आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगान् न धारयेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध व्यक्तींना होणारे बहुतेक रोग वेगांचा अवरोध किंवा त्यांचे मुद्दाम प्रवर्तन केल्यानेच होतात. वेग अवरोध म्हणजे शरीराच्या नैसर्गिक संवेदना दाबणे किंवा मोकळ्या न करणे. उदा. गॅसेस अडवणे, लघवी, शौच, शिंक, तहान, भूक यांना दाबून ठेवणे अथवा त्यांना जबरदस्तीने प्रवर्तीत करणे यामुळे शरीराचे आत-बाहेरील गतीविषयक सर्व व्यवहार ज्या वाता-दोषाच्या आधीन आहेत. त्याच्या सर्व संचारी गतीत अडथळा उत्पन्न झाल्याने तो वातदोष प्रकुपित होऊन विविध आजार निर्माण करतो.

वेगान् न धारयेत् वात- विण्मूत्रक्षव-तृट्-क्षुधाम। निद्रा कास श्रम श्वास
जृम्भा-श्ररुच्छर्दि रेतसाम् ।। अर्थात ऊर्ध्वमार्गाने ढेकरांच्या स्वरूपात आणि अधोमार्गाने म्हणजे गुदावाटे सरणारा अपानवायू (गॅसेस) त्यांच्या, मल (संडास), मूत्र, शिंक, तहान, भूक, झोप, खोकला, परिश्रमाने वाढलेला श्वास, जांभई, अश्रू, वांती आणि शुक्र यांचे प्रवर्तन होण्याची संवेदना झाली व ती अडवली तर तो त्या-त्या बाबतीत केलेला वेगावरोध असतो. आता आपण थोडक्यात या नैसर्गिक संवेदना थांबवल्याने होणाऱ्या परिणामांचा विचार करू या....

>अधोवात वेगावरोध झाल्यास : पोटात गाठीसारखा गोळा फिरणे, ग्लानी, वात (गॅसेस), मूत्र व मलप्रवृत्ती न होता साठणे, दृष्टी मंद होणे, भूक न लागणे व हृदयात जखडल्याप्रमाणे होणे.

>मलप्रवृत्तीचा अवरोध : शौचाला लागल्यावर सुद्धा दाबून ठेवल्यास अथवा जोर लावून प्रवर्तन केल्यास पोटºयांमधे पेटके येणे, वारंवार सर्दी, डोकेदुखी, वायू ऊर्ध्वमार्गाने येण्याची प्रवृत्ती, पोट दुखणे, हृदयात दुखणे, विविध त्वचारोग आदी आजार होतात.

>मूत्रवेगाचा अवरोध : आंगमोडे होणे, मूतखडा, ओटीपोट, जननेंद्रिय जांघांत वेदना होणे, पोटात वारंवार दुखणे, मळमळ अस्वस्थ वाटणे आदी.

> ऊर्ध्ववात (उद्गार किंवा ढेकर) अडवल्यास : अरुची, शरीरात कंप, हृदय व छातीत अडकल्यासारखे वाटणे, पोट फुगणे, खोकला व उचकी उत्पन्न होते.

> शिंकेचा वेगावरोध केल्यास : डोकेदुखी, इंद्रियांची दुर्बलता, मान आखडणे, चेहरा वाकडा होणे आदी उपद्रव होतात.

> तहानेच्या वेगाचा अवरोध : कोरड पडणे, अंग गळल्यासारखे वाटणे, बहिरेपणा येणे, मोह, भोवळ व हृदयाचे आजार.

> भुकेचा अवरोध : अंग मोडल्यासारखे वाटणे, अरुची, ग्लानी, शरीराला कृशता, शूल, भोवळ, एकाग्रता कमी होणे आदी.

> झोपेच्या वेगाचा अवरोध : मोह, भ्रम, डोके व डोळे जड होणे, आळस जांभया फार येणे.

> खोकल्याचा वेग अडवल्यास : खोकला वाढतो, श्वास, अरुची, हृदय व फुप्फुसांचे आजार, क्षय आणि उचकी हे आजार होतात.

> श्रमजन्य श्वास : अर्थात आपण कुठे उंचावर चालत असताना धाप लागणे, पोटात अस्वस्थ वाटणे, हृदयाच्या जागी दुखणे

> जांभई अडवल्यास : डोकेदुखी, इंद्रिय दौर्बल्य, डोळे जड होणे.

> अश्रूंचा वेग अडवल्यास : सर्दी, नेत्ररोग, शिरोरोग, हृद्रोग, मान जखडणे, अरुची, भोवळ येणे आदी.

> वांतीचा वेग अडवल्यास : शीतपित्त (अंगावर पित्त उठणे)- प्रचंड खाजवणे, कोड (त्वचेवर चट्टे पडणे) विविध त्वचेचे आजार, डोळे खाजवणे, अंगावर सूज व चेहºयावर वांग निर्माण होतात.

> शुक्र वेग अडवल्यास : वारंवार शुक्रस्राव होणे, जननेंद्रियात वेदना होणे, ताप, लघवी अडणे, अंडवृद्धी, मूतखडा, नपुंसकत्व आदी त्रास व स्त्रियांमध्ये मानसिक आजार होतात.
उपचार : बऱ्याचवेळा विविध आजारांनी त्रस्त झालेले रुग्ण तपासताना मूळ सवयींची चौकशी केल्यावर त्या आजारांची कारणे सापडतात. त्यानुसार औषध योजना करणे सोपे होते. एसी रूममध्ये कॉम्प्युटरसमोर तासन‌्तास व्यस्त राहाणे, स्त्रियांमध्ये कामाच्या व्यस्ततेमुळे अथवा व्यवस्थित जागेअभावी वेगावरोध करणे, मुलांमध्ये शाळेत जाण्याची घाई असल्याने शौचाला न जाणे, तासन‌्तास गाडीत बसून प्रवास करणे आदी सामान्य कारणे आपणास नेहमीच आढळतात.

आयुर्वेदात आजारांची अशा प्रकारची मूळ कारणे शोधून औषधी व बस्तीसारख्या पंचकर्मचिकित्सेने उत्तम फायदा झालेला दिसून येतो. बऱ्याचवेळा वंध्यत्व असलेल्या व सर्व रिपोर्ट‌्‌स नॉर्मल असलेल्या दांपत्यांमध्येसुद्धा अशा सवयी आढळून आलेल्या आहेत. त्यांना औषधी व पंचकर्मचिकित्सेने संतती प्राप्त होतेच. म्हणूनच या १४ प्रकारच्या नैसर्गिक संवेदना मोकळ्या कराव्यात त्यांना थांबवणे योग्य नव्हे. शास्त्रात कोणते वेग धारण करावे म्हणजे थांबवावेत याचासुद्धा उल्लेख झालेला आहे. ‘धारयेत्तुसदा वेगान् हितैषी प्रेत्य चेह च। लाभेष्यी द्वेष मात्सर्य रागादीनां जितेंद्रिय:’।। लोभ, इर्षा, द्वेष, मत्सर, क्रोध व कोणत्याही विषयाची अत्यासक्ती या सर्व मानसिक ऊर्मी म्हणजे मानसिक वेग आहेत.