आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषाभगिनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजराती ही आर्य कुलातील भाषा. शौरसेनीपासून तिचा विकास झाला. गुजरातीची स्वत:ची अशी लिपी आहे. पण तिच्यावर देवनागरीचा मोठा प्रभाव आहे. मराठीचा प्रभावही गुजरातीवर आहे. गुजराती भाषिकांची जगातली संख्या १० कोटीच्या घरात आहे. त्यातले निम्मे भारतातच आहेत. भारतातल्याही सर्व प्रांतात गुजराती भाषी आढळतात.

गुर्जर भूमी गुजरात. पूर्वी गुजरात ‘गुर्जरत्रा’ नावाने ओळखला जायचा. गुर्जरत्रा म्हणजे गुर्जरांनी रक्षित केलेला प्रदेश. इतिहासात गुजरातवर अनेक आक्रमणं झाली. त्या आक्रमणांतून गुजरात, मारवाड, राजस्थान संघर्षातून तावूनसुलाखून वाचलेला प्रदेश. आजच्या गुजरातमध्ये कच्छ, सौराष्ट्राचाही समावेश होतो. नर्मदा, साबरमती, तापीचा हा प्रदेश आबूचा पहाड, आरवली पर्वत, दमणगंगा नदीमधील टापू म्हणजेच गुजरात. या प्रांताने मुसलमान, रजपूत, इंग्रज, पोर्तुगीज अशा अनेकांशी इतिहासकाळात मुकाबला केला. अरब प्रवासी अल बरूनी आणि ग्रीक यात्री मार्कोपोलो दोघांच्याही प्रवासवर्णनात गुजरातचं वर्णन आढळतं. याचा अर्थ गुजरातचं आकर्षण आजचं नाही, सुमारे हजार वर्षांपूर्वीपासूनचं!
जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला गुजराती भेटणारच. पूर्वी व्यापार, उद्योग, शेती करणारे गुजर. आज आधुनिक जीवनाच्या सर्व क्षेत्रांत नि सर्व देशांत आढळतात. गुजराती भाषिकांची जगातली संख्या १० कोटीच्या घरात आहे. त्यातले निम्मे भारतातच आहेत.
भारतातल्याही सर्व प्रांतात गुजराती भाषी आढळतात. कारण ते इतिहासकाळापासून स्थलांतरशील राहिलेत. पंजाब, राजस्थान ओलांडत ते नर्मदेच्या काठी विसावले. गुजरात राज्य आणि दीव, दमण, दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश. या दोन्हीची राजभाषा गुजराती आहे. ही आर्य कुलातील भाषा. शौरसेनीपासून तिचा विकास झाला. गुजरातीची स्वत:ची अशी लिपी आहे. पण तिच्यावर देवनागरीचा मोठा प्रभाव आहे. मराठीचा प्रभावही गुजरातीवर आहे. सयाजीराव गायकवाडांसारख्या मराठी राजाचं तिथं राज्य असणं हेही एक कारण म्हणून सांगता येईल. ‘निदान’, ‘ताबडतोब’, ‘उलट’ असे अस्सल मराठी शब्द गुजरातीत आढळतात. भाषावार प्रांतरचनेपूर्वी संयुक्त प्रांतात गुजरात होता. मुंबईत गुजराती भाषिकांची संख्या आजही प्रभावी आहे. अर्थकारणावर सर्वाधिक मोठी सत्ता जर का कुणाची असेल तर ती गुजराती भाषकांचीच!
आजची गुजराती भाषा सुरती, चरोतरी, हालारी, झालावाडी, कच्छी इत्यादी बोलींमधून विकसित झालेली. या भाषेत लेखनपरंपरा बाराव्या शतकात विकसित झाली. रास काव्य हे गुजरातीचं आदि लोककाव्य. शालिभद्रसूरि रचित ‘भरतेश्वर बाहुबलिरास’ हा गुजराती भाषेतील आदिग्रंथ मानला. याचा रचनाकाळ इ. स. ११८५चा. रास किंवा रासा म्हणजे विस्तृत कथात्मक काव्य. जैन कवींनी अनेक रास रचलेले आढळतात. भोगातून त्यागाकडे, असं सूत्र या रासात आढळतं. त्यामुळे एकीकडे हे काव्य शृंगाराचं तर दुसरीकडे भक्तीचं प्रतीक म्हणून समोर येतं. हिंदीतही रास, रासो, रासक काव्याची परंपरा दिसून येते.

