आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंतुमय पदार्थांचा अतिरेक टाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आहारात आवश्यक घटकांमध्ये प्रथिने, कर्बोदके, स्नेह, जीवनसत्त्वे व खनिजे यांना आपण अन्यनसाधारण महत्त्व देतो. बरेचसे आजार या घटकांच्या कमतरतेमुळे किंवा जास्त झाल्याने होत असतात. संतुलित आहार अशी आपण व्याख्या करतो त्या वेळी वरील घटकांचे योग्य प्रमाण सेवन हे त्या त्या व्यक्तिपरत्वे असणे गरजेचे असते. मात्र फक्त एवढेच घटक संतुलित आहार देऊ शकत नाही. या घटकांच्या शिवाय आहाराच्या विविध गुणधर्मांचा विचार करणे आवश्यक असते. तंतुमय पदार्थांचे प्रमाण यांचा विचार या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.

पाश्चिमात्य देशांमध्ये आहारातील तंतुमय पदार्थाचे अत्यधिक महत्त्व असून आयुर्वेदाने किंवा प्राचीन आहारशास्त्रामध्ये तंतुमय पदार्थांना जास्त महत्त्व दिलेले आढळून येत नाही. याची चर्चा करणे आवश्यक वाटते.

तंतुमय पदार्थाचे गुणधर्म बघता, ते आतड्यांमध्ये जाऊन पाणी शोषून ठेवतात व मलास घनता प्राप्त करून देतात. या कारणास्तव बद्धकोष्ठतेमध्ये तंतुमय पदार्थांचा वापर खूप सामान्य झाला आहे. तंतुमय पदार्थाचे वर्गीकरण बघता जलविप्राण्य व जलअविद्र्याव्य (Soluble and unsoluble) असे दोन प्रकार पडतात. जलविद्राव्य तंतुमय पदार्थामध्ये फळं, भाज्या, शेंगा, यांचा समावेश होतो. तर जल अविद्राव्य तंतुमय पदार्थांमध्ये गहू, ज्वारी, ओट्स यांचा समावेश होतो.
या वर्गीकरणाप्रमाणे जलअविद्राव्य तंतुमय पदार्थांचा (unsoluble) उपयोग मलावरोधामध्ये (constipation) अाधिक्याने होतो. विद्राव्य तंतुमय पदार्थांचा उपयोग काॅलेस्टराॅल व एलडीएलचे प्रमाण कमी करण्यासाठी होतो. याचाच अर्थ विद्राव्य तंतुमय पदार्थाचा उपयोग हृदयविकारामध्ये प्रभावीपणे केला जाऊ शकतो.
तंतुमय पदार्थाचे इतके चांगले गुण असताना काही प्रमुख प्रश्न उपस्थित होतात ते म्हणजे प्राचीन भारतीय आहारशास्त्रात तंतुमय पदार्थाची मािहती का दिसून येत नाही. ज्या व्यक्ती तंतुमय पदार्थाचे सातत्याने सेवन करणाऱ्यांमध्ये पचनाच्या व हृदयाच्या बऱ्याचशा व्याधी आढळून येतात. अनेक लोकांचे सातत्याने तंतुमय पदार्थ खाऊनसुद्धा वजन कमी होत नाही. याचा अर्थ तंतुमय पदार्थांना तितके महत्त्व देणे गरजेचे आहे काय? बऱ्याच वेळा इसबगोल, गव्हाचा कोंडा, मोड आलेली धान्ये, कच्च्या भाज्या, अतिप्रमाणात फळांचे सेवन हे तितकेसे उपयुक्त ठरत नाही, असे दिसून येते. यामुळे स्थूलतेमध्ये आतड्यातील उपयुक्त जीवाणूंचा स्तर (intestinal flora) विकृत होऊन त्यामध्ये अनावश्यक जीवाणूंची वाढ होते.
या अनावश्यक जीवाणूंमध्ये तंतुमय पदार्थांचे विघटन करण्याची क्षमता असते व हे जीवाणू तंतुमय पदार्थातील कर्बोदकाचेसुद्धा शोषण करतात. परिणामी चयपचयात्मक व्याधी अंशत: वाढण्यास मदत होते. ज्या व्यक्ती सातत्याने तंतुमय पदार्थ सेवन करतात, त्यांचे अत्याधिक पोट याच पदार्थांनी भरते परिणामी प्रथिनांसारख्या अत्यावश्यक घटकाची कमतरता होऊन इतर व्याधी निर्माण होऊ शक्यतात. भारतीय आहारपद्धतीमध्ये एकदल धान्याच्या स्वरूपात, गहू, ज्वारी, तांदूळ, द्विदल धान्यामध्ये सर्व डाळी, जवस, कारळे, मिरची यांच्या चटण्या, योग्य प्रमाणातील भाज्या असा आहार असल्याने अतिरिक्त तंतुमय पदार्थांचा वापर फारसा उपयुक्त ठरत नाही. कारण वरील सर्व अन्नघटकांमध्ये योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. याउलट पाश्चिमात्त्य आहारामध्ये पिष्टमय पदार्थ व मांसाहाराचे प्रमाण जास्त असून व तंतुमय पदार्थाचा अंतर्भाव अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत अतिरिक्त तंतुमय पदार्थांचा, उदाहरणार्थ सॅलडचा वापर सयुक्तिक ठरतो. त्यामुळे पाश्चिमात्त्यांतील तंतुमय पदार्थांची संकल्पना जशीच्या तशी आपल्या आहारात उतरवणे विचार करावयास भाग पाडते. सातत्याने अतिरिक्त तंतुमय पदार्थांचा वापर केल्यास अपचन, अजीर्ण, पोट फुगणे, पोटात वात निर्माण होणे अशी लक्षणे दिसून येतात. यामुळे आपली जीवनशैली, आपला आहार व देश याचा विचार करूनच अतिरिक्त तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करावा.
हे तंतुमय पदार्थ अतिरिक्त सेवन केल्यास कॅल्शियम, लोह व अन्य महत्त्वाच्या
आहारीय घटकांच्या शोषणावर विपरीत परिणाम दिसून येतो. म्हणून तंतुमय पदार्थांचा वपर काळजीपूर्वक करावा.
(sangitahdesh@rediffmail.com)
बातम्या आणखी आहेत...