आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात्त्विक अन्न नेमके कोणते?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखामध्ये आहाराचा व मनाचा संबंध आपण बघितला. आहाराचे वर्गीकरण करत असताना तो सात्त्विक, राजसिक की तामसिक व त्याच्या मनावर सध्या व नंतर होणा-या परिणामांचा विचार आपण करतो. सात्त्विकादी आहाराचे जसे मनावर परिणाम आहेत तसेच ते शरीरावरही होत असतात. मागील लेखात आपण बघितले की, मूक आहार हा चांगला किंवा सात्त्विक, व दुसरा राजसिक वा तामसिक असे आपण समजतो; परंतु तसे प्रत्येक वेळेस नसते.
आहाराचा मनावर व त्या अनुषंगाने शरीरावर होणारा परिणाम यावर त्याचे सात्त्विकादी गुणधर्म ठरवावे लागतात. पुस्तकांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये जे सात्त्विकादी पदार्थांचे वर्णन केले आहे ते जशास तसे न घेता ते त्याचे परिणाम सेवन करणा-या व्यक्तीवरसुद्धा अवलंबून असतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आहार सेवन करणा-या व्यक्तीची प्रकृती, त्यांची पचनशक्ती, आहार सेवन करण्याची पद्धत इत्यादी बाबींवर तो आहार, त्या व्यक्ती सात्त्विक, राजसिक की तामसिक हे ठरते. याचप्रमाणे आहार किती मात्रेत सेवन करण्यात येत आहे, त्यावर कुठले संस्कार झाले आहेत, आहार सेवन करताना त्या व्यक्तीची मानसिकता कशी आहे यावरसुद्धा त्या आहाराचे मनावरील परिणाम ठरत असतात. यानुसार काही उदाहरण पाहू.

आपण दुधाचा विचार करू. दूध, विशेषत: गायीचे दूध अत्यंत सात्त्विक आहे. लहान मुलांसाठी ते पचायला हलके आहे व त्याचे चांगले परिणाम आपणास दिसून येतात. पण हे गायीचे दूध ज्या वेळी बंद बाटलीमध्ये येते, ज्या वेळी कृत्रिम रंग व कृत्रिम सुवासिक द्रव्यं त्यात मिसळली जातात, चांगल्या चवीसाठी त्यात खूप जास्त साखर मिसळली जाते त्या वेळी त्याची सात्त्विकता किंवा त्यामुळे मिळणारे चांगले परिणाम कमी होतात. उलट अशा दुधाच्या सतत सेवनामुळे ADHD, पोटाचे विकार, एकाग्रता कमी होणे अशी लक्षणे निर्माण होतात. म्हणजे जे दूध आम्ही सात्त्विक अन्न म्हणून सेवन करतो त्यावरील प्रक्रियेमुळे त्याचा सात्त्विक गुणधर्म कमी होऊन ते राजस गुणधर्म निर्माण करते. जर हेच गायीचे दूध ताजे, अल्प उष्ण योग्य मात्रेत घेतले तर मात्र नक्कीच आपणास त्याचे सात्त्विक गुण बघावयास मिळतात. हेच दूध अति मात्रेत सेवन केल्यास वा आरामदायी जीवनशैली असणा-या व्यक्तींनी सेवन केल्यास त्यास ते Metabolic disorder निर्माण करून आळशीपणा, वजन वाढणे अशी लक्षणे तयार करील.

दुसरे उदाहरण आपण तांदळाचे घेऊ. तांदळाचा भात हेसुद्धा सात्त्विक अन्न समजले जाते. तांदूळ हे धान्य पूर्ण जगभरात सेवन केले जाते. तांदूळ भाजून घेतला व कुकरच्या बाहेर शिजवून पाणी काढून टाकल्यास तो पचावयास खूप हलका होतो व शरीराचे व मनाचे पोषण व्यवस्थित करतो. किंबहुना पाणी न काढता शिजवलेला तांदूळ, तसेच तांदूळ शिजल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून खाल्लेला तांदूळ हा पचावयास जड होतो. परिणामी रक्तातील साखर वाढवतो, शरीरात जडपणा आणतो व सुस्ती निर्माण करतो. याचाच अर्थ मधुमेही रुग्णांसाठी या प्रकारे केलेला तांदळाचा भात हा तामस किंवा राजस ठरू शकतो. तो भात एखाद्या अशक्त व्यक्तीसाठी शरीरास व मनास पोषक सिद्ध होऊन त्या व्यक्तीसाठी सात्त्विक सिद्ध होऊ शकतो.

तिसरे अत्यंत महत्त्वाचे उदाहरण ज्याचा मागील लेखातसुद्धा उल्लेख केला गेला ते म्हणजे मांसाहार. जगातील ९०% लोक मांसाहारी आहेत व नियमित मांससेवन करतात. मांससेवन आपल्या संस्कृतीमध्ये तामस समजले जाते. म्हणजे जगातील इतर लोक जे नियमित मांससेवन करतात ते सात्त्विक नाहीतच का? याचाच अर्थ योग्य वातावरणात, योग्य पद्धतीने, परंपरेनुसार, प्रमाणात सेवन करण्यात येणारा मांसाहारसुद्धा शरीरावर योग्य परिणाम करत असणारच. काही देशांतील मांससेवन करणा-या व्यक्तींची आयुर्मर्यादा, कुशाग्रता निव्वळ शाकाहारी आहार घेणा-या व्यक्तींपेक्षा खूप जास्त आहे,.वरील उदाहरणांतून असे लक्षात घेणे गरजेचे आहे की, जे पदार्थ ग्रंथात सात्त्विक, राजसिक किंवा तामसिक म्हणून वर्णिलेले आहेत त्यांचा आजच्या जीवनशैलीत आपल्या शरीररावर व मनावर कसा परिणाम होतो यावर ते ठरत असते. आयुर्वेदीय ग्रंथामध्ये त्यासाठी ‘सातम्य’ असा शब्द आला आहे. ब-याच वेळा या शब्दाचा अर्थ ज्या पदार्थांची शरीराला सवय झाली आहे, असा घेतला जातो. तसे न समजता जो पदार्थ कुठल्याही शारीरिक अवस्थेत शरीराचे सुयोग्य पोषण करतो तो पदार्थ ‘सातम्य’ असा अर्थ घ्यावा. म्हणजे जे जे पदार्थ शरीरास सातम्य आहेत ते सर्व शरीरास व मनास सात्त्विक समजावे व त्या अनुषंगाने राजसिक व तामसिक समजावे.

बदलत्या काळात खाण्याचे पदार्थ, खाण्याची पद्धत व खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. जुन्या काळात वर्णन केलेले पदार्थ आजही त्याच पद्धतीने शरीरावर व मनावर कार्य करतील असे नाही. बदलत्या काळातील पदार्थांबद्दल आपणा सर्वांना पदार्थांचे सत्त्व, रज व तमानुसार सोप्या पद्धतीने वर्गीकरण करून आरोग्य कसे राखता येईल, याचा प्रयत्न केला आहे व त्यासाठी हा खटाटोप. थोडक्यात, ताजे अन्न, सुपाच्य, कमी प्रक्रिया केलेले, शक्यतो घरी तयार केलेले, प्रमाणात सेवन केलेले, भूक लागल्यानंतर सेवन केलेले अन्न, जास्त रसायने, कृत्रिम पदार्थ न वापरलेले अन्न हे आजच्या काळातील सात्त्विक अन्न समजावे.