मुलांना उन्हाळ्याची सुटी सुरू झाल्याने घरात विरंगुळा म्हणून मुलांना काही तरी करायचं असतं. वर्षभराच्या धावपळीतून उन्हाळ्याचा हा काळ मुलांना आणि पालकांनादेखील थोडाफार निवांत, आरामाचा मिळत असतो. थोडे दिवस का होईना मुलांची शालेय बौद्धिक कामांतून सुटका होते. जीवनात बदल नसेल तर शरीर व मनाला मरगळ येते. या दिवसात लहान मुलांनी भरपूर खावे, खूप खेळावे व बिनधास्तपणे भरपूर झोपावे. मुलं या दिवसांत स्वनिर्मितीचा आनंद घेण्यासाठी निरनिराळ्या कलाकृती घरबसल्या बनवू शकतात. शिकलेली कोणतीही कला वाया जात नाही. आजपासून शिकूया काही पुष्परचना.
साहित्य–
नैसर्गिक व कृत्रिम फुले, पाने, ओल्या फांद्या, वाळलेल्या गव्हाच्या ओंब्या, सायकसची पाने, वाळलेली बाजरी/ज्वारीची कणसे, पुष्पपात्र किंवा फुलदाणी, पिन होल्डर, ओअॅसिस किंवा स्पंज, कात्री, इतर साहित्य-
शोभिवंत वस्तू जसे रंगीत दगड, काचेच्या गोट्या, वाळू, शिंपले, शंख, कृत्रिम पक्षी, शोभेचे लहान प्राणी, मेणबत्ती, बाहुल्या हेही वापरू शकतो.
कृत्रिम रचनांसाठी–
रंगीत कागद, जुने रबरी बॉल, दोरा, हिरवा कागद, रंगीबेरंगी प्लॅस्टिक.
कृती–
कृत्रिम फुले, पाने व ओल्या फांद्या यांना एकत्र दोरीने गुंडाळून फुलांचा गुच्छ बनवावा. तसेच वाळलेल्या गव्हाच्या
ओंब्या, बाजरी/ज्वारीच्या कणसांना व पानांना रंग लावावा. नंतर फुलांचा गुच्छाच्या मागील बाजूने ही रंगीबेरंगी कणसाची पाने लावावी. या दोघांना मिळून एकत्ररीत्या दोरीने गुंडाळावे. नंतर स्पंजवर या काड्या अडकाव्यात. अगोदर हा स्पंज फुलदाणी वा पुष्पपात्रात टाकून घ्यावा. या फूलदाणीत पाणी टाकू नये. जर काचेचे पुष्पपात्र असेल तर स्पंज टाकून त्यात वाळू, रंगीबेरंगी दगड, शिंपले त्यात टाकावे. ज्या ठिकाणी दोरी बांधलेली नाही त्याला रंगीबेरंगी कागद लावून सजवावे. या प्रकारे तुमच्या घरात फुलांची एक कलाकृती तयार झाली. जी कायमसाठी तुमच्या घरातही शाेभिवंत वस्तू म्हणून राहील. ही सुंदर फूलदाणी भेटवस्तू म्हणूनही देता येईल.
डॉ. जयंती चौधरी, जळगाव
drjayantipc@gmail.com