आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Anil Joshi Article About Preparedness In Pandharpur

आमची वार्षिक परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिवर्षी येणारी आषाढी महायात्रा ही पंढरपूरच्या स्थानिक प्रशासनाची वार्षिक परीक्षाच असते. जसा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करावा लागतो त्याप्रमाणे काटेकोर नियोजन हे या परीक्षेसाठी आवश्यक असते. नेहमीची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास असणा-याआमच्या या गावात आषाढ शुध्द दशमी, एकादशी व द्वादशी हे तीन दिवस आम्हाला सुमारे १० ते १२ लाख लोकांची सोय करावी लागते. यासाठीची नियोजन प्रक्रिया तीन महिने आधीपासून सुरू होते. तशा पंढरपुरात वर्षभरात चार मोठ्या वा-याभरतात. आषाढी ही त्यातील सर्वात मोठी यात्रा! महाराष्ट्रातून ठिकठिकाणहून निघून पंढरपुरात पायी मार्गक्रमण करत येणा-याअनेक पालख्या हे आषाढी यात्रेचे एक वैशिष्ट्य आहे. आपापल्या मार्गाने येणा-याया सर्व पालख्या पंढरपूरजवळ वाखरी येथे आषाढ शुध्द दशमीला एकत्र येऊन पंढरीत प्रवेश करतात. पालखीमार्गावर जागोजागी या पालख्या मुक्काम करतात. या सर्व संत मंडळींच्या पालख्यात सर्वाधिक गर्दी ही श्री ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत असते. स्वाभाविकपणे या दोन पालख्याच या सर्व नियोजनाच्या केंद्रस्थानी राहतात. पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांमधून या पालख्यांचे मार्गक्रमण होत असल्याने या तिन्ही
जिल्हा प्रशासनांवर खूपच जबाबदारी असते. एकंदरीत या वारी नियोजनाचे पालखीमार्गावरील नियोजन व पंढरपूर शहरअंतर्गत नियोजन असे दोन भाग पडतात.

पंढरपूर शहराचा विचार करायचा झाल्यास यात्रा नियोजनात सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो पंढरपूर नगर परिषद, श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समिती व पोलीस विभागाचा. या व्यतिरिक्त अनेक राज्य व केंद्र शासनाचे विभाग, स्वयंसेवी संस्थाही यात सहभाग देतात. वारक-यांच्या पंढरपूर वास्तव्यातील सर्व बारीकसारीक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न या सर्व विभागांमार्फत होतो. यामध्ये फोन, रेल्वे, राज्य परिवहन, गॅस, वीज, रॉकेल या सर्व बाबींचा विचार केला जातो. खूप मोठ्या संख्येने येणा-यावाहनांना थांबण्यासाठी तळ निर्माण करणे हेही एक मोठे काम असते. यात्राकालावधीतील
दर्शनव्यवस्थेचे नियोजन शासननियुक्त मंदिर समितीमार्फत होते. एकादशीला दर्शन रांगेची लांबी ४ ते ५ किमी अंतरापर्यंत जाते. या दर्शन रांगेतील लोकांना पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, स्वच्छतागृहे, इ. बाबी मंदिर समितीने हाताळणे अपेक्षित असते. पंढरपूर नगर परिषद यात्रेतील पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, विद्युत व्यवस्था व शहरातील रस्त्यांची देखभाल ही अत्यंत गरजेची कामे बघते. यात्रेदरम्यान शेकडो टन कचरा निर्माण होतो. प्रचंड गर्दीत तो हालवणे हे अतिशय कठीण काम असते. बहुतांशी रात्री काम करून या कच-याचा निपटारा केला जातो. कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रण हे विषय पोलीस यंत्रणा हाताळते. या सर्व कामांना स्थानिक मनुष्यबळ पुरत
नाही हे उघड आहे. सर्वच विभागांना बाहेरून जादा कुमक मागवावी लागते. ही जादा माणसे बोलावणे, त्यांचे आवश्यक प्रशिक्षण घेणे, त्यांच्या कामाचे वेळापत्रक करणे व त्यांची निवास व भोजन व्यवस्था या सर्व बाबींचा विचार नियोजनात करावा लागतो. स्वच्छता व पाणीपुरवठा यासाठी जादा टिपर व टँकर लागतात व ते जिल्हा प्रशासनाकडून दिले जातात. या सर्व खात्यांच्या कामावर व त्यांच्यातील परस्परसामंजस्यावर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांचे थेट नियंत्रण असते.
