आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परंपराहीन मणिपुरीची जीवघेणी झटापट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मणिपूर हे भारताच्या पूर्वोत्तर दिशेस वसलेलं छोटं राज्य. पूर्वोत्तर भारत म्हणजे सप्त साम्राज्यांचे वैभव! पर्वत, नद्या, दर्‍या, सरोवरे, जंगले, पशु-पक्षी, जलचरांचे वैचित्र्य नि वैविध्याने नटलेलाही प्रदेश! हिमालयातून उगम पावणार्‍या ब्रह्मपुत्रा, यमुना, गंगा, कोसी, बारामती, अगस्ति, पद्मा, मेघना अशा महानद्यांनी वेढलेला हा प्रदेश. आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, सिक्किम प्रांतांबरोबर मणिपूर, बराक नदी नि लोकटक सरोवराच्या कुशीत वसलेला हा छोटा प्रांत किती छोटा, तर अवघं साडे आठ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेलं हे राज्य. सन १९७२ला याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला, नि त्याची राजभाषा मितेइलॉन बनली. ही भाषा मणिपुरी, बिष्नुप्रिया, मेईतेइ अशा अनेक नावांनी ओळखली जाते. ती मराठीप्रमाणेच प्राकृतपासून जन्माला आली. त्या अर्थाने ती मराठीची भगिनी भाषा. या भाषेत अनेक मराठी शब्द आढळतात. पूर्वी ही भाषा संस्कृत, प्राकृत प्रभावामुळे देवनागरीत लिहिली जायची. पण ब्रिटिश साम्राज्याच्या प्रभावामुळे तिच्यावर बंगाली भाषेचा जबरदस्त पगडा बसला. आज ही भाषा बांगला लिपीत लिहिली जाते. आसामीचाही तिच्यावर प्रभाव दिसतो. मणिपुरी आज मणिपूरशिवाय त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, पश्चिम बंगाल, सिक्किममध्ये बोलली जाते. महाराष्ट्रातही काही मणिपूर भाषी आहेत. या भाषेस भारतीय राज्यघटनेने भारतीय भाषा म्हणून मान्यता दिली असली, तरी ही अल्पसंख्यभाषी भाषा होय. भारतात अवघे चार लाख लोक ती भाषा बोलतात; पण बालवाडीपासून ते पीएचडीपर्यंत आपणास मणिपुरीत शिक्षण घेता येते. अनेक विद्यापीठांत स्वतंत्र मणिपुरी भाषा विभाग आहेत. जगभर सुमारे १५ लाख मणिपुरी भाषी असून ते भारताशिवाय म्यानमार, बांगलादेशात प्रामुख्याने वस्ती करून आहेत.

आज मणिपुरी भाषेतून केवळ भारतीयच नव्हे, तर म्यानमार, बांगलादेशातील लेखक पण लेखन करतात. मणिपुरी साहित्यास लिखिताची परंपराही हजारो वर्षांची सांगितली जाते. प्राचीन मणिपुरी साहित्य पुया मेइथाबा लिपीत लिहिलं जायचं. ते पद्यात्मक असायचं. नंतर मितेई मयेक लिपीही अस्तित्वात आली. मणिपुरी प्राचीन काव्य औग्री काव्य म्हणजे, निसर्गाची आराधना व स्तोत्रच असायचं. ते आजही गावून, नाचून तेथील आदिवासी पिढ्यान््पिढ्या जपत आले आहेत. आजचं प्रसिद्ध मणिपुरी नृत्य म्हणजे, प्राचीन औग्री काव्याचं सादरीकरणच असतं. हे खरं आहे की, कालपरत्वे त्यात बदल, परिवर्तनाची आवर्तने घडत आली. प्राचीन मणिपुरी साहित्याची गद्यरूपंही आढळतात. सोळाव्या, सतराव्या शतकात मेइडिंगु खगेंबाच्या (१५९७-१६५२) राजकिर्दीत कोनोक थेंग्रा, अपोइमंचा, सलाम सना, युम्नम तोम्बा, खेइदेम तेम्बा, लंगूल लुखोई यांसारख्या साहित्यिकांनी उल्लेखनीय लेखन केलं आहे.

