आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णकिरणांची महती अपार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखामध्ये आपण जीवनसत्त्व बी १२बद्दल माहिती बघितली. यासोबत आणखी एक महत्त्वाचे जीवनसत्त्व, ज्याची कमतरता अलीकडच्या काळात लोकांमध्ये बघायला मिळते ते म्हणजे, जीवनसत्त्व ड. जीवनसत्त्व ड-३ आणि कॅल्शियमचा खूप जवळचा संबंध आहे. कॅल्शियमचा आणि हाडांच्या मजबुतीचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे जीवनसत्त्व ड-३चा संबंध थेट हाडांच्या आरोग्याशी येतो. अलीकडच्या काळात हाडांंमधील ठिसूळपणा वाढण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. त्याचे मुख्य कारण म्हणजे जीवनसत्त्व ड-३ आणि कॅल्शियमची कमतरता होय. वरवर पाहता जरी जीवनसत्त्व डचा संबंध फक्त हाडांशी दिसत असला तरी यापेक्षाही या जीवनसत्त्वाचा संबंध हृदयविकार, कर्करोग, मधुमेह यांच्याशीही दिसून येतो. सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा स्रोत आहे.
आहारामधून मिळणा-या जीवनसत्त्व डचे शोषण आतड्यांच्या शेवटच्या दोन भागांमधून होत असते. जीवनसत्त्व ड संपूर्णपणे स्नेह विद्राव्य जीवनसत्त्व असल्याने, त्याचे शोषण आपण सेवन केलेल्या स्नेहांशासोबतच आतड्यामधून होते. शाकाहारामध्ये फक्त दुधाच्या माध्यमातून जीवनसत्त्व ड मिळते. मांसाहारात विविध प्रकारच्या माशांमधून, अंडी, माशांचे यकृत किंवा विविध माशांचे तेल यापासून हे जीवनसत्त्व मिळत असते. सूर्यप्रकाशाच्या साह्याने त्वचेमध्येसुद्धा हे जीवनसत्त्व तयार होत असल्याने जीवनसत्त्व डसाठी मांसाहारावर अवलंबून राहण्याची गरज नाही. सूर्यप्रकाशाचा जीवनसत्त्व डच्या निर्मितीमध्ये एवढा वाटा आहे की, थंडीच्या दिवसांत ज्या वेळी सूर्यप्रकाश कमी असतो त्या दिवसांमध्ये, जीवनसत्त्व डचे प्रमाण उन्हाळ्याच्या तुलनेत कमी असते.
वातानुकूलित वातावरणात राहणा-या व्यक्तींमध्ये जीवनसत्त्व डची कमतरता दिसून येते. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश कमी असतो अशा प्रदेशात किंवा देशात दूध किंवा अन्य खाद्य किंवा पेयपदार्थ जीवनसत्त्व डने संपुरित केले जातात. सध्या भारतीयांमध्येही या जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी आढळते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार अगदी लहान मुलांनासुद्धा जीवनसत्त्व ड देण्याबद्दल सुचवण्यात आले आहे.
जीवनसत्त्व डची त्वचेमधील निर्मिती ब-याच गोष्टींवर अवलंबून असते. प्रदेश, वय, व्यायाम, कपडे घालण्याची पद्धत, मिळणारा सूर्यप्रकाश, त्वचेचा रंग, किती उंचीवर राहतो, इत्यादी गोष्टींवर जीवनसत्त्व डचे प्रमाण अवलंबून असते. उदा. वयस्कर लोकांमध्ये जीवनसत्त्व डची निर्मिती मंदावलेली असते. ज्या व्यक्ती पूर्ण अंगभरून कपडे घालतात, ज्यांच्या त्वचेचा कुठलाही भाग उघडा नसतो अशा व्यक्ती (याचा अर्थ आपण तोकडे कपडे घालावे असा नाही), खूप गो-या व्यक्तींमध्ये जीवनसत्त्व ड निर्मिती मंदावते.

ज्या व्यक्तींमध्ये चयापचयात्मक आजार आहेत, विशेषत्वाने स्थूलतेसारखे आजार आहेत, त्या व्यक्तींमध्ये जीवनसत्त्व डचे खूप कमी प्रमाण आढळते. वास्तविक पाहिल्यास अशा आजारामध्ये जीवनसत्त्व डचे आतड्यांमधून शोषण व्यवस्थित होते. मात्र, हे जीवनसत्त्व ड चरबीच्या पेशीमध्ये जमा होत जाते. त्याचा शरीराला उपयोग होत नाही. हाडांचा ठिसूळपणा वाढतो. अशा वेळी या जीवनसत्त्वाच्या गोळ्या, इंजेक्शनसोबत चरबी किंवा वजन कमी करणे जास्त संयुक्तिक असते. वजन कमी झाल्यावर अशा पोषक मूल्यांचेही प्रमाण कमी होईल किंवा अस्थी ठिसूळ होतील, असा एक गैरसमज आहे. मात्र, वजन कमी होताना चरबीचे पेशीमधील जमा झालेले जीवनसत्त्व ड पेशीमधून बाहेर येऊन ते क्रियाशील होऊन हाडांच्या आरोग्यासाठी हितकर ठरते.
हे जीवनसत्त्व हृदयविकार, मधुमेह, कर्करोग नियंत्रणात ठेवण्यातसुद्धा त्याचा महत्त्वाचा सहभाग असतो. त्याबद्दलची माहिती पुढच्या लेखात पाहूया.
(क्रमश:)