यात्रेचे आरोग्य हा या कालावधीतील एक जिव्हाळ्याचा व सार्वजनिक महत्त्वाचा विषय असतो. यात्रा आरोग्य व्यवस्थापनाचे रोग प्रतिबंध व उपचार असे दोन भाग पाडता येतील. आषाढी यात्रा पावसाळ्यात येते. या कालावधीत असणारी जादा सापेक्ष आर्द्रता व गर्दी यामुळे जलजन्य आजार व श्वसनसंस्थेचे आजार यांचा प्रादुर्भाव जास्त असतो. वारी झाल्यावर तर पंढरपुरात घरटी एक तरी मनुष्य विषाणुजन्य श्वसनदाहाने (viral RTI) आजारी पडतो. सा-या महाराष्ट्रातून येणा-याभाविकांच्या बरोबर त्या भागातले विषाणूही पंढरपूरात दाखल होतात त्याचा हा अपरिहार्य परिणाम असतो. आरोग्यदृष्ट्या वारी कमीत कमी त्रासाची व्हावी असे आपल्याला वाटत असेल तर आपण काय केले पाहिजे? या प्रश्नाचे उत्तर हुडकताना मला श्री संत एकनाथ महाराजांचा एक सुप्रसिद्ध अभंग आठवतो. “काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल...
नांदतो केवळ पांडुरंग.”त्याच्या अध्यात्मिक अर्थासोबत त्यात एक लौकिक अर्थही दडला आहे. पंढरपूर शहररूपी कायेत पांडुरंगस्वरूप वारकरी यात्रा कालावधीत निवासाला असतो. वारी आपण आत्मशुद्धीसाठी करतो. ती कशी करावी ते एकनाथ महाराज याच अभंगात पुढे सांगतात, “देखिली पंढरी देही-जनी-वनी, एका जनार्धनी वारी करी...” पंढरपूर देहात, इतरेजनात, चराचरात, परिसरात सर्वत्र पाहा. अर्थात अंत:करणाबरोबर आपला परिसरही स्वच्छ ठेवा. वारीच्या या नियोजनप्रक्रियेचा एक घटक म्हणून माझे येणा-यासर्व वैष्णवांना एकच मागणे आहे. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे सर्व नियम कसोशीने पाळा. शुध्द पाणी व ताजे अन्न सेवन करा.शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरा. या पुण्यभूमीत थुंकू नका. उघड्यावर प्रातर्विधी करू नका. प्लास्टिकचा वापर शक्यतो करू नका. कचरा कचरापेटीत टाका. या सर्व सांगण्यात नवीन असे काहीच नाही. गरज आहे ती हे सर्व आचरणात आणून त्यायोगे कल्पनेतील भूवैकुंठ प्रत्यक्षात आणण्याची!
पालखी व्यवस्थापनाबाबत एका पालखीचा मला या ठिकाणी विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. ही पालखी आहे शेगावपासून पंढरपूरपर्यंत मार्गक्रमण करणारी श्री संत गजानन महाराज यांची पालखी. अंतराचा विचार केला तर या पालखीला जवळपास ७५० किमीचा टप्पा पार करावा लागतो.त्यामुळे सर्वात जास्त दिवस मार्गक्रमण करणा-या पालख्यांपैकी ही एक. वाटेवर सुमारे २०-२२ ठिकाणी या पालखीचा मुक्काम असतो. या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे भाग घेणा-याभाविकांची संख्या नियंत्रित असते. ही पालखी तिला लागणा-याकोणत्याही सेवासुविधेसाठी राज्य किंवा इतर कोणत्याही प्रशासनावर अवलंबून नसते. त्यांचा स्वत:चा पाण्याचा टँकर, सुसज्ज रुग्णवाहिका सोबत असते. तळावर आंघोळ व प्रातर्विधीसाठी सर्व नियोजन असते आणि पुढील मुक्कामी जाताना पहिला तळ पूर्ण स्वच्छ करण्यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. स्वयंपूर्णतेचा हा “शेगाव पॅटर्न” इतरांनी अनुकरण करावा असा आदर्श आहे. गेल्या काही वर्षांपासून या यात्रा नियोजनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर होऊ लागला आहे. मंदिर समितीने online दर्शन नोंदणी सुरू केली आहे. दर्शन रांगेची लांबी कमी होण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. काही पालखी रथांना आता GPS यंत्रणा बसवली आहे. मंदिर सुरक्षेसाठीही अनेक नवीन तंत्रप्रणाली वापरात येत आहेत. यंदा
एकंदरीत सर्व यात्रा व पालखी नियोजनासाठी Incident Resposnse System किंवा तातडीची प्रतिसाद
यंत्रणा ही अमेरिकन नियोजन पद्धत वापरली जाणार आहे. त्यामुळे वारीचे सूक्ष्मनियोजन अधिक चांगले होईल असा कयास आहे.
jayasss12@gmail.com
(लेखक पंढरपूर नगर परिषदेत मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत.)