आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिकता तयार करणं अत्यावश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतीनं लेबर रूममध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात भारतात तसा काही कायदा वगैरे नाही. पण पतीनं हजर राहायला हवं, असं माझं वैयक्तिक मत आहे. नवऱ्यांना त्या संदर्भात व्यवस्थित प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. औरंगाबादेत गेल्या दहा वर्षांपासून मी, डॉ. चारुलता रोजेकर आणि काही स्त्रीरोगतज्ज्ञ मैत्रिणी मिळून अशा पद्धतीचं प्रशिक्षण देत आहोत. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे आजही याबाबतीत समाजात उदासीनता दिसून येते. सुशिक्षित मंडळीही यासाठी पुढे येत नाहीत.
कारण समाजात याबद्दलचे पारंपरिक समज. त्यामुळे या प्रशिक्षणवर्गात गेल्या १० वर्षांत ५ टक्के नवऱ्यांचीही उपस्थिती नाही. डिलिव्हरीच्या वेळी महिलेचा पती उपस्थित असणं ही स्वागतार्ह बाब आहे. प्रसूतीतज्ज्ञांनी याबद्दल कुटुंबीयांना कल्पना द्यावी. समुपदेशनातून पतीची मानसिकता तयार करावी. स्त्रियांचे आरोग्य सुधारण्यात या गोष्टीचा हातभार लागेल. या काळात महिलांच्या त्रासाची प्रत्यक्ष कल्पना आल्यास नियोजनाच्या साधनांचा वापर वाढू शकतो. स्त्रियांवर गर्भारपण लादलं जाणार नाही. डॉक्टर- पेशंट रॅपो वाढेल. एकूणच बाळंतपणात पुरुषाचा जेवढा प्रत्यक्ष सहभाग वाढेल, तेवढीस्त्री आरोग्यात सुधारणा होईल. ☻

नातं घट्ट करण्यासाठी चांगला प्रयोग
माझ्याकडे अनेक पुरुष आजकाल प्रसूती बघू देण्याबद्दल विचारणा करतात. मी त्यांना साहजिकच त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक करत परवानगी देते. त्यामुळे त्या दोघांचं भावनिक नातं आणखी घट्ट होत जातं. या एका नाजूक क्षणी आपल्या पत्नीची सोशिकता आपल्यापेक्षाही अधिक आहे याचा अनुभव त्यावेळी पुरुषाला येतो. त्यामुळे या संवेदनशील प्रयोगाचं मी नेहमीच स्वागत करीत आले आहे. मात्र काही वेळा याउलटही अनुभव येतो. काही पुरुष फारसे उत्सुक नसतात. मी स्वत: अशा प्रकारे प्रसूती पाहता येते हे नेहमी सांगते. पण सांगूनही काही पुरुष याबाबत आस्था दाखवत नाहीत. अशा वेळी या प्रयोगाला प्रोत्साहनदेखील द्यायला हवे.
डॉ. निवेदिता पवार, नाशिक
पद्धत रुळायला हवी
महिलांना प्रसूतीदरम्यान खरा पाठिंबा नवऱ्याकडूनच मिळत असतो. तिला जो त्रास सहन करावा लागतो तो शब्दांत आपण व्यक्तच करू शकत नाही. जळगावात किंवा खान्देशात अजून फारशी ही पद्धत रुळली नाहीये, की प्रसूतीदरम्यान नवरा लेबर रूममध्ये थांबेल. डॉक्टरांकडे विचारायला येणारेदेखील कमी असतात. कारण ५० टक्के प्रसूती माहेरच्या गावी होत असतात. त्यामुळे लेबर रूममध्ये काय तर हॉस्पिटलमध्येच नवरा नसतो. जर तो उपस्थित असेल आणि त्याने विचारले की मला लेबर रूममध्ये यायचे आहे तर आम्ही नाही म्हणत नाही. कारण महिलेसाठी तो पाठिंबा चांगला असतो. फक्त तिला होणारा त्रास, होणारा रक्तस्त्राव पाहून नवऱ्याला त्रास नको व्हायला. कारण असे झाल्यास मग नवऱ्याला सांभाळायचे की रुग्णाला, हा प्रश्न डॉक्टरांना पडतो. त्यामुळे मनाने हळवी व्यक्ती असल्यास बाहेर थांबलेलीच बरी. जळगावात आतापर्यंत ५ ते ७ जणांनीच मला विचारले असेल. ते मेडिकल क्षेत्रातील खासकरून जास्त असतात. त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात त्यामुळे ते येतात. प्रसूती काळात महिलेचा त्रास पाहून अनेकदा पुरुषांना जाणीव होते की किती त्रास सहन करायला लागतो. यामुळे पुढे मूल होताना थोडा तरी पुरुषाच्या मानसिकतेवर परिणाम झाला असतो. त्यामुळे लेबर रूममध्ये पती आला तर नक्कीच भावनिकरीत्या त्या महिलेला पुढेही मानसिक आधार मिळतो.
डॉ. सीमा पाटील, जळगाव