आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वमग्न मनांची हाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्मत: स्वमग्न किंवा अतिचंचल असलेली मुले समाजाच्या सर्व स्तरांतून नाकारली जातात. मात्र, हे दु:ख त्यांचे पालक वगळता इतर कुणालाही कळत नाही.
ऑटिझम’ व अटेन्शन केफिसिट ‘हायपरअ‍ॅक्टिव्ह डिझॉर्डर’ हे शब्द कादंबरी वा चित्रपटांच्या निमित्ताने काहींनी ऐकले असतील. पण आज अतिचंचल व स्वमग्न मुलांसाठी वापरल्या जाणार्‍या या संज्ञांची सर्वसामान्यच काय पण वैद्यकीय क्षेत्रालाही नीट तोंडओळख नाही. आज तरी या संज्ञा सामाजिक उपक्रम व चित्रपटांसाठी तोंडी लावण्यापुरत्याच वापरात आहेत. बालरोगतज्ज्ञांना त्यांच्या व्यग्र बाह्यरुग्ण विभागातून वेळ काढून या मुलांच्या उपचारासाठी लक्ष देणे जमलेले नाही.

मानसोपचार हा मुळात बालमानशास्त्राचा विषय असल्याने बालरोगतज्ज्ञ या मुलांच्या उपचारास धजावत नाहीत. ही मुले उपद्रव निर्माण करत असल्याच्या कारणावरून शाळा त्यांना मज्जाव करतात. मुले धड गतिमंद नसल्याने त्यांना इतर विशेष शाळांमध्ये टाकण्याचीही सोय नसते. अशा परिस्थितीत स्वत:चा दोष नसलेली, जन्मत: स्वमग्न किंवा अतिचंचल असलेली मुले समाजाच्या सर्व स्तरातून नाकारली जातात. मात्र हे दु:ख त्यांचे पालक वगळता इतर कुणालाही कळत नाही.
आज या मानसिक स्थितीचे प्रमाण थोडेथोडके नसून अतिचंचलता 5 ते 10 टक्के व स्वमग्नता दहा हजारात दहा मुलांमध्ये आढळून येते आहे. यावरून अंदाज येईल की, एवढी मोठी ऊर्जा आज कुठल्याही उपचाराविना वाया जाते आहे. मुळात हे आजार पालक व शिक्षकांना लवकर ओळखताच येत नाहीत. ओळखले गेले तरी खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे या आजारांच्या उपचाराची पहिली पायरी आहे, आजार ओळखणे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपण सगळेच जन्मत: काही प्रमाणात चंचल आणि स्वमग्न म्हणूनच जन्म घेतो. पण काळाच्या ओघात समाजाचे काही नियम आपल्या गळी उतरतात. त्यामुळे ही चंचलता, स्वमग्नता ताब्यात येते. काही मुलांमध्ये मात्र ती ताब्यात ठेवण्याची यंत्रणा जन्मत:च कुचकामी असते. त्यामुळे ही अतिचंचलता व स्वमग्नता त्यांच्या दैनंदिन जीवनात व कार्यक्षमतेत अडथळे निर्माण करते. म्हणूनच उपचारांची गरजही निर्माण होते. अशा वेळी प्रत्येकाला या आजारांची लक्षणे नीट माहीत असली पाहिजेत. अतिचंचल मुलांमध्ये एका जागेवर न बसता सतत इकडे-तिकडे जाणे, वर्गात जागेवर न बसणे, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी असणे (अटेन्शन स्पॅन) व मुख्य काम सोडून आजूबाजूला घडणार्‍या गोष्टींकडे त्वरित लक्ष जाणे, ही मुख्य लक्षणे दिसून येतात. या बरोबरीने एखाद्या गोष्टीवर तीव्रतेने व लगेच प्रतिक्रिया देणे, उत्तेजित होणे, लहानसहान गोष्टींवर गरज नसताना चिडणे ही इतर लक्षणेही दिसून येतात. त्यांना घाईगडबडीने पळण्याची सवय असल्याने न बघता रस्ता ओलांडताना त्यांचे अपघात होण्याची शक्यता असते. मुख्य समस्या शाळेत गेल्यावर उद्भवतात. हिंसक व आक्रमक वृत्तीमुळे शाळेमध्ये या मुलांवर विशेष लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे इतरांशी संबंध बिघडतात व कुमारवयीन काळात याचे रूपांतर नैराश्यामध्ये होते.