मध्ययुगात गादीवर आलेल्या चरईरोंगबा, पमहेईबा आणि चिंगथनखोम्बा या राजांच्या काळात (क्रमश: आजोबा, वडील, नातू) मणिपुरी लोकजीवन मेईत्रबाक म्हणून ओळखलं जायचं. ते सारं बदलायचं श्रेय या राजांचं. त्यांनी आदिवासी जीवनावर हिंदू संस्कार घडवले. त्यांनी हिंदूंची अनेक मंदिरं उभारली. आज ती त्या काळाच्या कलेची साक्ष देत हिमालयाच्या कुशीत आपले सोनेरी कळस, त्यांचं तेज लखलखीत, चकचकीत ठेवत वारसा जपत आहेत. मात्र, ब्रिटिश साम्राज्य काळात मणिपूरने धर्मांतराची आक्रमणं सहन केलीत. त्यातूनही त्यांनी मेईत्रबाक सुरक्षित ठेवलं. आज मणिपुरी साहित्यातून जे प्राचीन लोकजीवन, लोकसाहित्य, लोकसंगीत, लोकनृत्य झरतं आहे, ते दुसरं तिसरं काही नसून, मेईत्रबाक परंपरा जपण्या-जोपासण्याचा ध्यास नि छंदच!

अठराव्या शतकात मणिपुरी लोकजीवनावर वैष्णव संप्रदायाचा मोठा पगडा बसला. याचं श्रेय तत्कालीन राजा मेइडिंगु पमहेम्बाला (१७०९ ते १७४८) द्यावं लागेल. पण त्यासाठी मात्र, सुमारे सव्वाशे मेईती पुयासमध्ये लिहिलेल्या हस्तलिखितांची आहुती द्यावी लागली. मणिपुरी प्राचीन साहित्याची ही न भरून येणारी हानीच होती. धर्मांध राजांच्या क्रौर्याची ही गाथा मणिपुरी लोक कधीच विसरू शकणार नाहीत व त्या राजास ते कधी क्षमाही करणार नाहीत.
इथून मग मणिपुरी साहित्याची संस्कृत परंपरा सुरू झाली. आज मणिपुरी माणूस देवनागरीऐवजी बांगला लिपीत लिहिणं पसंत करतो, ते केवळ त्या असांस्कृतिक व्यवहाराची प्रतिक्रिया, विरोध म्हणून, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्यसत्ता बदलली की लोकभावनेचा अनादर करत जे धर्मांतर, संस्कृतीचं विकृतीकरण, वारशाचं विद्रुपीकरण, विध्वंस करत राहतात त्यांना इितहास क्षमा करत नसतो. काळ स्वत: अजेय, मृत्युंजय असतो, याची साक्ष देत आजचं मणिपुरी आधुनिक साहित्य निरंतर विकसित होत आहे.

मणिपुरी भाषा आणि साहित्याच्या प्राचीन परंपरेवर एत्तद्देशीयांनी हल्ले केले, तसे परकीय सत्तेनेही! ब्रिटिश आमदानीत तर मेईत्रबाक संस्कृती रक्षणार्थ सन १८९१च्या २७ एप्रिलला अँग्लो-मणिपुरी संघर्षही (युद्धच म्हणायला हवं!) झाला. युद्धात अर्थात, नि:शस्त्र मणिपुरी हरले आणि ब्रिटिशांनी कांगलात पाय ठेवला, टेकला! सन १८७२मध्ये तत्कालीन ब्रिटिश पोलिटिकल एजंट नुटटलनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. तेव्हा विरोध झाला हे खरं आहे, पण आज दीडशे वर्षांनी मात्र मणिपुरीवर इंग्रजीचं आक्रमण जोरकस आहे, हे विसरता येणार नाही. बिष्नुपुरी, मणिपुरी माध्यमांच्या शाळा आज ओस पडत आहेत.

आधुनिक मितेईलॉन (मणिपुरी) जिला बिष्नुप्रिया मणिपुरी म्हणूनही ओळखलं जातं, त्या भाषेत नि बंगाली लिपीत लिहून साहित्य प्रकाशित करणारं मणिपुरी साहित्याचं प्रबोधन पर्व खर्‍या अर्थाने सुरू झालं, ते ‘हाओ दि जम चैंतन्य’च्या प्रकाशनाने. त्यांनी प्राचीन मितेई संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने लोकसाहित्य भाषांतर, लिप्यंतर करून एक नवा अध्याय सुरू केला. त्यांच्या ‘तखेल नगम्बा’(१९००) ‘खही नगम्बा’(१९०२)सारख्या रचना म्हणजे, आधुनिक मणिपुरी साहित्याची अग्रणी पताकाच म्हणावी लागेल.

