आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Prakash Joshi Article About Captain Robert Scott, Divya Marathi

स्कॉटची शोकांतिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅप्टन रॉबर्ट स्कॉट हा ब्रिटिश वीर. धाडसी मोहिमा आखणं हा त्याचा स्वभावधर्म. अनेक धाडसी पराक्रम त्याच्या नावावर. अंटार्क्टिकावर हवाई प्रवास करणारा पहिला मानवही तोच. हा पराक्रम त्याने 4 फेब्रुवारी 1902 रोजी केला. अंटार्क्टिक आइसशेल्फचे निरीक्षण करण्यासाठी हायड्रोजन बलूनमधून त्याने हवाई उड्डाण केले.

कॅप्टन स्कॉट आणि अंटार्क्टिका हे संबंध राधा-कृष्णासारखे दृढ. अंटार्क्टिकाअंतर्गत प्रवासाला तो निघाला, त्या वेळी सोबत बारा माणसे आणि कुत्र्यांच्या दोन गाड्या होत्या. साथीला त्याच्यासारखाच धाडसी वीर शॅकल्टन होता. दक्षिणेला 79 अक्षांशापर्यंत त्यांनी मजल मारली. तिथं त्यांचं जहाज बर्फात अडकलं. पुढचे चार महिने त्यांना तिथंच घालवावे लागले.

पुढे 1904 मध्ये दुसरी मोहीम आखली गेली. तेव्हा स्कॉट आणि शॅकल्टनसोबत डॉ. विल्सन हे संशोधकही होते. प्रथम ते रॉस बेटावर आले. तेव्हा त्यांनी बांधलेली झोपडी अजून शाबूत आहे. मग ते भू-प्रवासाला लागले. दक्षिण ध्रुवाचा शोध हे त्यांचं उद्दिष्ट होतं. अनेक हिमवादळांना तोंड देत ते 9 डिसेंबरला साडेऐंशी अक्षांशावर (द.) पोहोचले. तोपावेतो त्यांच्या भारवाहक कुत्र्यांपैकी पाच कुत्री मरण पावली. 27 डिसेंबर रोजी त्यांनी सव्वात्र्याएेंशी अक्षांशापर्यंत मजल मारली. इथून द. ध्रुव 900 कि.मी. दूर होता. तथापि शॅकल्टनला आजाराने घेरलं. सर्दी-खोकल्याबरोबरच तो रक्तही थुंकू लागला. नंतर हिमवादळांनी त्यांना एवढं सतावलं, की त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला.
3 फेब्रुवारी 1905 रोजी ते जहाजावर येऊ शकले. दाढी, गरम पाण्याने स्नान, स्वच्छ कपडे, निवांत झोप अशी चैन त्यांना लुटता आली. ही मोहीम तशी अयशस्वी म्हणता येणार नाही. या मोहिमेत त्यांनी अत्यंत खडतर असा 500 कि.मी.चा पायी प्रवास केला, अनेक नवीन प्रदेशांचा शोध घेतला.

दक्षिण ध्रुवाचा शोध घेण्याचे भगीरथ प्रयत्न अनेक पथके करत होती. अपयशाने खचून न जाता शॅकल्टनने 29 ऑक्टोबर 1908 ते 5 मार्च 1909 असे 108 दिवस अविश्रांत श्रम घेऊन हे संशोधन पुढे रेटले. या मोहिमेत त्याने खेचरांचा वापर केला. त्याच्या पथकाने 88 अक्षांशापर्यंत मजल मारली. दक्षिण ध्रुव केवळ दोन अंश दूरवर होता. परंतु नियती काही वेगळीच होती. जिवावर बेतणारे अनेक प्रसंग उद्भवले. त्यांचा अन्नसाठाही संपून चालला होता. अन्नाशिवाय अंटार्क्टिकावर वास्तव्य म्हणजे, मृत्यूला आमंत्रणच. भूक आणि मानसिक वैफल्याने त्यांना ग्रासले. उद्देशाच्या अगदी नजीक येऊनदेखील त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. ही मोहीमदेखील अपयशी म्हणता येणार नाही. या मोहिमेत त्यांना माउंट एरेबस या साडेबारा हजार फूट उंचीच्या पर्वतरांगांचा शोध लागला. मुख्य म्हणजे, दक्षिण ध्रुवाकडे जाणारा मार्ग त्यांना गवसला. भविष्यातील मोहिमांना हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरले.

