आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B-12 चे महत्त्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनसत्त्वे आपल्या आहारातील अविभाज्य व अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत. ती आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचे फक्त पोषणच नाही तर ब-याच अंशी संतुलन राखण्यास मदत करतात. यासोबतच शरीरातील महत्त्वाच्या क्रिया पार पाडण्यासाठी त्यांची मोठी मदत होत असते.

जीवनसत्त्व बीचा समूह पूर्णपणे जलविद्राव्य अाहे. त्यातल्या त्यात जीवनसत्त्व B12चे महत्त्व आता जाणवायला लागले आहे. जीवनसत्त्व B12ची रचना अत्यंत क्लिष्ट असून कोबाल्टच्या भोवती असते. जीवनसत्त्व B12चे महत्त्व मिथिओनाइन (Methionine) या प्रथिनाच्या निर्मितीसाठी आहे. मिथिओनाइनची निर्मिती रक्तातील गाठी तयार करण्याच्या प्रक्रियेला नियंत्रणात ठेवते व परिणामी मेंदूविकार व हृदयविकार यावर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.

आपल्या दैनंदिन आहारामध्ये याची मात्रा अत्यंत अल्प लागते व आपल्या यकृतामध्ये हे जमा होऊन राहते. साधारणपणे वयाच्या ९व्या वर्षापासून ५०व्या वर्षांपर्यंत याची दैनंदिन आहारातील आवश्यक मात्रा १.५ मिलिग्राम इतकी असते. आपल्या यकृतामध्ये साधारणपणे १ वर्षापेक्षा जास्त पुरेल इतके B12 जीवनसत्त्व साठवलेले असते. असे असूनसुद्धा भारतीयांमध्ये या जीवनसत्त्वाचा सातत्याने अभाव का दिसून येतो हा एक मुख्य प्रश्नच आहे.
आजकाल बहुतांश वेळा मधुमेही, वयस्क व्यक्ती, हृदयरोग, केस गळणे या तक्रारी/व्याधी असणा-या व्यक्ती जीवनसत्त्व B12ची कमतरता दर्शवतात. व डॉक्टर मंडळी त्यांना गोळ्या किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात B12 देताना आढळतात. मागील काही वर्षांमध्ये सर्वसाधारण लोकांमध्ये B12ची कमतरता जाणवत आहे. याचे महत्त्वाचे कारण आपल्या जीवनशैलीतील व आहारपद्धतीमधील बदल किंवा या जीवनसत्त्वाबद्दलची समाज व डॉक्टर वर्गातील जागरूकता होय.

ब-याच वेळा जीवनसत्त्व B12चा अत्यधिक व अनावश्यक उपयोग होताना दिसून येतो. तर काही वेळेस आवश्यक मात्रेपेक्षा ते कमी प्रमाणात सेवन होताना दिसून येते. त्यासाठी जीवनसत्त्व B12ची रक्तातील तपासणी करून त्याची मात्रा ठरवणे आवश्यक वाटते.
जीवनसत्त्व B12च्या कमतरतेचे चार टप्प्यांमध्ये आपण विभाजन करू शकतो.
प्रथम जीवनसत्त्व B12ची रक्तामध्ये कमतरता होऊन रुग्णाला पंडुरोग (anaemia) सदृश लक्षणे दिसून येतात. त्यामुळे रक्तातील लाल पेशींचे कार्य बिघडते. परिणामी लाल पेशी ऑक्सिजनचा अवयवांना व पेशींना व्यवस्थित पुरवठा करू शकत नाहीत व त्यामुळे थकवा, मुंग्या येणे, हातपाय सुन्न पडणे अशी लक्षणे निर्माण होतात. ही परिस्थिती अशीच राहिली तर मेंदू, मज्जारज्जू (spinal cord) व संवेदनावाहू नाड्यांवर याचा दुष्परिणाम होतो. ब-याच लोकांना जीवनसत्त्व B12च्या कमतरतेमुळे आम्लपित्ताचा त्रास होतो.

ज्या व्यक्तींमध्ये जीवनसत्त्व B12ची कमतरता आढळते त्यांना मांसाहाराचा सल्ला दिला जातो. शाकाहारी व्यक्तींमध्ये जीवनसत्त्व B12ची कमतरता प्रकर्षाने जाणवते असे मानले जाते. याचा अर्थ सर्व शाकाहारी व्यक्तींनी मांसाहार घ्यावा, असे नाही. त्यासाठी आपणास जीवनसत्त्वाच्या चयापचयाची माहिती घेणे आवश्यक आहे.

आपल्या आतड्यांमध्ये असंख्य सूक्ष्म जिवाणू असतात जे आपल्या आहाराचे विघटन व पचन करण्यास मदत करतात. ब-याच कारणांमुळे हे उपकारक जिवाणू आपल्या आतड्यांमध्ये जगू शकत नाहीत. वयामुळे आतड्यांच्या काही आजारांमुळे, खूप जास्त प्रमाणात वेदनाशामक औषधी किंवा Metformin सारखे मधुमेहावरचे औषध सातत्याने घेतल्याने या उपकारक जिवाणूंच्या वाढीवर परिणाम होतो. त्याहीपेक्षा जास्त चुकीचा आहार, खूप जास्त प्रमाणात फास्ट फूड, शीतपेय, हवाबंद आहार यांच्या सततच्या सेवनानेसुद्धा आतड्यांतील पचन घडवून आणणा-या सूक्ष्म जिवाणूंवर विपरीत परिणाम होतो व जीवनसत्त्व B12ची कमतरता भासते. यामुळे आंबट पाणी येणे, वजन कमी होणे, घबराट होणे, हृदयाची गती वाढणे, दम लागणे व द्रव मलप्रवृत्ती वाढते.

मांसाहारातून मिळणारे जीवनसत्त्व B12 हे त्यातल्या प्रथिनांना बांधले गेलेले असते व आपल्या आतड्यांना व आतड्यातील सूक्ष्म जिवाणूंना प्रथिने व जीवनसत्त्व B12 यांचे विघटन करावे लागते. हे विघटन योग्य पद्धतीने झाल्यावर Intrinsic factor हे तत्त्व जीवनसत्त्व B12चे शोषण करते ते आतड्यांमध्ये साठवले जाते. ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आपली पचनशक्ती उत्तम असणे गरजेचे आहे.

पचनशक्ती बिघडली असेल, आपले आहारावर नियंत्रण नसेल व आपण आहार सेवन नियमांचा अवलंब करत नसू तर जीवनसत्त्व B12ची औषधे घेऊनही फारसा उपयोग नाही. कारण आपल्या पचनशक्तीवरच Intrinsic factor हे शोषण तत्त्व अवलंबून असते. ज्या लोकांचे पचन, शोषण व उत्सर्जन खूप चांगले आहे व प्राकृत/योग्य आहे, व जे पूर्ण शाकाहारी आहेत त्यांचे जीवनसत्त्व B12 प्राकृत आढळते. त्यामुळे मांसाहाराची नाही तर योग्य आहार प्रणालीची व योग्य जीवनशैलीची आवश्यकता आहे.