आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमेचा हव्यास मोठा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अगदी निरक्षर माणसालासुद्धा कुठलीही निवडणूक लढायला अटकाव नसताना नेत्यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात उगाच खोट्या पदव्या का लिहाव्यात? असा प्रश्न सहज कोणाच्याही मनात येईल. पण हा रोग फक्त राजकीय क्षेत्रालाच लागलेला आहे, असं अजिबात नाही. अध्यात्म, समाजकारण, अर्थकारण, माध्यमं, शिक्षण, साहित्य या सगळ्याच ठिकाणी हा प्रयोग चालला आहे. सगळीकडेच सुमार दर्जाची माणसं स्वत:ची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा रंगवण्यात मश्गुल आहेत. याचं सर्वात तरल दर्शन होतं ते फेसबुकवर! आजच्या आभासी जगात फेसबुकसारख्या माध्यमांनी आपल्यात एक महत्त्वाचा बदल फार वेगानं घडवून आणलाय तो म्हणजे, ‘तुम्ही काय आहात?’ यापेक्षा ‘तुम्ही काय आहात, असं दाखवता?’ ते जास्त महत्त्वाचं आहे, यावर समाजाचं अव्यक्त एकमत झालंय. परिणामी, आपल्या आयुष्यातील सहजता संपून जाण्याचा धोका आहे. घरात कितीही भांडणं होत असतील, तरी फेसबुकवर कौटुंबिक आनंदाच्या क्षणाचे चार फोटो टाकून आम्ही किती आनंदी परिवार आहोत, याचा भास निर्माण करता येतो. आम्ही किती मोठ्या हॉटेलात जेवायला जातो किंवा कसं आलिशान आयुष्य जगतो, हा फेसबुकीय आविष्काराचा एक महत्त्वाचा भाग असतो. प्रत्यक्ष जीवनशैली आणि फेसबुकवर दिसणारी जीवनशैली, यात प्रचंड तफावत दिसावी, अशी अनेक उदाहरणं आहेत. स्त्री-दाक्षिण्य, देशप्रेम, समाजाचा कळवळा, व्यवस्था परिवर्तनाची आस यांवर फेसबुकवर जेवढं बोललं जात, त्याच्या दहा टक्के जरी प्रत्यक्ष आचरणात आलं, तरी भारताच्या निम्म्या समस्या सुटतील! तर सांगायचं एवढंच, फेसबुक (चेहरा पुस्तक) हे बर्‍याचदा ‘मास्कबुक’ (मुखवटा पुस्तक) बनून राहतं.

आध्यात्मिक क्षेत्रात आपण कसे फार मोठे बाबा-बुवा आहोत, याचं शक्तिप्रदर्शन चाललंय. खरे आध्यात्मिक साधक-गुरू मागे पडून ‘क्रिपा अपने आप आ जायेगी’ म्हणणार्‍या भोंदूंनी सगळा अध्यात्म-अवकाश व्यापलाय. कुठल्याही भोंदूबाबानं टीव्हीवर जाहिरात करून ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ करून दाखवली की त्याच्या धंद्याला भरभराट आलीच म्हणून समजा! साधकांनासुद्धा चांगला आध्यात्मिक गुरू मिळावा, ही आस नसून जाहिरातीच्या झगमगाटात बेगडी गुरू शोधण्यात त्यांना सुख लाभतं. आपल्या प्रजेच्या सामूहिक शहाणपणावर प्रश्नचिन्ह लावणारी, अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. पायलीच्या पंधरा पुरस्कारांनी मी कोणी तरी फार मोठा आहे, याची जाणीव इतक्या सुमार दर्जाच्या माणसांना रोज करून दिली जातेय, की खरं तर भारतात पुरस्कार देणं हा दंडनीय अपराध आहे, अशी तरतूदच कायद्यात आणायची गरज निर्माण झालीय! खुज्या माणसांच्या सावल्या मोठ्या पडायला लागल्या की सूर्यास्त जवळ आला असं समजावं, या वाक्याला आजचा समाज फारच अर्थपूर्ण बनवतोय, हेच खरं!

