आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. D.G. Dhule Article About Women Health, XY, XX

... तर हा दोष नेमका कुणाचा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'महत्त्वाची बाब अशी की पुरुषाला असलेल्या अनेक वाईट सवयीमुळे जसे दारू, तंबाखू, सिगारेट इत्यादींचे सेवन, खानपानाच्या सवयी, बाहेरख्यालीपणा यामुळे य गुणसूत्रांवर फार मोठा वाईट परिणाम होऊन ते य गुणसूत्र आणखीनच अशक्त / दुबळे होते.'

आपल्या देशात असंख्य गोष्टींबद्दल गैरसमज पसरलेले असून ते इतके पक्के झालेत की अशा अडाणी गैरसमजांना कमी करणे वा नष्ट करणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. मुलगा किंवा मुलगी जन्मासंबंधीदेखील अनेक गैरसमज आहेत. एखाद्या मातेला जर मुलीच होत असतील तर त्याचा सर्व दोष फक्त मातेलाच दिला जातो. तिचा छळ होतो, तिचे जगणे मुश्किल केले जाते. मातेच्या उदरात वाढणारे बाळ हे स्त्रीलिंगी किंवा पुलिंग आहे हे कसे निश्चित होते? मुलगी होण्यात माता जबाबदार असते का? इत्यादी प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिक संशोधनामुळे केव्हाच मिळाली आहेत. मुलगा किंवा मुलीच्या जन्मासंबंधी निसर्गाची योजना कशा प्रकारे विकसित झाली हे आपण बघू.

आपले शरीर हे असंख्य पेशींचे (सेल्स) बनलेले आहे. प्रत्येक पेशींमध्ये असलेल्या महत्त्वाच्या अनेक घटकांसोबतच मानवाची गुणसूत्रे (क्रोमोजोम्स) देखील असतात. या गुणसूत्रांची संख्या 46 एवढी असते. ही गुणसूत्रे दोन दोनच्या जोड्यांच्या रूपात असतात. म्हणजेच प्रत्येक पेशींमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या (म्हणजे 46 गुणसूत्रे) असतात. त्यापैकी 22 जोड्या (म्हणजे 44 गुणसूत्रे) या शरीराची वाढ होणे आनुवंशिकता येणे इत्यादी गुणधर्मासाठी आवश्यक असतात. अशा या 22 जोड्यांना आटोझोम्स म्हणतात. उरलेल्या दोन गुणसूत्रांची जोडी (म्हणजे 23 वी जोडी) ही फार महत्त्वाची असते. माता-पित्यांच्या या गुणसूत्रांमुळेच गर्भातील अर्भक स्त्रीलिंगी अथवा पुलिंग निर्माण होत असते. म्हणूनच या दोन गुणसूत्रांना ‘लिंगनिर्मिती गुणसूत्रे’ (सेक्स क्रोमोजोम्स) म्हणतात. विशेष विलक्षण बाब म्हणजे पुरुषांमधील ही दोन गुणसूत्रे (म्हणजे 23वी जोडी)सारखी नसतात, तर ती वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्यातील एक गुणसूत्र ‘क्ष’ (७) तर दुसरे गुणसूत्र ‘य’ (८) असते. म्हणून पुरुषातील गुणसूत्रांची जोडी ‘क्षय’(७ ८) अशी असून ते 50 - 50 टक्के असतात. स्त्रीमध्ये देखील दोन गुणसूत्रांची एक जोडी (23 वी जोडी) असून यातील दोन्हीही गुणसूत्रे एकाच प्रकारची असतात. त्याला ‘क्षक्ष’(७७) म्हणतात व ते देखील प्रत्येकी 50 टक्के असतात.
स्त्री-पुरुषांच्या गुणसूत्रांची योजना खालीलप्रमाणे असते
मातेच्या गर्भात मुलगी व मुलगा यांच्या निर्मितीची प्रक्रिया खालीलप्रमाणे होत असते
 जेव्हा पित्याचे क्ष गुणसूत्र व मातेचे क्ष गुणसूत्र यांचा मिलाप होतो तेव्हा मुलगी जन्मास येते.
 जेव्हा पित्याकडील असलेले य गुणसूत्र व मातेकडील क्ष गुणसूत्रांचा मिलाप होतो तेव्हा मुलगा जन्मास येतो.
 म्हणजेच मुलगा होण्यासाठी पित्याचे य गुणसूत्रच कारणीभूत असते. निसर्गाच्या या सुंदर योजनेमुळे पृथ्वीवर मानव वंश हा सतत वाढत राहतो. स्त्री-पुरुष संख्या समतोल राखली जाते. असे नसते तर काय झाले असते हे पाहू.

पुरुषाचे य गुणसूत्र
पुरुषामध्ये क्ष आणि य ही दोन भिन्न प्रकारची गुणसूत्रे असतात. त्यापैकी य गुणसूत्रापासून मुलगा जन्मास येतो. संशोधनांती असे स्पष्ट झाले आहे की, य गुणसूत्र हे निसर्गत:च क्ष गुणसूत्रापेक्षा आकाराने लहान असते. आणि क्ष गुणसूत्रामध्ये असलेल्या जिन्स (आनुवंशिकता वाहक) या घटकांपेक्षा कितीतरी पटीने कमी जिन्स य ह्या गुणसूत्रात समाविष्ट असतात. त्याचप्रमाणे य हा क्ष पेक्षा बराच दुबळा / अशक्त असतो. महत्त्वाची बाब अशी की पुरुषाला असलेल्या अनेक वाईट सवयीमुळे जसे दारू, तंबाखू, सिगारेट इत्यादींचे सेवन, खानपानाच्या सवयी, बाहेरख्यालीपणा यामुळे य गुणसूत्रांवर फार मोठा वाईट परिणाम होऊन ते य गुणसूत्र आणखीनच अशक्त / दुबळे होते. त्याची स्वाभाविक चंचलता देखील कमी होते आणि याचीच परिणीती मुलगा न होण्यास होते. पित्याचे य गुणसूत्र किती सशक्त आहे, किती निरोगी आहे. यावरच मुलगा होणे वा न होणे अवलंबून असते. यात मातेचा काय दोष?

...तर पृथ्वीवर मानव दिसला असता का?
निसर्गाने जर पुरुषांमधील दोन्ही गुणसूत्र क्षय ऐवजी फक्त यय चीच निर्मिती केली असती तर काय झाले असते? पित्याकडे असलेल्या दोन्ही यय गुणसूत्रे मातेच्या क्षक्ष गुणसूत्रांशी एकरुप होऊन फक्त पुरुषांची निर्मिती झाली असती. आणि अर्थातच स्त्रीच्या अभावी मानव निर्मितीच थांबून पृथ्वी निर्मनुष्य राहिली असती.
 पण तसे होत नाही, याला कारण आहे निसर्गाची योजना. स्त्री-पुरुष निर्मितीची अत्यंत आकर्षक योजना निसर्गाने निर्माण केलेली आहे. म्हणूनच मानव समाजाचे आज पृथ्वीवर अस्तित्व आहे. ते टिकून आहे. वाढत आहे.
 आपल्या लक्षात आले असेल की, मुलगी होण्यामध्ये पित्याचा सहभाग मोठा असून पिताच कारणीभूत असतो. निसर्गाची योजनाच तशी आहे. म्हणून मुलीला जन्म देणार्‍या मातेला दोष देणे किती हास्यास्पद आहे !
(लेखक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, रसायन शास्त्र विभागाचे, माजी विभागप्रमुख आहेत.)