आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Chhaya Mahajan Article About Women Writer And Human Mentality

लेखिकांबद्दल कुंठित मानसकिता का ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
६ व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या दोन दिवसांतील विविध कार्यक्रमांनी अनेक लेखनानुभवांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. यातील विविध कार्यक्रम आखणीमुळे प्रत्येक सहभागी महिलेला योग्य व्यासपीठ मिळाले. साहित्याशी फार जवळीक नसलेल्या व्यक्तींमध्ये महिला साहित्यिकांविषयी जागर करण्याचे महत्त्वाचे कामही यातून झाले. नवलेखिकांनाही भरपूर वाव मिळाला. मराठवाड्याचा सांस्कृतिक विकासाचा बॅकलॉग फारच मोठा असल्याची तीव्र जाणीव यातून झाली. वास्तवात साहित्य हे संस्कृतीचे अविभाज्य अंग असूनही संस्कृतीची प्रमुख वाहक असलेली महिला त्यातून कढीपत्त्यासारखी बाजूला काढली जाते. महिलांच्या प्रतिमा व अनुभवविश्वही पुरुषांनीच कागदावर उतरवावे का? असा प्रश्नही यातून निर्माण होतो. कुटुंब, समाज, साहित्य व्यासपीठं शिवाय प्रकाशक, समीक्षक या विविध पातळीवरून लेखिकांच्या साहित्याला ‘बायकांनी काही तरी लिहिलंय’ याच नजरेतून पाहिलं जातं. मराठवाड्याच्या सांस्कृतिक प्रगल्भतेच्या या मर्यादा आहेत, असं अनेकींंच्या अनुभव कथनातून प्रकर्षाने जा‌णवलं. वेळ न मिळणे, साहित्याचे योग्यरीत्या विपणन न करता येणे, इतकेच काय तर माणूस म्हणून लेखन करण्यासही कौटुंबिक दबावांना सामोरे जावे लागते. वेळ, विपणन व अनुभवांचे तोकडे विश्व या मर्यादा बहुतांश लेखिकांनी व्यक्त केल्या.

वेळ, विपणन, परिपक्वता :
संपूर्ण साहित्य संमेलनात हे तीन घटक सर्वाधिक चर्चिले गेले. नवोदित लेखिकांसह प्रस्थापितांनीही या घटकांसंदर्भातली उणीव अधोरेखित केली. मराठवाड्यातील महिला मग त्या नोकरी करणाऱ्या असो वा गृहिणी. सर्व सांसारिक जबाबदाऱ्या उरकल्यावरही, तिने कधी लेखन करावे यावर अंकुश असतोच. रात्री लेखन करत बसल्यास घरातल्या सदस्यांची कुरबूर असतेच. कुटुंबातून लेखनकार्याची अंमळ उपेक्षाच झाल्याचे या ठिकाणी सुशिक्षित अगदी व्यवसायाने डॉक्टर, प्राध्यापक असलेल्या महिलांनीही सांगितले. कविता मध्यरात्री स्फुरणे यात अयोग्य असं काहीच नाही; पण तस लिहीत बसल्यास कुटुंबातील पती किंवा अन्य सदस्यांचा त्याला आक्षेप असतो. ही स्त्रीचीच नव्हे, तर अभिव्यक्तीचीच पहिल्या पायरीवर होणारी उपेक्षा आहे. कविता कागदावर उतरवली की मग श्रोता कोण? हा दुसरा प्रश्न आहे. छोट्या-मोठ्या व्यासपीठांची शोधाशोध सुरू होते.

