणजे पेशींची अशी प्राथमिक अवस्था, जी स्वत:ची विभागणी करून अनेक चांगल्या दर्जाच्या पेशींना जन्म देऊ शकते. मानवी शरीरातील बोन मॅरो (हाडांच्या आतील पेशी), जन्मजात बालकांच्या नाळेतील रक्त अशा गोष्टींमधून हे स्टेम सेल्स मिळवले जाऊ शकतात. नेमक्या या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून अगदी तुरळक प्रमाणात आढळणार्‍या आजारांची भीती दाखवून पालकांना आपल्या बाळाच्या नाळेतील रक्त साठवण्याचे आवाहन या कॉर्ड ब्लड बँका करत आहेत. एखाद्याने आपल्या बाळाच्या काळजीतून हे करणे काही वावगे नाही; पण खरंच असा आजार झाल्यास या पेशींचा वापर करून स्टेम सेल ट्रान्सप्लांट करण्याची व्यवस्था आज भारतात किती हॉस्पिटल्समध्ये आहे? त्यासाठी किती खर्च येतो? हे उपचार घेऊनही तो असाध्य आजार खरंच बरा होईल का? आणि नाळेच्या रक्तातून उपलब्ध असलेल्या स्टेम सेल्स हे खरंच उपचारांसाठी उपयुक्त ठरतील का? या प्रश्नांची उत्तरे दडवून केवळ एक लाख रुपये खर्चून आपण आपल्या बाळाच्या भविष्यासाठी काही तरी खूप मोठे कार्य करत आहोत, या खोट्या आनंदात पालकांना न्हाऊ घालण्याचा प्रकार निश्चित खेदजनक आहे.
भारतात अलीकडेच अस्तित्वात येऊ लागलेल्या या ‘कॉर्ड ब्लड बँक’च्या साठवणुकीचा दर्जा कितपत चांगला आहे, हे अजून कोणालाही ठाऊक नाही. नाळेतील हे रक्त साठवण्यासाठी नाळेला लवकर चिमटा लावल्यास बाळाला रक्तप्रवाह कमी पडू शकतो, याचे भान ठेवणेही गरजेचे आहे. अमेरिकेसारख्या देशात, जिथे अनेकांनी मोफत दान केलेल्या नवजात बालकांच्या नाळेतील रक्तदानातून, पब्लिक कॉर्ड ब्लड बँक्स म्हणजेच सार्वजनिक व मोफत वापरासाठी उभ्या केलेल्या ‘कॉर्ड ब्लड बँक्स’ आहेत, तिथे असा अनुभव आला, की प्रत्यक्षात गरज पडली तेव्हा 75 टक्के सॅम्पल्समधून पुरेशा स्टेम सेल्स मिळाल्याच नाहीत. थोडक्यात, तुम्ही साठवण्यासाठी दिलेल्या तुमच्या बाळाच्या नाळेतील रक्तातून पुरेशा स्टेम सेल्स मिळतीलच, असे नव्हे. अनेक असाध्य आजारांच्या उपचारांसाठी स्टेम सेल प्रत्यारोपणाचा पर्याय पुढे येतो, तेव्हा नाळेतील रक्तामध्येही तोच दोष असतो. अशा वेळी इतर दात्यांकडून स्वीकारलेल्या निर्दोष स्टेमसेलचाच वापर करावा लागतो. काही देशांमध्ये खासगी ‘कॉर्ड ब्लड बँकिंग’च्या उपयुक्ततेच्या अभ्यासानंतर ‘रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनॅकोलॉजी’ या संघटनेने अशा प्रकारे नाळेतील रक्त साठवणे उपयुक्त नसल्याचा निर्वाळा दिला आहे. साठवायचेच असेल तर प्रत्येक बालकाच्या नाळेतील रक्त शासकीय पातळीवर साठवावे व गरजू व्यक्तींना मोफत वापरू द्यावे, असेही या संघटनेने म्हटले आहे.
मुळात, असाध्य आजारांसाठी स्टेम सेल प्रत्यारोपण व्यवस्था आता कुठे भारतात रुजू पाहते आहे. या प्रत्यारोपणानंतर जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून रुग्णाला 21 दिवस ‘झीरो एन्व्हायर्नमेंट’ म्हणजे धुळीचा एक कणही नसलेल्या वातावरणात ठेवावे लागते. या उपचार पद्धतीसाठीचा आजचा खर्च 50 लाखांच्या घरात आहे. एवढे करूनही या उपचारांच्या यशस्वितेबद्दलची कुठलीही शाश्वती नाही आणि मुळात या असाध्य आजारांची भीती बाळगणे म्हणजे जन्म न झालेल्या बाळाच्या डोक्यावर भोपळा पडून भविष्यात त्याला इजा होईल, अशी भीती बाळगण्यासारखे आहे.
खरे तर असंख्य आनुवंशिक आजार गरोदर स्त्रीने रोज 10 पैशांची एक फॉलिक अ‍ॅसिडची गोळी खाल्ल्यास टळू शकतात; पण या फॉलिक अ‍ॅसिडची जाहिरात करण्यास आम्हाला कोणतीही नायिका भेटणार नाही. काही वर्षांपूर्वी चंद्रावर वसाहत होणार, असे खोटे स्वप्न दाखवून अमेरिकेतल्या काही बनेल मंडळींनी अनेकांना चक्क चंद्रावरचे प्लॉट्स विकले होते. असाध्य आजारांच्या उपचाराचे गाजर दाखवणार्‍या ‘कॉर्ड ब्लड बँकां’कडून सध्या असाच प्रकार सुरू आहे. सध्या मृत्यूनंतर तुमचे शरीर फ्रिज करून ठेवल्यास काही वर्षांनी आम्ही ते जिवंत करू, असा दावा अमेरिकेतील एका कंपनीने केला आहे व यासाठी धडाक्यात बुकिंगही सुरू आहे. भविष्यात भारतातही एखादा सुपरस्टार या कंपनीची जाहिरात करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.