स्वमग्न मुलांमधील लक्षणे वेगळी असतात. यात सामाजिक संबंधांमध्ये मोठा अडथळा निर्माण होतो व मुले आपल्याच विश्वात वावरत असतात. लहानपणापासूनच बाळ आईकडे बघून हसणे वा आई किंवा इतरांनी उचलून घ्यावे, ही भावना व्यक्त करण्यास असमर्थ ठरते. पुढे मोठे होऊ लागल्यावर बोलण्यास उशीर, शिकलेली भाषा विसरणे, इतर काय सांगतात ते न कळणे, एकच शब्द पुन्हा पुन्हा बोलणे, जाणीवपूर्वक वेगळे उच्चार करणे, अशा गोष्टी दिसून येतात. तसेच एकच एक गोष्टी पुन्हा पुन्हा करणे, एकच व वेगळ्याच प्रकारचे खेळ खेळणे व वातावरणात तोच तो पणा हवा असणे, या गोष्टी मुलांना समाजापासून तोडतात. बर्‍याचदा हाताच्या व बोटांच्या त्याच त्या निरर्थक हालचालीही दिसून येतात. गतिमंदत्वामुळे काही वेळा शालेय गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. याच्या बरोबरीने काही मुलांमध्ये अतिचंचलताही आढळून येते.
याविषयी आपला अनुभव सांगताना अहमदनगर येथील लहान मुलांचे वाढ व विकास तज्ज्ञ डॉ. सुचीत तांबोळी सांगतात की, बर्‍याचदा सुरुवातीच्या काही वर्षांत पालक त्यांच्या मुलाला असा काही आजार आहे, हे स्वीकारतच नाहीत. त्यामुळे उपचारांना उशीर होतो. लवकर निदान व लवकर उपचार हे अतिचंचलता व स्वमग्नतेच्या यशस्वी उपचारांचे सूत्र आहे. त्यासाठी प्रत्येक आईने पहिल्या वर्षातील वाढीसाठी चार गोष्टी लक्षात ठेवल्या तरी बरीच वाढ खुंटलेली मुले बालरोगतज्ज्ञांपर्यंत पोहोचतील. दुसर्‍या महिन्यात आईकडे बघून हसणे, चौथ्या महिन्यात मान धरणे व एक वर्षापर्यंत दादा-मामा असे शब्द बोलणे एवढ्या चार पायर्‍यांवर बाळ पोहोचत नसेल, तर बाळासाठी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. काही वेळा डॉक्टरांच्या आघाडीवरही चूक होते, ती अशी की न चालणारे, न बोलणारे, न हसणारे किंवा न बसणारे बाळ दाखवले की ‘वय वाढेल तसे बोलेल, हसेल, चालेल’ किंवा ‘वय वाढेल तशी बुद्धीची वाढ होईल’, अशा वाक्याने बोळवण केली जाते, निदानास उशीर होतो.
या आजारांच्या उपचारांमध्ये औषधांप्रमाणेच पालकांचे समुपदेशन, प्ले थेरपी- म्हणजे खेळांच्या माध्यमातून उपचार करणे, कॉग्निटिव्ह थेरपी, बिहेवियरल थेरपी अशा गोष्टींचा मोठा सहभाग असतो. बर्‍याचदा औषधांचे दुष्परिणाम होतील, या भीतीने औषधे बंद केली जातात. म्हणूनच यात पालकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. पालकांनी आपला मुलगा स्वमग्न किंवा अतिचंचल असल्याचे सर्वप्रथम स्वीकारावे. उपचारांच्या बाबतीत काही ध्येये, उद्दिष्टे ठरवून घ्यावी. आपल्या मुलांची इतरांशी तुलना मुळीच करू नये. मुलांमध्ये इतरही क्षमता असतात, त्यांचा प्रयत्नपूर्वक शोध घ्यावा, त्या विकसित कराव्या. ही समस्या असलेली मुले बर्‍याचदा उत्तम चित्रकार असू शकतात किंवा त्यांना इतरही कलांमध्ये गती असू शकते. ही मुले हेतुपुरस्सर अशी वागत नसून निसर्गाने हा वेगळेपणा त्यांना बहाल केला आहे, एवढी जाणीव ठेवून समाजानेही त्यांना स्वीकारावे. सर्वसाधारणपणे आपल्यालाही कधीतरी स्वमग्न राहायला आवडते, आपलेही मन चंचल असतेच; पण आपल्याला ते दोष झाकण्याचे नाटक जमून जाते. ही मुले मात्र जशी आहेत तशी वागतात. त्यांना खरेपणाने वागण्याची संधी निसर्गाने दिलेली असते. म्हणून या खरेपणाचा सर्वांनी सन्मान करावा. त्यावर प्रेम करावे...
amolaannadate@yahoo.co.in