आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्करोग पेशींची घुसखोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्कपेशींची अनिर्बंध फैलावण्याची क्षमता नुसती पुरी पडत नाही, तर कर्कपेशी दुसऱ्या अवयवामध्ये वाढण्यासाठी त्या अवयवात योग्य पर्यावरण लागते. सुपीक व सुयोग्य भूमी लागते, हे महत्त्वाचे. विशिष्ट अवयवाचा कर्करोग शरीरातील दुसऱ्या विशिष्ट अवयवात मध्येच रुजतो, हा डॉ. पॅजेटचा विचार निदानासाठी व उपचारांसाठी उपयुक्त होता.

काळ होता, १८८९चा. भारतातील १८५७चे बंड होऊन तीस वर्षांहून अधिक काळ लोटला होता. ब्रिटिश एम्पायर जोरात होते. ब्रिटनमध्ये वैद्यकीय विज्ञानात भरधाव प्रगती होत होती. ‘वेस्ट लंडन हॉस्पिटल’मधील स्टिफन पॅजेट हा साहाय्यक सर्जन स्तनाचा कर्करोग शरीरभर कसा फैलावतो, याचा अभ्यास करत होता. त्याने स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू पावलेल्या ७३५ रुग्णांचा शोधाभ्यास केला. तेव्हा त्याला असे आढळून आले की, जास्तीत जास्त रुग्णांच्या यकृतामध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या ‘सेकंडरीज’ तयार झाल्या होत्या. यकृत म्हणजे शरीराची रासायनिक प्रयोगशाळा. स्तनाच्या कर्कपेशींनी काबीज केल्यामुळे हे यकृतच विकृत झाले व रुग्णाचा मृत्यू ओढवला. खरे पाहता स्तनाच्या कर्कपेशी रक्तातून शरीरातील सर्व अवयवांत पोहोचल्या, पण फारच थोड्या अवयवांत त्यांनी मूळ धरलं. पण यकृतात मात्र या पेशी रुजल्या व स्थिरावल्या आणि फोफावल्या. असे का घडले, हा मूलभूत प्रश्न स्टिफन पॅजेटला पडला होता. याचा अर्थ, स्तनाच्या कर्कपेशींसाठी यकृत ही सुपीक भूमी ठरली होती. यावरून त्याने कर्करोग फैलावण्याची म्हणजे ‘मेटास्टेसिसची’ ‘सीड अँड सॉइल’- ‘बीज व भूमी’ ही थिअरी मांडली. कर्कपेशींची अनिर्बंध फैलावण्याची क्षमता नुसती पुरी पडत नाही तर कर्कपेशी दुसऱ्या अवयवामध्ये वाढण्यासाठी त्या अवयवात योग्य पर्यावरण लागते. सुपीक व सुयोग्य भूमी लागते, हे महत्त्वाचे. विशिष्ट अवयवाचा कर्करोग शरीरातील दुसऱ्या विशिष्ट अवयवात मध्येच रुजतो, हा डॉ. पॅजेटचा विचार निदानासाठी व उपचारांसाठी उपयुक्त होता.
मेटॅस्टेसिस
जेव्हा अवयवातील ‘नॉर्मल पेशी’चे कर्कपेशीत रूपांतर होते, तेव्हा त्या पेशी अवयवात असलेली सुव्यवस्था मोडून वाटेल तशा वाढू लागतात. आता या कर्कपेशी एका अवयवाची सीमा सोडून दुसऱ्या अवयवात घुसतात, शरीरातील विविध अवयवांत जाऊन पोहोचतात. ही प्रक्रिया हे कर्करोगाचे ठळक लक्षण आहे.
