आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr.Jayanti Choudhari Article About Menstrual Cycle Science

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऋतूचक्रामागील विज्ञान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मासिक पाळी ही स्त्रीदेहाची एक नैसर्गिक अवस्था आहे. मुलींनी यौवनावस्थेत पदार्पण करण्याच्या काही दिवस आधी हार्मोन्समुळे त्यांच्या प्रजनन इंद्रियांचा विकास सुरू होतो. शरीरात झालेले बदल योग्य दिशेने झाल्याचा दृश्य पुरावा म्हणून मासिक स्राव सुरू होतो. काही मुलींमध्ये हे अवयव व हार्मोन्स व्यवस्थित नसल्यामुळे वयात आल्यावरही मासिक पाळी येत नाही, जसे योनीमार्गाचे मुख बंद असणे, अगदीच लहान गर्भाशय असणे इत्यादी. अशा मुलींची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असते. मासिक पाळी सुरू होण्याच्या वयात व्यक्तिगत भिन्नता असते. अानुवंशिकता, आहार, व्यायाम, वातावरण यांचा ऋतुचक्रावर प्रभाव पडतो.

बहुतांश महिलांचे ऋतुचक्र २८ दिवसांचे असते, परंतु काहींचे २२ ते ३८ दिवसांचेही असू शकते. पण पूर्वी नियमित असेल व नंतर अनियमित होऊन २१ दिवसांच्या आत आणि ४० दिवसांच्या नंतर पाळी येत असल्यास मात्र तपासणी करून घ्यावी. काहींची सुरू होते तेव्हापासूनच खूप अनियमित असते. ३, ४ किंवा ६ महिन्यांनी कधीही येते, त्यांची गर्भपिशवी, स्त्रीबीज, अंडाशय व्यवस्थित असेल तर काळजी करू नये. त्यांच्या शरीराची जडणघडणच तशी असू शकते. पण इतर स्त्रियांच्या पूर्वीच्या कालावधीत बदल होऊन अति रक्तस्राव, दोन पाळींच्या मध्येही रक्तस्राव हे नैसर्गिक धरले जात नाही. स्त्रियांच्या ऋतुचक्राचे दिवस साधारणपणे चार भागांत विभागले जातात.

ऋतुस्राव
स्त्रीच्या प्रकृतीनुसार हा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो. २ ते ७ दिवसांचा असला तरी नैसर्गिकच धरला जातो. पण यापेक्षा कमीअधिक नको. या वेळी साधारणपणे ३० ते ५० मिलि रक्तस्राव होतो, पण पूर्ण कालावधीत ८० मिलिपेक्षा जास्त रक्तस्राव झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. रक्तस्रावासोबतच अंडाशयात तयार झालेले परंतु गर्भधारणा न झालेले स्त्रीबीज व गर्भाशयात गर्भधारणेसाठी तयार झालेल्या आवरणाच्या पेशी बाहेर टाकल्या जातात.

स्त्रीबीज बनण्याचा कालावधी
हा ऋतुस्राव संपल्यापासून अंडाशयात स्त्रीबीज पूर्णपणे विकसित होऊन त्यातून बाहेर पडण्यापर्यंतचा कालावधी आहे. या कालावधीत इस्ट्रोजेनचे कार्य महत्त्वाचे असत. शरीरात त्याचा स्राव इतर वेळेपेक्षा जास्त असतो. त्यामुळे गर्भाशयाचे आवरण वाढते व पुढच्या दिवसांत त्याच महिन्यात गर्भधारणा झाली तर याच आवरणात गर्भ स्थित होतो व वाढीला लागतो.

स्त्रीबीज अंडाशयातून बाहेर पडणे
हा ऋतुचक्रातील तिसरा कालावधी असतो. या वेळी एलएच हे हार्मोन निघते. आजकाल हे हार्मोन लघवीत तपासून स्त्रीबीज बाहेर पडले का बघता येते. किंवा सोनोग्राफी मशीनद्वारे स्त्रीबीज तयार होऊन बाहेर पडले काय हे बघितले जाते. हे बीज बीजवाहक नलिकेमधून (फॅलोपियन ट्यूब) चेंडूप्रमाणे घरंगळत गर्भाशयात येते. २८ दिवसांचे ऋतुचक्र असेल तर ओव्ह्युलेशन साधारण चौदाव्या दिवशी होते. पण ते पाळीच्या ८, १० दिवसांपासून २२, २४व्या दिवसांपर्यंतसुद्धा झालेले आढळते. अनियमित पाळी असणा-यांमध्ये केव्हाही होत असते.

लुटियल फेज (luteal phase)
ओव्ह्युलेशन झाल्यापासून ऋतुस्राव सुरू होण्यापूर्वीचा हा काळ असतो. गर्भाशयात गर्भधारणा झाल्यास गर्भवाढीसाठी हे आवरण तयार झालेले असते. गर्भधारणा झाली नाही तर ऋतुस्राव सुरू होतो. या काळातही इस्ट्रोजन स्रवत असते. पण आधीच्या काळापेक्षा कमी प्रमाणात स्रवते व प्रोजेस्टेराॅन हार्मोन मात्र जास्त प्रमाणात स्रवत असते. यामुळे शरीरात थोड्या प्रमाणात पाणी साठविले जाते अाणि म्हणून या काळात स्त्रियांच्या शरीराला जडत्व येते. पाळीचे इतर त्राससुद्धा यामुळेच सुरू होतात. चक्राच्या शेवटच्या काळात इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन दोन्हींचे स्राव खूप कमी होतात. त्यामुळे स्त्रियांना कशातही उत्साह वाटत नाही. तसेच गर्भाशयाच्या व इतर रक्तवाहिन्या आकुंचन पावतात म्हणून डोकेदुखीसारखी लक्षणेही दिसतात menstrual migraine. काही स्त्रियांना झटकेसद्धा येतात. गर्भाशयाचे साधारण दोन तृतीयांश आवरण दर वेळी बाहेर पडून नवीन आवरण तयार होते.