आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारांपेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाहेर चमचमीत खाल्ल्यानंतर ‘गॅस ट्रबल’, पोटदुखी असे प्रकार ‘अ‍ॅसिडिटी’ या नावाखाली खपवले जातात. पण खरे पाहिले असता हे असते ‘एच पायलोराय’ या जीवाणूचे जठरात झालेले इन्फेक्शन. अशुद्ध पाणी, भेसळ केलेले दूध, उघडे अन्न जठरात-पोटात जाते. भारतात या वस्तूंचा पुरवठा भरपूर व निरंतर असल्यामुळे हे जीवाणू परत परत पोटात जात राहतात. स्वल्पविरामाच्या आकाराचे हे जीवाणू जठराच्या आतल्या अस्तराला चिकटून राहतात. कुरतडून अल्सर तयार करतात. योग्य उपायाने हे इन्फेक्शन बरे केले तरी या देशात ते पुन:पुन्हा होत राहते. या दीर्घकालिक ‘क्रॉनिक’ इन्फेक्शनमुळे जठराचा कर्करोग व जठराचा लिम्फोमा होण्याचा धोका वाढतो.
हिपॅटायटिस-बी व हिपॅटायटिस-सी हे काविळीचे दोन विषाणू महाखतरनाक आहेत. निर्जंतुक न केलेल्या इंजेक्शनच्या सुया, रक्त व रक्तापासून तयार केलेले घटक यातून हे विषाणू माणसाच्या शरीरात शिरतात. कावीळ होऊन बरीसुद्धा होते, पण हे विषाणू शरीरात अनेक वर्षे राहतात. पुढे यकृताच्या तक्रारी सुरू होतात. यकृताला सूज येते व यकृताचा कर्करोग होण्याचा धोका संभवतो.
आज हिपॅटायटिस-बी विरोधी लस उपलब्ध आहे. बालपणात ही लस टोचली तर मोठेपणीही कावीळ होत नाही. त्यायोगे हिपॅटायटिस-बी विषाणूमुळे होणार्‍या यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.
पेटन रौस हे या क्षेत्राचे वैज्ञानिक आजोबा. कोंबड्यांना होणारा कर्करोगाचा एक ट्यूमर विषाणूमुळे होतो, हे डॉ. रौस या अमेरिकीवैज्ञानिकाने 1910च्या दशकात विविध प्रयोगाने दाखवून दिले. पण या आजोबांचे महत्त्व कळायला 1966 साल उजाडले. त्या वर्षी, 77 वर्षे वयाच्या डॉ. रौस यांना त्यांच्या या संशोधनाबद्दल नोबेल देण्यात आले.
एड्सचा एचआयव्ही हा विषाणू माणसाच्या प्रतिक्षमता यंत्रणेच्या पेशीत शिरतो आणि पेशींच्या ‘डीएनए’मध्ये घुसतो. पेशींची यंत्रणा वापरून स्वत:ची पिलावळ वाढवतो. हे करत असताना तो माणसाची प्रतिक्षमता यंत्रणा खलास करतो. पेशींच्या ‘डीएनए’त विषाणू शिरणे म्हणजे चोराच्या हातात किल्ली देणे. ‘डीएनए’त शिरून तो आँकोजिन्स उद्दीपित करतो व ट्यूमर सप्रेसर जनुकांना काम करू देत नाही.
त्यामुळे एड्सच्या रुग्णांना ‘नॉन हॉजगिन लिंफोमा’, ‘कापोसी सारकोमा’, ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग’, ‘गुदद्वाराचा कर्करोग’ असे कर्क रोग होण्याचा धोका असतो. एड्सचा प्रतिबंध केल्यास, या कर्करोगांचे समाजातील प्रमाण
कमी होते.
ह्यूमन टी-़लिम्फोट्रॉपिक विषाणू - हा विषाणू मुख्यत: दक्षिण जपान, नंतर कॅरिबियन बेटे, अमेरिकेचा दक्षिण-पूर्व भाग, दक्षिण अमेरिकेचा उत्तर-पूर्व भाग, मध्य आफ्रिका, पापुआ न्यू गिनी या भागांत आढळतो. दूषित रक्तातून, निर्जंतुक न केलेल्या सुयांतून, अनेक व्यक्तींशी शरीरसंबंध ठेवण्यातून या विषाणूचा प्रसार होतो. या विषाणूमुळे सिडीफोर टी सेल या प्रतिक्षमता यंत्रणेतील पेशींचा ‘अ‍ॅडल्ट टी सेल ल्युकेमिया’ हा कर्करोग होण्याचा धोका असतो. उपचारांना दाद न देणारा हा जहाल कर्करोग आहे. एड्सच्या प्रतिबंधाचे सर्व उपाय यालाही लागू पडतात.
एचपीव्ही- म्हणजेच ह्यूमन पॅपिलोमाचा विषाणू. याचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी संबंध असतो. भारतासारख्या विकसनशील देशात या प्रकारच्या महिलांच्या कर्करोगाचे प्रमाण खूप आहे. पुरुषाच्या लिंगावर या विषाणूचे इन्फेक्शन होते. शरीरसंबंधात त्याचा शिरकाव स्त्री गर्भाशयाच्या मुखावर - ‘सर्विक्स’वर होतो. हा विषाणू पेशींमधील ट्यूमर सप्रेसर जनुक निकामी करतो. यामुळे गर्भाशयाच्या मुखावर कर्करोगाची सुरुवात होते.
आज या विषाणूविरोधी लस उपलब्ध आहे. 9 ते 16 या वयोगटातील मुलींना एचपीव्हीविरोधी लस टोचली तर विषाणूचे इन्फेक्शन होण्यावर प्रतिबंध होतो, असे सिद्ध झाले आहे. विकसनशील देशात या लसीचा उपयोग केल्यास या प्रकारच्या कर्करोगाचे समाजातील प्रमाण कमी होईल, असा संशोधकांचा विश्वास आहे.
‘उपचारांपेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा’ हे कर्करोगाच्या बाबतीतही खरे आहे.
(dranand5@yahoo.co.in)