आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr.Aishwarya Ambadekar Article About Polycystic Ovarian Disease

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PCOD एक गंभीर समस्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देविका नुकतीच दहावीच्या परीक्षेला बसली होती. तिचे वजन होते ७० किलो. पाळी आल्यापासूनच अनियमित होती. कधी बरेच महिने येत नसे व एकदा आली की रक्तस्राव थांबतच नसे. वजन आणखीनच वाढत चालले होते. चेह-यावर मुरमे, पुटकुळ्या आल्या होत्या. या सर्वांचा परिणाम म्हणजे ती अतिशय निराश झाली होती.

तो दवाखान्याचा दिवस जणू काही अनियमित पाळीचाच दिवस आहे की काय, असे वाटायला लागले होते. कारण येणारी प्रत्येक केस ही अनियमित पाळीचीच होती. एवढ्यातच लहानपणापासून जिला मी नेहमी खट्याळ म्हणायचे अशी देविका व तिची आई काहीशा तणावात, काळजीत पडल्यासारख्या आत आल्या. दोन वर्षांच्या अवधीनंतर ती माझ्याकडे आली होती. आल्या आल्याच काहीशा चिंताग्रस्त आवाजात म्हणाली, डॉक्टर, बघा ना माझा चेहरा किती मुरुमाळ झालाय, आरशात बघवतसुद्धा नाही, वजनदेखील वाढतच आहे. मानेवर, काखेत, स्तनाखाली त्वचा काळी पडत आहे. तेवढ्यात तिची आई म्हणाली, आणि मुख्य म्हणजे डॉक्टर, हिची पाळी आल्यापासूनच व्यवस्थित नाही आहे हो. पहिल्यांदा मला वाटले होऊन जाईल सहा महिन्यांत नियमित. पण हे अनियमिततेचे चक्र संपतच नाही. बरीच औषधं घेऊन बघितली. पण प्रत्येक वेळी औषधं बंद झाली की, ‘ये रे माझ्या मागल्या.’ एवढे बोलून त्यांनी एक मोठा फाइल्सचा गठ्ठा माझ्यासमोर मांडला.