साहित्य असो की संस्कृती; सगळीकडे सुमारांनी उच्छाद मांडला असून त्यांना त्यांच्या खोट्या प्रतिमानिर्मितीमुळेच हे सगळं शक्य होत असतं. समाजात आजकाल प्रचंड संख्येनं तयार होणारे कवी, लेखक, कलाकार, नेते, अभिनेते हे अशाच ‘स्व-निर्मित’ प्रतिभेचे धनी असतात, असं चित्र आहे. त्यातून आपला समाज विशेषणं जोडण्यात इतका बहाद्दर की अगदी पुण्यातील पर्वतीच्या टेकडीलासुद्धा ‘हिमालय’ म्हणून अकारण सुखावून टाकणार! ‘ज्येष्ठ’ हे विशेषण तर इतकं स्वस्त की, अगदी ३५ वर्षांच्या वक्त्यालासुद्धा ‘ज्येष्ठ विचारवंत’ वगैरे सर्रास म्हटलं जातं. (त्याचं एक कारण पुन्हा ‘तरुण विचारवंत’ असू शकतो, यावर ज्ञानेश्वरांच्या प्रांतीच्या आपल्या मराठी लोकांचासुद्धा विश्वास नाही, हेदेखील आहे!) अगदी खरं सांगतो, मला स्वत:ला कित्येकदा व्यासपीठावरून ‘ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते’ म्हटलं जातं, तेव्हा फारच ओशाळायला होतं! मुळात विशेषणांची खरंच गरज असते का?

आपल्याकडे नसलेली पदवीदेखील असल्याचा आभास करणारे राजकीय नेते, शेवटी आपल्या समाजातूनच येतात. समाजाचे जे जे दुर्गुण असतात, ते त्यांच्यातही असणार. राजकारणात मी किती मोठा आहे, हे दाखवण्यावरच काम भागलं असतं, तरी हरकत नव्हती; पण गोष्ट फार पुढे गेलेली आहे. मला राजकारणातलं तर कळतंच कळतं, पण साहित्य संमेलनापासून क्रिकेटपर्यंत सगळंच कळतं, असा मोठाच भ्रम आपल्या राजकारण्यांमध्ये दृढ होत चालला आहे, तो खरोखरच चिंताजनक आहे.

जीवनशैली उगाच फुगवून प्रतिमा मोठी दाखवणारी फेसबुकवरची तुमच्या-माझ्यासारखी सामान्य माणसं असोत की पदव्या वाढवून प्रतिष्ठा वाढवू इच्छिणारी राजकारणी मंडळी, खरंच अशा उसनवारीच्या प्रतिमेची आपल्याला गरज असते का? प्रतिमावर्धनाची पुटं इतकी जास्त चढत आहेत की मूळ चेहराच कित्येकदा हरवून जातो. चेहर्‍याच्या मेकअपनं मूळ थोड्याफार असलेल्या सौंदर्यालादेखील दडपून टाकावं, हे असंच काहीसं होतंय. आयुष्य साधं, सरळ, नैसर्गिक का असू नये? खूप सारे नकली दागिने घालून जे साध्य होत नाही, ते एखादाच खराखुरा अलंकार घालून किती तरी जास्त साध्य होतं. तबला वाजवता येत असेल तर तो आणखी कसा उत्कृष्ट वाजवता येईल, हे बघणं जास्त श्रेयस्कर आहे. सगळीच वाद्यं वाजवता येतात, हे दाखवण्याचा अट्टहास नकोच नको.
प्रत्यक्ष जे असेल, तेच प्रतिमेत असेल तर आयुष्य सोपं आणि तणावरहित होईल. अन्यथा ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’ असा अनुभव येईल. फार पूर्वी ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ नावाचा एक कार्यक्रम दूरदर्शनवर येत असे. अनेक प्रतिभावान माणसांच्या मुलाखती त्यात दाखवत असत. प्रतिभेला प्रतिमेची गरज नसते, प्रतिभा आली की प्रतिमा येतेच. नुसतीच प्रतिमा असेल आणि प्रतिभा नसेल तर कधी ना कधी प्रतिमाभंजन होतेच होते आणि हाती काहीच उरत नाही. प्रतिभावान समाज तयार करायचा की प्रतिमावेल्हाळ, ज्ञानाचा आग्रह धरायचा की पदवीचा, हा आपल्यासमोरचा खरा प्रश्न आहे.

डॉ. विश्वंभर चौधरी
dr.vishwam@gmail.com
बातम्या आणखी आहेत...