अवयवातील पेशी एका विशिष्ट पद्धतीने बसवलेल्या असतात. प्रथमत: कर्करोगामुळे ही व्यवस्था मोडते. पेशींमधील केंद्रकाचे (न्युक्लियस) रूप बदलते, ती पेशी निराळी दिसू लागते. निष्णात कर्कविकृतीतज्ज्ञ (आँकोपॅथॉलॉजिस्ट) सूक्ष्मदर्शकाखाली हे सर्व ओळखू शकतात. पेशी वाढण्याचे सर्व नियम, वाढीच्या नॉर्मल क्रिया, पेशी वाढीची नियंत्रणे या सगळ्या गोष्टी या पेशींनी धाब्यावर बसवलेल्या असतात. हे सर्व सूक्ष्मदर्शकाखाली तज्ज्ञांना कळून चुकते. दोन एकमेकांना खेटून असणारे अवयव एकमेकांत कधीच घुसत नाहीत. त्यांच्या सीमा अभेद्य असतात. पण कर्कपेशी या सीमारेषा भेदून सरळ दुसऱ्या अवयवात घुसतात. रक्तप्रवाहातून सर्व शरीरभर पसरतात. घुसखोर पेशी तेथेही वाढू लागतात.
ज्या अवयवात कर्करोगाची प्रथम सुरुवात होते, त्या कर्करोगाच्या गाठीला ‘प्रायमरी ट्युमर’ म्हणतात. बऱ्याच कर्करोगात ही प्राथमिक गाठ हा गंभीर प्रश्न नसतो. पण त्यानंतर जे काही घडते ते जास्त धोकादायक असते. मूळ अवयवातून बाहेर पडून शरीरात दूरवर असलेल्या अवयवात जाऊन तेथे कर्कपेशींनी अनिर्बंध वाढ सुरू करायची, याला वैद्यकीय भाषेत ‘मेटॅस्टेसिस’ किंवा ‘सेकंडरीज’ म्हणतात. हा जटिल प्रश्न असतो. काही विशिष्ट कर्कपेशी झटकन फैलावतात. त्यांचे गुणधर्म आता हळूहळू कळू लागले आहेत. कितीतरी कर्करोगांमध्ये मूळ कर्कपेशी पाहून या पेशी झटकन पसरतील का, याची संख्याशास्त्रीय माहिती निष्णात कर्कविकृतीतज्ज्ञ देऊ शकतात. याचा अर्थ, एखादी कर्कपेशी पाहून पसरण्याचा चान्स २० टक्के का ८० टक्के, हे सांगता येते. पण श्री. क्ष वा श्रीमती क्ष यांच्या कर्कपेशी किती झटकन पसरतील किंवा पसरणार नाहीत, हे सांगता येत नाही. याचा अर्थ, संख्याशास्त्रीय अंदाज बांधता येतो; पण त्या व्यक्तीबाबत अंदाज बांधता येत नाही. समजा पसरण्याचा धोका ८० टक्के असेल पण ती विशिष्ट व्यक्ती या ८० टक्क्यात असेल का उरलेल्या २० टक्क्यांत, हे सांगता येत नाही. ही अनिश्चितता रुग्णाला व त्याच्या नातेवाइकांना काळजीत टाकणारी असते. या संख्याशास्त्रीय माहितीचा उपयोग रुग्णावरच्या उपचारांसाठी होत असतो. रोग फैलावू नये, म्हणून प्रतिबंधक उपायही योजायचे असतात. यामध्ये निश्चितता आणण्याचे प्रयत्न अविरत सुरू आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या कर्कपेशीतील फैलावण्याच्या पाऊलखुणा कोणत्या, हे शोधण्याचे संशोधन जारी आहे.
पुरावा पाहिजे
वैद्यकीय विज्ञानात थिअरी सिद्ध व्हावी लागते. १८८९मध्ये डॉ. पॅजेटनी मांडलेली थिअरी १९८०मध्ये हार्ट आणि फिडलर या वैज्ञानिकांनी प्रयोगांनी सिद्ध केली. उंदरावरचे प्रयोग, ‘रेडियोअॅक्टिव लेबलिंग’ अशा तंत्रांनी ही थिअरी सिद्ध झाली. आज कर्कपेशींचे दुसऱ्या अवयवात बीजारोपण कसे होते, ते उमगू लागले आहे. बीजातील तसेच भूमीतील रेणवीय यंत्रणांचा शोध घेणेही सुरू आहे. त्यामुळे कर्करोग फैलावू नये व फैलावल्यास कोणते उपाय योजावे, हे कर्करोग विज्ञानाला उमजत आहे. त्याचा रुग्णांना फायदाच होत आहे.
dranand5@yahoo.co.in