आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Prakash Joshi About Rasik Article, Divya Marathi

...आणि स्कुआ कोकलू लागले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पोशाखाबाबतीत अंटार्क्टिकावर जसं काटेकोर राहावं लागतं, तसंच आहाराबाबतीतदेखील. तळांबाहेर कुठंही जायचं असेल, तर दोन-तीन दिवस पुरतील एवढे अन्नपदार्थ सोबत घेणं अनिवार्य असतं. त्यासंबंधी सूचनाही दिलेल्या असतात. पण आम्ही नेमकी घोडचूक केली होती...'

पोशाखाबाबतीत अंटार्क्टिकावर जसं काटेकोर राहावं लागतं, तसंच आहाराबाबतीतदेखील. तळांबाहेर कुठंही जायचं असेल, तर दोन-तीन दिवस पुरतील एवढे अन्नपदार्थ सोबत घेणं अनिवार्य असतं. त्यासंबंधी सूचनाही दिलेल्या असतात. पण आम्ही नेमकी घोडचूक केली होती. तीन तासांत काम उरकेल, या अंदाजाने आम्ही सोबत खाण्याचं काहीच घेतलं नव्हतं. आम्हाला कँप सोडून सहा-सात तास झाले होते. कँपवर पोहोचायला किती वेळ लागेल, सांगता येत नव्हतं.
पोट भूक लागल्याची जाणीव करून देत होतं. पोटात स्कुआ कोकलू लागले. (इथं कावळेबाबा नसतात.) तोवर जिवाच्या आकांताने कोकलत एक स्कुआ हल्ला करण्याच्या मिषाने आमच्यावर धावून आला. डॉ. हुसेननी एकत्र राहण्याचा सल्ला दिला. स्कुआला हाकलणं वगैरे कुठलीच प्रतिक्रिया न देण्याविषयी सांगितलं. स्कुआपासून होता होईल तेवढं दूर राहण्याच्या आम्ही प्रयत्नात होतो. परंतु जाणार तरी किती दूर? एका बाजूला खडकाळ कडा, तर दुसर्‍या बाजूला हिमनदी. (इकडे आड तिकडे विहीर, असंही इथं म्हणता येत नाही.) 挿जाये तो जाये कहाँ・गीतातलं माधुर्य संपून, समस्या सामोरी आली.
पाव-एक किलोमीटर पाठलाग केल्यावर समस्येने आमची पाठ सोडली. खडकाच्या खोबणीत स्कुआने अंडी घातली होती. आम्ही त्या अंड्यांची शिकार करू शकणार नाही, याची खात्री पटताच स्कुआ निर्धास्तपणे आपल्या तळावर चालता झाला. धास्ती होती, ती आम्हालाच. आम्ही आमच्या तळावर जिवंत पोहोचतो की नाही, अशी भीती वाटू लागली. अज्ञानातच सुख असतं. हायपोथर्मियाविषयी ज्ञान नसतं, तर किती बरं झालं असतं! फार फार तर यातनाहीन मरणाला सामोरं जावं लागलं असतं. आता धडपड चालली होती, यातनाहीन मृत्यूपासून स्वत:चा बचाव करण्याची.
अंटार्क्टिकावर थोडाफार झाडपाला उगवण्याची सवलत निसर्गाने दिली असती तर त्याचं काही बिघडणार होतं? निदान झाडपाला गिळून काही काळ ढकलता आला असता. डॉ. रेड्डीचं बरं होतं, ते सिगारेट पेटवून ‘हर फिक्र को धुए में उडाता चला’ म्हणू शकत होते. आमचं काय?
तोवर आठवण झाली, हेलिकॉप्टरमधून ओयासिसवर आम्हाला सोडणार्‍या वैमानिक कॅ. कटोचने आम्हाला प्रत्येकी एक चॉकलेट दिलं होतं. म्हणजे आम्ही चार चॉकलेट्सचे धनी होतो. कॅ. कटोचला मुलगी झाल्याचा टेलेक्स संदेश आला होता. त्याप्रीत्यर्थ त्याने ही गिफ्ट दिली होती. त्याच्या मुलीला दुवा देत आम्ही या खाद्यावर ताव मारण्याचं ठरवलं. डॉ. हुसेननी त्यातही मोडता घातला.
‘सबुरीने. आपल्याकडं एवढाच अन्नसाठा आहे.’
‘अंटार्क्टिका सर्व्हायव्हल’चे नियम आम्ही धुडकावून लावले होते, आणि आता मारे धोरणं आखत होतो.
सर्वानुमते दोन चॉकलेट्सवर ताव मारण्याचं ठरलं. दोन चॉकलेट्स भविष्याची तजवीज. वा रे धोरण!
रात्र की दिवस, प्रश्न नव्हता. परंतु घड्याळ पाहण्याची सवय काही जात नव्हती. चालताना थकावट जाणवत होती. पाठ ‘जड झाले ओझे’ गाणं गात होती. हे एवढं ओझं वाहायचं म्हणजे अधिकचा ऊर्जा-व्यय आलाच. म्हणजे, हायपोथर्मियाला आमंत्रणच. त्याबाबतीतही आम्ही धोरणं आखत होतो. त्यासाठी मोठे छिन्नी, हातोडे एका पाठपिशवीत कोंबले. एक छोटी छिन्नी-हातोडा डॉ. हुसेननी आपल्या जवळ ठेवला. वाटेत काही दुर्मिळ सँपल मिळालं तर? सँपल कलेक्शनची त्यांची हौस अजून फिटली नव्हती. ती पिशवी तिथंच ठेवण्याचं ठरलं. पुढं केव्हा तरी ती घेता येईल. ती पिशवी निळ्या रंगाची होती. त्या तपकिरी बर्फाळ भूभागावर ती उठून दिसेल, हा हिशेब. ‘या भागात आपण सापडलो नाही, पिशवी काय सापडणार?’ माझी शंका. ‘नाही मिळाली तरी चालेल. कॅम्पवर अवजारांचा आणिक एक सेट आहे.’
थोडंफार ओझं कमी झालं असलं तरी, त्या शिळा पार करणं श्रमाचं आणि कटकटीचंच होतं.
‘थोडी सँपल्सही कमी केली तर?’ एक विचार पुढं आला.
डॉ. हुसेननी सुरुवातीला त्याला विरोध केला. सँपल जमा करताना त्यांनी किती कष्ट घेतले होते, आम्ही पाहत होतो. पाषाणकड्यावर कुठं तरी त्यांची नजर जायची.
‘रेड्डी तो खडक
पाहिला का?’
‘त्यात काय पाह्यचंय? नीसचा खडक आहे तो.’
‘हो पण, त्यात अमुक एक मिनरल दिसतंय.’ गुलबकावलीचं फूल सापडल्यागत ते कुठल्या तरी खनिजाचं नाव घ्यायचे आणि पाठोपाठ त्या कड्यावर रोहण करायचे. कुठं तरी पाय रोवायला कपचा मिळायचा. त्यावर उभे राहून अत्यंत काळजीपूर्वक छिन्नी-हातोडीने सँपल काढायचे. अशी ही गुलबकावलीची फुलं फेकून द्यायची? परंतु अखेरीस या वीरालाही शरणागती पत्करावी लागली. शरणागतीतही त्यांनी कल्पकता दाखवली. छोट्या अवजारांनी सँपलचा नको तो भाग त्यांनी काढून टाकला. संशोधनाला आवश्यक तेवढा भाग प्लॅस्टिकच्या सँपल पिशवीत भरला. प्रयोगशाळेत करायचं काम त्यांनी त्या शिलाखंडावर केलं होतं.