असे चित्र आजकाल ब-याच वेळा बघायला मिळते. देविकाच्या सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या बीजांडग्रंथींचा (ovaries) आकार मोठा होऊन त्यात वेगवेगळ्या आकारांच्या बुडबुड्यांसारख्या गाठी (cysts) बनल्या होत्या. यालाच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD) असे म्हणतात. चयापचयाशी (Metabolic) संबंधित असा हा विकार आहे. यामध्ये स्त्रीबीजांड मोठे होण्याबरोबर इतरही चिन्हे दिसतात. पुरुषसुलभ हार्मोन्सचे रक्तातील प्रमाण वाढते. रक्तातील इन्शुलिनची पातळी खूप जास्त होते, पण इन्शुलिनला शरीरात प्रतिरोध वाढतो. त्यामुळे कर्बोदकांच्या व स्निग्ध पदार्थांच्या चयापचयामध्ये महत्त्वाचे बदल होतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे ‘अंतर्गत हार्मोन्सचे असंतुलन.’ यामुळे मासिक पाळी अनियमित होते.
पुरुषांप्रमाणे पोटावर चरबी वाढते, त्या तेलकट होतात व अतिरिक्त केसांची वाढ होते. जसे पुरुषांप्रमाणे दाढीवर केस येणे इत्यादी..
या विकाराची कारणे अनेक आहेत. जसे जन्मत:च एखाद्या एन्झाइमचा अभाव.
त्यामुळे ८-१० टक्के केसेसमध्ये हीच तक्रार आजी, आई, मावशी यांच्यातही आढळते. ढोबळमानाने सांगायचे तर आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलपासून स्त्रीसुलभ सेक्स हार्मोन्स (इस्ट्रोजेन, प्रोजेस्टरॉन) तयार होतात. या प्रक्रियेमध्ये एका टप्प्यावर पुरुषसुलभ हार्मोन्स (अँड्रोजेन) तयार होतो. त्यावर एक शरीरातील एन्झाइम प्रक्रिया करून स्त्रीसुलभ हार्मोन्स तयार करतो. हा एन्झाइम जर शरीरात नसेल किंवा कमी प्रमाणात असेल तर पुरुषसुलभ हार्मोन्सचे प्रमाण वाढते तसेच मेंदूमधील पिट्युटरी ग्रंथीमधून तयार होणारा LH हा हार्मोन खूप वाढतो. त्याचा ओव्हरीवर प्रभाव पाडून पुन्हा पुरुषसुलभ हार्मोन्स वाढतो.
रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते, पण त्याला प्रतिरोध होतो. त्यामुळे चरबीचे प्रमाण वाढते व वजन वाढत जाते. ओव्हरीमधून स्त्रीबीज तयार होत नाही. त्यामुळेही प्रोजेस्टरॉन हार्मोन्स कमी होतात.
इस्ट्रोजनचे प्रमाण त्या मानाने वाढते व त्यामुळे पाळी लांबणे, अनियमित होणे, खूप रक्तस्राव होत राहणे ही लक्षणे येतात. क्वचित पाळी खूप कमी येते. या सर्वांमध्ये भर पडते ती स्ट्रेस म्हणजे ताणतणावाची. यामुळे तयार होणारे स्ट्रेस हार्मोन्ससुद्धा यात भाग घेतात. पर्यावरणातील प्रदूषण, जंक फूड या सर्वांनी हा विकार वाढत जातो.
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होणारा हा विकार, आणखी असंतुलन निर्माण करतो. असे हे दुष्टचक्र तयार होते.
यामुळे होणारी तात्कालिक लक्षणे आपल्या देविकाच्या बाबतीत बघितली. पण याशिवाय पुढे वंध्यत्व (स्त्रीबीजे तयार न झाल्यामुळे) वारंवार होणारे गर्भपात, गर्भाची वाढ नीट न होणे हे परिणामही दिसून येतात. दूरगामी परिणामांमध्ये महत्त्वाचा म्हणजे मधुमेह! त्याशिवाय रक्तवाहिन्या जाड व अरुंद होणे, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच एका हार्मोनच्या प्राबल्यामुळे गर्भाशयातील अंत:त्वचा जाड होऊन गर्भाशयाचा कॅन्सर व ओव्हरीचा कॅन्सर याचीही शक्यता असते.
निदान
या विकाराचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी महत्त्वाची ठरते. ज्यात ओव्हरीज मोठ्या व सिस्टिक दिसतात.
रक्ताची तपासणी
यामध्ये पाळीच्या दुस-या किंवा तिस-या दिवशी हार्मोन्सची तपासणी करतात यात FSH, LH थायरॉइड, टेस्टोस्टेरॉन, प्रोलॅक्टिन DHEAS, Lipid profile इत्यादी तपासण्या असतात. मुलीचे वय, वजन, विकाराची तीव्रता, लग्न झाले आहे का, मुलासाठी प्रयत्न करीत आहे का, असे विविध मुद्दे उपचाराकरिता विचारात घेतले जातात. अलीकडच्या काळात होमिओपॅथी यावर अधिक प्रभावी ठरली आहे.
याव्यतिरिक्त जीवनशैली बदलण्यावर आम्ही अधिक भर देतो. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातील स्ट्रेस कमी करण्यासाठी रिलॅक्सेशन, मेडिटेशन, व्यायाम, आहार यायोगे तिचे वजन व ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
या विकाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणे व डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तसेच वेळापत्रक आखून त्याचा अवलंब केल्यास या आजारापासून पूर्णपणे मुक्तता मिळू शकते. एकूण वरील विवेचनावरून हे लक्षात आले असेल की, हा PCOD विकार त्रासदायक असला, तरी लवकरात लवकर त्यावर योग्य ती उपाययोजना केल्यास व काळजी घेऊन नियंत्रण ठेवल्यास तुम्ही त्यातून पूर्णपणे ब-या होऊ शकता. लहान मुलींमध्ये लठ्ठपणा टाळण्याकरिता त्यांना योग्य व्यायाम, आहार दिला पाहिजे. तर पुढे या मुलींना या विकाराचा सामना करावा लागणार नाही.