सन १९२०-३०चं दशक म्हणजे, मितेई संस्कृती, साहित्य, भाषा असा त्रिवेणी पुनरुज्जीवनाचा काळ! या काळानंतर लगेचच सन १९३३मध्ये ‘मणिपुरी सभा’ या साहित्य, संस्कृती, संभाषण समृद्ध करणार्‍या संस्थेची स्थापना झाली व प्रबोधनाचे आधुनिक पर्व खर्‍या अर्थाने अवतरले. मागोमाग मग ‘निखिल हिंदू मणिपुरी महासभा’ची स्थापना झाली. मणिपुरी भाषा आणि साहित्य संवर्धनास लोकचळवळीचं रूप आलं. याच काळात ‘ब्रह्म सभा’ स्थापन झाली. तिला ‘पंडित सभा’ (कोर्ट ऑफ पंिडत) म्हणून संबोधलं गेलं. त्यांनी महाभारतीय परंपरा जोपासली. एका अर्थाने पूर्वापार चालत आलेल्या कर्मकांडाचं हे पुनरुज्जीवन होतं. त्याची प्रतिक्रिया समाज मनात उठणं स्वाभाविक होतं. लेइनिंघन नाओरिया फुलो (१८८८-१९४१) यांच्या नेतृत्वाखाली याचा विरोध झाला. त्यांनी तत्कालीन राजा नि पंडितांविरुद्ध दंड थोपटले. आज त्यांचा गौरव ‘मितेई मैचेऊ’ (मणिपुरी प्रेषित) म्हणून होत आहे. त्यांनी ‘युमलई लैरॉन’(१९३०), अपोकपा मापुगी तुंगंफम’(१९३१), ‘तेंबंबा आंशुंग लेईनिनघतोऊ लेईबाओ’(१९३३), ‘अथोइबा शेइरेंग’(१९३५)सारख्या काव्यरचनांद्वारे आणि ‘मितेइ येलहौ मयेक’(१९३१), ‘मीतेई हाओबं वारी’(१९३४) गद्य कृतींद्वारे नवा इितहास रचला.

आजचं मणिपुरी साहित्य हे तिला भारतीय भाषा आणि राजभाषा म्हणून मान्यता मिळाल्यानंतरची िनर्मिती होय. साठोत्तरी मणिपुरी काव्यात एन. कुंजमोहन सिंग, एल. समरेंद्र सिंग, असंगबम सिंग या ‘सिंग’त्रयीचं मोठं महत्त्व असून ते तिघेही साहित्य अकादमी सन्मानित कवी होत. जागतिकीकरणानंतरच्या कवितेत आर. के. मधुबीर, थंगिअम सिंग, बिजेंद्रजीत नाओरेम, रघु लेइशंगथेम उल्लेखनीय कवी होत. ‘इदु निंघ थोऊ’, ‘लंथेंगंरिबा लांमी’, ‘ही नंगबु होंदेदा’ या समकालीन काव्य कृती नवे वाचक पसंत करताना दिसून येते.

एकविसाव्या शतकाच्या प्रारंभिक दशकात ‘मथोऊ कंबा डी. एन. ए.’, ‘नंगबु नगईबदा’, ‘लेईकंगला’ या कादंबर्‍या मणिपुरीत बहुचर्चित ठरल्या. या काळात एम. नबकिशोर सिंग लिखित ‘पंगल शोंबी एइशे अदोंगिनी’, सुधीर नाओरोइंबांचा ‘लेइयी खरा पुंसी खरा’, लेइतोंजाम सिंग लिखित ‘एइंगी फनेक मचेत’ हे कथासंग्रह पण अशाच कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वाचले गेले. मणिपुरीत नाट्यविधा अपवादानेच हाताळली जाते. मणिपुरी संस्कृतीत नृत्याला असाधारण महत्त्व असणं, हे त्याचं कारण असावं. अरंबम सिंगांचं ‘लेइपकलेई’(१९९५), एन. ल्बोबी सिंगांचं ‘करंगी मामा अमसुंग, करंगी अरोईबा यहीप’(१९८३) या मणिपुरीच्या प्रसिद्ध नाट्यकृती होत. समीक्षा, भाषाशास्त्र, इितहास अशा विविध साहित्य व ज्ञानशाखांत मणिपुरीत होणारं लेखन, तिला अन्य भाषांशी स्पर्धा करायचं बळ देत आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com
बातम्या आणखी आहेत...