भक्तिकाव्याचीही मोठी परंपरा गुजराती प्राचीन काव्यात आहे. नरसिंह मेहता, संत मीराबाईंच्या भक्तिपदांमध्ये गुजराती, राजस्थानी (मारवाडी) भाषेची सरमिसळ दिसून येते. नरसिंह मेहतांच्या भक्तिगीतांचा महात्मा गांंधींवर खूप प्रभाव होता. सारं कृष्णकाव्य म्हणजे गुजराती प्राचीन काव्याचा खजिना. दांडिया, रास ही गीतं नि नृत्य म्हणजे गोपिका-कृष्णाचा प्रेम, प्रणय, भक्ती संगम! सतराव्या शतकात शिवदास, विष्णुदास, विश्वनाथ जानी, मुकुंद, रतनजी, कृष्णदास, गोविंद, तुलसी यांनी तर अठराव्या शतकात प्रेमानंद, रत्नेश्वर, प्रीतम, रणछोड, रघुनाथ दास इत्यादींनी व्यापक प्रमाणात कृष्णभक्तिपर पदे रचली. मध्यकाळात गुजरातीमध्ये ‘आख्यान’ परंपरा प्रचलित होती. ज्ञानाश्रयी आणि वीरकाव्यही गुजरातीत विपुल प्रमाणात लिहिलं गेलं.

गुजराती गद्यलेखनाची परंपरा आपणास मध्ययुगापासून आढळते. लघुकथा लेखनाने गुजराती गद्यलेखनाचा प्रारंभ झाला. मध्ययुगीन गद्यकृतीचा सर्वोत्तम नमुना म्हणून माणिक्यसुंदर रचित ‘पृथ्वीचंद्र चरित्र’कडे बोट दाखवलं जातं. पण खरा गद्यशैलीचा विकास झाला तो आधुनिक काळातच. भवई, नवलकथा(कादंबरी), नवलिका(कादंबरिका), तुनकी वार्ता(लघुकथा), उर्मी काव्य(गीत), शिवाय आत्मकथा, जीवनचरित, फाग, निबंध असं वैविध्य गुजरातीने जपत आपलं साहित्य समृद्ध केलं आहे.

गुजराती आधुनिक साहित्याचा प्रारंभ सन १८५७ नंतर म्हणजे पहिल्या स्वातंत्र्यलढ्यापासून मानला जातो. १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील हे साहित्य गुजराती साहित्य इतिहासात सुधारक साहित्य म्हणून आेळखलं जातं. पण या युगाचा खरा प्रारंभ केला तो ख्रिश्चन मिशनरींनी. गुजराती भाषेचं पहिलं व्याकरण लिहिण्याचं श्रेय जातं ड्रेमंड यांना. ते त्यांनी सन १८०८मध्ये लिहिलं. गुजराती मुद्रणालयाचा प्रारंभ झाला सन १८१८मध्ये. गमतीची गोष्ट अशी की, गुजराती शिक्षणाचा श्रीगणेशा झाला तो मुंबईच्या एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये (आजचं एलफिन्स्टन कॉलेज). तिथेच समोर आज महाराष्ट्राचा पुराभिलेख संग्रह (आर्काइव्हज) आहे. गुजरातीचं दुसरं व्याकरणही सन १८३३मध्ये विल्यम फोर्ब्स या ब्रिटिश व्यक्तीनेच लिहिलं. आधुनिक गुजरातीचे जनक म्हणून नर्मद यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी निसर्गकाव्य, प्रणयकाव्य, राष्ट्रीयकाव्य असं वैविध्यपूर्ण काव्य रचत महाकाव्यही रचलं. निबंध, चरित्र, आत्मकथा, नाटक असं विपुल गद्य लिहिणारे नर्मद गुजरातीचे पहिले समग्र साहित्यिक म्हणून सर्वपरिचित आहेत. सुधारक युग हे ‘नर्मद युग’ही मानलं जात. या काळात दलपतराम, नवलराम, नंदशंकर, महिपत राम निलकंठ, बृजलाल शास्त्री, रणछोडभाई उदयराम, हरगोविंददास कांटावाला, प्रभृती साहित्यकार होऊन गेले.

नर्मद युगानंतरचा काळ ‘पंडित युग’ म्हणून आेळखला जातो. गोवर्धनदास त्रिपाठींनी लिहिलेली सन १८८७ची ‘सरस्वतीचंद्र’ कादंबरी या काळातली उल्लेखनीय साहित्यकृती मानली जाते. नरसिंहराव दिवेटियांचा सन १८९०चा ‘कुसुममाला’ काव्यसंग्रह बहुचर्चित झाला याच काळात. डॉ. आनंद शंकर, मणिलाल नभुभाई, रमणभाई निलकंठ याच युगातील. संस्कृत, इंग्रजी साहित्याचा या काळावर मोठा प्रभाव होता.