कवितेला वाहवा मिळू लागली की यातील शक्तीची जाणीव झालेल्या साहित्यिक महिला अधिकाधिक लिहू लागतात. घरातून पाठिंबा मिळालेल्या यात सातत्य राखू शकतात. वेळेचा ताळमेळ तरीही बसत नाही. शब्द घरातील जबाबदाऱ्यांमध्ये व नोकरी करत असल्यास कामाच्या व्यापात विरून जातात, असा अनुभवही काही महिलांनी सांगितला. महिलेचे साहित्य असा दृष्टिकोन असल्याने प्रकाशक मिळणेही कठीण असते. लेखिका संमेलनातील पुरुष साहित्यिकांची किरकोळ उपस्थितीही ‘बायकांचं संमेलन’ ही संकल्पना अधोरेखित करणारी होती. लेखिका संमेलनाला लेखकांनी निमंत्रणाशिवाय येऊ नये, हा पुरोगामी महाराष्ट्रातील अलिखित नियम आहे, हे या संमेलनाच्या निमित्ताने सिद्ध झाले. मराठवाड्याच्या साहित्य क्षेत्रातील पुरुषांची ही मानसकिता खटकण्यासारखी आहे. साहित्याचे व्यावसायिक पातळीवर विपणन होऊ न शकल्याने वाचकांपर्यंत ते मोठ्या प्रमाणात पोहोचू शकत नाही. तस्लिमा पटेल ही एकमेव मुस्लिम लेखिका मुस्लिमबाहुल्य असलेल्या मराठवाड्यात आहे, हे वास्तवही विचार करण्यासारखे आहे.

मराठवाड्यातील लेखिकांच्या, विशेषत: नवोदित लेखिकांच्या साहित्यात व अनुभव कथनात परिपक्वता येण्याची गरज ज्येष्ठ लेखिकांनी व्यक्त केली. साहित्याला व्यावसायिक पातळीवर स्वीकारण्याची मानसकिता फार कमी स्त्रियांमध्ये आहे. प्रवासानुभव, वाचनानुभव समृद्ध होण्यासारखे वातावरण अद्यापही त्यांना मिळत नाही. डी-जेंडर होऊन लिहिणाऱ्या लेखिकांच्या व्यक्तिगत आयुष्याची चिकित्सा जास्त होते. त्यामुळे ते साहित्य चर्चेच्या व समीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. तिच्या साहित्यातील पात्र, अनुभव, पुरुष पात्र तिला कसे स्फुरले याची काळजी व अन्वेषणच जास्त होते. त्यामुळे स्त्रीविषयीची ही कुंठीत मानसकिता उबग आणणारी वाटते. तिच्यातली प्रतिभेची पातळी पाहण्यास उत्सुक नसलेलेच जास्त. त्यामुळे स्त्री-साहित्य ही ज्ञानशाखा म्हणून पाहणे मराठवाड्याच्या रसिकांच्या वृत्तीत नाही. ही वृत्तीच या साहित्याला बायकांचं साहित्य म्हणून माजघरातच लोटून देणारी आहे.

दुसरी बाब म्हणजे समीक्षा व नाट्यलेखनात लेखिकांचे प्रमाण नगण्य आहे. रेखा बैजल या एकमेव लेखिका नाट्यलेखनात यशस्वी झाल्या. त्यांच्या ‘भिंत काचेची’ या नाटकाचे हजारो यशस्वी प्रयोग झाले. महिलांचे समीक्षा लेखन केवळ विद्यापीठ स्तरापर्यंतच राहिले आहे. माव‌ळत्या संमेलनाध्यक्षा ललिता गादगे यांनी हौस म्हणून लेखन करू नका, असे कळकळीने सांगितले. सकसच लिहिणार, या निश्चयाने लेखणी हाती घेण्याचे आवाहन त्यांनी स्त्री साहित्यिकांना केले.

संमेलनाध्यक्षा छाया महाजन यांनी स्वतंत्र लेखिका संमेलनाचे उद्दिष्ट सांगताना, ही वेगळी चूल नसल्याचे स्पष्ट केले. लेखिका संमेलन लोकसंख्येच्या ५० टक्के घटकाचे प्रतिनिधित्व करते. जे ‘महिलांचं काही तरी लेखन आहे’ असा सूचक उल्लेख करतात, त्या पुरुषांनाही संमेलनाध्यक्षांनी खास संदेश दिला. ‘महिला साहित्यिकांचं पुरुष वाचत नसतीलही, पण त्यांनी महिला लेखिका त्यांचं फार बारकाईने वाचतात या भ्रमात राहू नये’, असे डॉ. महाजन यांनी स्पष्ट केले.