त्यानंतर निरनिराळ्या देशांच्या पथकांनी द. ध्रुवाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दक्षिण ध्रुवावर पहिले मानवी पाऊल उमटवण्यात अ‍ॅम्युंडसेनचं नॉर्वेजियन पथक यशस्वी झालं. त्याने 14 डिसेंबर 1911 रोजी नॉर्वे देशाचा ध्वज दक्षिण ध्रुवावर फडकवला. त्याच्यासमवेत त्याचे चार सहकारी होते. श्वानकुळांची पावलंही त्याच दिवशी दक्षिण ध्रुवावर उमटली. भारवाहनासाठी पथकाने सहा कुत्र्यांच्या गाड्या आणि 86 कुत्रे यांचा वापर केला होता.

आपल्या चार सहकार्‍यांसमवेत कॅ. स्कॉट 17 जानेवारी 1912 रोजी द. ध्रुवावर पोहोचला. अ‍ॅम्युंडसेनचं पथक एक महिना आधी पोहोचल्याचं ज्ञान त्याला झालं. त्याने तिथे युनियन जॅक फडकवून त्याला मानवंदना दिली. कॅप्टन स्कॉट अत्यंत भावनाप्रधान, हळवा माणूस होता. दक्षिण ध्रुवावर पाऊल रोवणारे आपण पहिले मानव नाही, याचे त्याला अत्यंत दु:ख झाले. स्कॉटच्या विलंबाचे कारण म्हणजे, काही अंतरापर्यंतच त्याने खेचरांचा वापर केला होता. बहुतांश अंतरावर भारवहनासह इतर श्रमाची कामे त्याच्या पथकातली माणसेच करत होती.
विमनस्क मन:स्थितीत स्कॉटचे पथक परतीच्या मार्गाला लागले. या प्रवासात त्यांना खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागले. दक्षिण ध्रुवाकडे मार्गक्रमण करताना वाटेत ते छावण्या उभ्या करत होते. परतीच्या प्रवासात त्यांचा त्यांना उपयोग होत होता. अशाच एका छावणीपासून ते केवळ 17 कि.मी. दूर असताना एका मोठ्या हिमवादळाने जोर धरला. या हिमवादळाने सतत दोन महिने थैमान घातले. त्यांचा अन्नसाठा संपुष्टात आला. सर्व पथक हायपोथर्मियाची शिकार झाले. वीरांची अशी शोकांतिका झाली.

स्कॉटच्या रोजनिशीवरून मोहिमेची यथासांग माहिती मिळू शकली. रोजनिशीत शेवटचे वाक्य होते, ‘माझ्या सहकार्‍यांची काळजी घ्या.’ सहकार्‍यांविषयी केवढी आस्था! मरतेसमयी स्कॉटचा निर्जीव हात एका सहकार्‍याच्या शवावर होता. स्कॉट ममताळू होता. स्कॉट चांगलाच उमदा आणि देखणा होता. त्याच्या पत्नीचं त्याच्यावर उत्कट प्रेम होतं. विवाहापूर्वी स्कॉटने तिच्याशी करार केला होता, स्कॉट आपले छंद जोपासेल; तिने तिचे जोपासावेत. कुणी कुणाच्या छंदाआड येऊ नये. स्कॉटवरच्या प्रेमामुळं त्याची पत्नी या कराराला राजी झाली. परंतु लग्नानंतरही स्कॉट सतत ध्रुवीय मोहिमांत व्यग्र असायचा. ‘असा करार केला, याचा पश्चात्ताप होतोय’, अशी कबुली त्याची पत्नी द्यायची. दक्षिण ध्रुवावर अमेरिकेचा तळ आहे. त्याचे नाव आहे, ‘अ‍ॅम्युंडसेन-स्कॉट स्टेशन’.

अंटार्क्टिकावर हायपोथर्मियाचा बाका प्रसंग आमच्यावरही आला होता. स्कॉटच्या शोकांतिकेशी तुलना करता येत नसली, तरी आमचा अनुभव म्हणून आम्हाला तो विसरता येत नाही...