आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Tushar Bodakhe Article About Panchkarma Ayurvedic

पंचकर्म : वैशिष्ट्यपूर्ण अनोखी उपचारपद्धती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुर्वेदिक उपचारांमध्ये केवळ पोटात देण्याची औषधी सर्वच व्याधींमध्ये तेवढी प्रभावी ठरत नाही. या औषधीबरोबरच चिकित्सा ग्रंथांमध्ये सांगितलेल्या विविध कर्मचिकित्सांचा अवलंब केल्यास रोगाचे समूळ उच्चाटन होऊन रोगी झटपट बरा होतो. म्हणूनच ‘पंचकर्म चिकित्सा’ आयुर्वेदातील वैशिष्ट्यपूर्ण उपचारपद्धती आहे.

पंचकर्म ही शोधनचिकित्सा आहे. या चिकित्सेचे शरीरात वाढलेले दोष हे जवळच्या मार्गाने बाहेर काढून टाकले जातात. पंचकर्म चिकित्सा केवळ रोगनिवारक नसून मनुष्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. तसेच आयुर्वेदाच्या कायचिकित्सा, ग्रहचिकित्सा, शल्यचिकित्सा इत्यादी उपांगांना ती पूरक आहे. चरकसंहितेमध्ये पंचकर्मात वमन, विरेचन, नस्य, निरुहबस्ती, अनुवासनबस्ती या पाच क्रियांचा समावेश केला असल्याचे आढळते.

वमन : शरीरातील दोषांचा मुखावाटे बाहेर काढून टाकण्याच्या शोधन क्रियेला वमन असे संबोधतात. (वमन म्हणजे औषधीद्रव्य देऊन उलटी करणे.) वमनाच्या साहाय्याने मुख्यत: कफदोष व आनुषंगिक पित्तदोष बाहेर काढला जातो.

विरेचन : शरीरातील दोषांना गुदावाटे बाहेर काढून टाकण्याच्या शोधन क्रियेला विरेचन असे म्हणतात. आमाशय हे पित्त व कफ या दोन्ही दोषांचे स्थान असल्याने विरेचनाच्या साहाय्याने हे दोन्ही शरीराबाहेर काढले जातात. विरेचन हे रक्तशुद्धीसाठीही उपयुक्त ठरते.

नस्य : नाकात औषधी टाकून केला जाणारा उपक्रम तो नस्य नाकाद्वारे औषधीद्रव्य सर्व शिर:प्रदेशातील उत्क्लिष्ट झालेल्या दोषांना बाहेर काढते. नस्यामध्ये दोषविचार (कफ, पित्त, वायू इ ) महत्त्वाचा नाही. तर स्थानवैगुण्य महत्वाचे.

बस्ती : वाताचे शमन करण्याच्या उपक्रमास बस्ती असे संबोधले जाते. या उपक्रमामध्ये औषधीद्रव्य विशिष्ट उपकरणाच्या साहाय्याने गुदावाटे शरीरात (एनिमाप्रमाणे) सोडले जाते. उपकरणाद्वारे गुदाव्यतिरिक्त अन्य शरीरप्रदेशाशी संबंधीत बस्तींना शिरोबस्ती, नेत्रबस्ती, व्रणबस्ती अशा शरीरसूचक नावाने संबोधतात.

रक्तमोक्षण : रक्तमोक्षणामध्ये दूषित रक्त त्वचेतील सिरांद्वारे बाहेर काढून टाकले जाते. रक्तमोक्षण हा रक्तदुष्टीजन्य व्याधींवरील शोधन उपचार आहे. जीवरक्त शरीराबाहेर जात असल्याने हा उपक्रम काळजीपूर्वक करावा लागतो. आयुर्वेदिक उपचार करताना कफदोष निवारणासाठी वमन, पित्तदोषासाठी विरेचन, वातदोषासाठी बस्ती, स्थानवैगुण्याच्या दृष्टीने नस्य व रक्तदुष्टीसाठी रक्तमोक्षण या प्रक्रियांचा वापर अत्यंत उपयोगी ठरत असल्याने आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरविण्यासाठी व रोगाचे समूळ उच्चटन करून रुग्णास लवकर रोगमुक्त करण्यासठी पंचकर्म चिकित्सेचा वापर अनिवार्य आहे.
(vdtusharbodkhe@gmail.com)