गुजराती साहित्यात पहिल्या महायुद्धानंतरचं साहित्य ‘गांधी युग’ म्हणून सर्वमान्य आहे. झवेरचंद मेघाणी, रामनारायण पाठक, द्विरेफ कन्हैयालाल मुंशी, रमणलाल देसाई, मनुभाई पंचोली ‘दर्शक’, हे या काळातील गाजलेले साहित्यिक. याच काळातील महादेवभाई देसाईंच्या ‘महादेव भाईनी डायरी’, रामनारायण पाठक लिखित ‘बृहत पिंगल’, काका कालेलकरांचा निबंधसंग्रह ‘जीवन व्यवस्था’सारख्या रचनांना साहित्य अकादमीचे सन १९७०पूर्वीचे पुरस्कार लाभले.

स्वातंत्र्योत्तर काळात सुरेश जोशी, गुलाम मोहम्मद शेख, मनोज खंदेरिया, हरिंद्र दवे, चिनु मोदी, नलीन रावळ यांच्यासारखे कवी उदयाला आले. पैकी हरिद्र दवेच्या ‘हयाती’ काव्यास सन १९७८चा साहित्य अकादमी पुरस्कार लाभलेला होता. गुजराती आधुनिक काव्यातील शार्षस्थ कवी म्हणजे, उमाशंकर जोशी. त्यांच्या ‘कविनी श्रद्धा’ला सन १९७३चा साहित्य अकादमी पुरस्कार लाभला होता. तेच गुजरातीचे पहिले ज्ञानपीठ विजेते साहित्यिक ठरले. प्रखर गांधीवादी साहित्यिक म्हणून गुजरातीत त्यांना माेठा सन्मान होता. विशेष म्हणजे, त्यांना ज्या ‘निशिथ’ काव्यासाठी सन १९६७चा ज्ञानपीठ सन्मान लाभला, त्या ‘निशिथ’चा जन्म मुंबईच्या लोकलच्या प्रवासात झाला. तेव्हा ते तिशीत होते. कवी मेघाणींचं एक पत्र त्यांच्या हाती होतं. त्या पत्राच्या रिकाम्या जागेत प्रवासात त्यांनी ‘निशिथ’मधील पहिली कविता ‘मध्य रात्रि की आत्मा’ लिहिली. त्यांना ज्ञानपीठनंतर साहित्य अकादमी पुरस्कार लाभला. असे ते बहुधा एकमेवादित्य साहित्यकार असावेत. त्यांच्यानंतर त्यांच्या कादंबरी त्रयीसाठी (Trilogy) देण्यात आला. ‘मानवीनी भवाई’, ‘भांग्यानां भेरु’ आिण ‘घम्मरवलोणु’ या त्या कांदबऱ्या होत. त्यांची ‘कंकू’ कथा उल्लेखनीय मानली जाते. त्यांनी तिसरे ज्ञानपीठ स्वीकारताना केलेलं भाषण म्हणजे गुजराती कवितेचं सादरीकरणच होतं.
गुजराती आिण मराठी या अनेक अर्थांनी भाषाभागिनी होत. मराठी गांधीवादी कार्यकर्ते काका कालेलकर गुजरातीचे प्रख्यात लेखक मानले गेले. वि. स. खांडेकरांचं अधिकांश साहित्य गुजरातीमध्ये उपलब्ध असून त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. गोपाळराव विद्वांस यांनी ते एकहाती केले आहेत. सध्या प्रसिद्ध अनुवादक किशोर गौड यांनी मराठी साहित्य गुजरातीत नेण्याचा विडा उचलल्यासारखी स्थिती आहे. ‘एक पूर्ण अपूर्ण’, ‘चाकाची खुर्ची’, ‘खाली जमीन वर आकाश’, ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’, ‘गौतमबुद्ध’ अलीकडेच गुजरातीत त्यांनी भाषांतरित केले आहेत. मराठी-गुजरातीत कोश उपलब्ध आहे. गुजराती भाषिकांचे मुंबईशी नित्याचे संबंध असल्याने अधिकांश गुजराती भाषी मराठी भाषा जाणतात. गुजराती भाषा ‘केम छे?’, ‘सू छो?’पुरती मराठी भाषिकांना येते. ‘जन्मभूमी’सारखं गुजराती वर्तमानपत्र मराठी भाषी वाचू शकतो, ते लिपी साधर्म्यामुळे. गुजराती ‘ढाेकळा’ तर मराठी घराघरात खाल्ला जाताे, तर मराठी चकली, चिक्की गुजरातमध्ये. नातेसंबंधही महाराष्ट्र-गुजरातमध्ये माेठ्या प्रमाणात आढळतात. साहित्य, संस्कृती, भाषा यातील या साम्यामुळे आपल्याकडे नवरात्रीत दांडिया, गरबा खेळला जाताे. त्यांचा ‘कृष्ण’ व आपला ‘राम’ दोन्हीकडे ‘रामकृष्ण’ म्हणून एक झालेत, ते गुजरात-महाराष्ट्र ऐेक्यामुळेच!