दुर्दैवाने का असेना प्रत्येकाला कधी ना कधी तरी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येते. अशा वेळी रुग्णाने काही निश्चित पूर्वतयारी करून गेल्यास निदान अचूक व लवकर होऊ शकते. त्यामुळे कित्येक प्रकारच्या मनस्तापापासून सुटका होऊन अनावश्यक मनुष्यबळ व पैशांचा अपव्यय टाळता येईल. त्यासाठी काही गोष्टी काळजीपूर्वक न विसरता मुद्दाम करण्याची गरज आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण सर्व गोष्टी लिहून न्या.
आजाराचा पूर्वइतिहास
आपल्याला झालेला आजार केव्हा सुरू झाला. त्याची महत्त्वाची लक्षणे कोणती. पूर्वी असा आजार झाला असल्यास त्याची थोडक्यात माहिती डॉक्टरांना द्यावी.
काही औषधांचे आपल्यावर दुष्परिणाम होत असल्यास किंवा विशिष्ट पदार्थांची अॅलर्जी असल्यास त्यांची नावे लिहून न्यावीत.
ताप येत असल्यास थर्मामीटरने दिवसातून 2-3 वेळ त्याची तीव्रता मोजून त्याचे आकडे डॉक्टरांना सांगावेत.
प्रत्येकाने स्वत:ची एक आरोग्य सूची स्वतंत्र फायलीत क्रमवार लावून ठेवावी व त्यातील महत्त्वाच्या नोंदी व रिपोटर््स डॉक्टरांना दाखवावेत.
वर नमूद केलेल्या सर्व बाबी कागदावर किंवा आपल्या आरोग्यविषयक फाइलमध्ये लिहून नेल्यास ते उत्तम ठरेल. लॅबोरेटरीत रक्त, लघवी तपासण्यास देताना मार्गदर्शक सूचना घेऊन त्यानुसार लॅबोरेटरीत जावे.
जे प्रश्न, शंका, कुशंका, पथ्यपाणी डॉक्टरांना विचारायचे असेल ते लिहून न्यावेत. त्यामुळे डॉक्टरांचा वेळ पण वाचेल व आपला एखादा मुद्दा विसरणार नाही.