आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.vishwambhar Chaudhari Article About Politics And Religion

अस्वस्थ वर्तमान!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मवाद हा राष्ट्रवादापेक्षा मोठा असतो, ही धर्माज्ञा आणि या धर्माज्ञेतून इस्लाम धर्मियांनी स्वत:ची करून घेतलेली धारणा दहशतवादी कृत्यांना जन्म देते आहे. कट्टरतावादी लोकांमुळे हिंदूंसमोरही हीच समस्या उभी राहताना दिसत आहे. राष्ट्रवादाला धर्मवाद पराभूत करणार असं सध्याचं चित्र आहे...

आम्ही अमुक धर्माचे लोक एका धर्माचे म्हणून एक आहोत, हे सांगतो तो धर्मवाद. तर आम्ही अमुक राष्ट्रातील लोक एका राष्ट्राचे (म्हणजे एका ठरावीक भूभागावर राहणारे) म्हणून एक आहोत, असं सांगतो तो (भौगोलिक) राष्ट्रवाद. शिवसेना काय किंवा कोणतीही हिंदुत्ववादी संघटना काय; आपल्या भूमिका हिंदुत्ववादी आहेत, तितक्याच राष्ट्रवादीही आहेत, हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. स्वाभाविकच आहे, कारण धर्मभक्ती ही राष्ट्रभक्तीच्या आवरणातून आली, तरच ती लोकांना पटू शकते, अन्यथा नाही. हीच गोष्ट मुस्लिम कट्टरतावादी लोकांच्या बाबतीत, तशी असत नाही. ‘इस्लाम खतरे में’ अशी आरोळी ठोकली की, त्यांचं काम भागतं, त्याला कारण आहे तो इस्लाम धर्माज्ञेनंच मान्य केलेला ‘द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत’ किंवा ‘टू नेशन थिअरी’. याचा अर्थ असा की, जगभरात कुठेही असा, तुम्ही स्वत: मुसलमान म्हणून प्राथमिक राष्ट्र आहात, आणि मग तुम्ही ज्या देशात राहता, त्या देशाचे एक राष्ट्र हे दुय्यम राष्ट्र झालं! म्हणजे, इस्लामची धर्माज्ञा असं सांगते, की धर्मवाद हा राष्ट्रवादापेक्षा मोठा असतो. हीच धारणा ‘जिहाद’ वगैरेंसारख्या विकृत कृत्यांमध्ये रूपांतरीत झाल्यामुळं, आणि जगभरात मुस्लिम कट्टरतावादी करत असलेल्या अतिरेकी कारवायांमुळे जग मुस्लिमांनाच संशयी दृष्टीने बघायला लागलं. तोटा झाला तो सगळ्याच मुस्लिम समाजाचा. वाईटासोबत चांगलंही भरडलं जातं. मुद्दा असा की, मुस्लिम जातीयवादाला धर्मवाद ही एकच प्रेरणा पुरते, मात्र हिंदू जातीयवादाला धर्मवादासोबत राष्ट्रवादालाही प्रेरणा म्हणून वापरावं लागतं. याच श्रेय नि:संशयपणे हिंदू धर्मात कट्टरपंथी कर्मठ विचारासोबतच ज्ञानेश्वर ते तुकाराम यांच्यापासून कबीरापर्यंत ज्यांनी ‘धर्मनिरपेक्ष अध्यात्मवाद’ जागवला त्यांना जातं. इस्लाममधील सुफी संतांनीही असे प्रयत्न करून पाहिले आहेत.

मात्र, हिंदू कट्टरतावादी लोकांमुळे हिंदूंसमोरही नेमकी हीच समस्या आता उभी राहताना दिसत आहे. फक्त फरक एवढाच की, मुस्लिमांएवढी धर्मशरणता हिंदूंमध्ये नाही; म्हणून हिंदुत्ववाद्यांना ते ‘राष्ट्रवादाच्या’ आडून करावे लागत आहे. हा एक टप्पा आहे आणि हे चालू दिलं, तर एक दिवस राष्ट्रवादाला धर्मवाद पराभूत करणार आहे, यात शंका नाही.

शिवसेनेसारखा पक्ष आणि इतरही उजव्या संघटना दावा करतात की, आम्ही धर्माचं नाही, राष्ट्राचं हित डोळ्यापुढे ठेवतो. पण हे म्हणण्यात मोठी विसंगती आहे. ती अनेक उदाहरणांनी दाखवली जाऊ शकते. वानगीदाखल आपण दोन उदाहरणं घेऊ. पहिलं उदाहरण, औरंगजेबाचे सेनानी मिर्झाराजे जयसिंग यांचं. शिवाजी महाराजांना आयुष्यात सर्वात मोठा पराभव पाहावा लागला, तो या मिर्झाराजांच्या रूपात. एकूण ३५ पैकी २३ किल्ले आणि दोन तृतीयांश राज्य महाराजांना पुरंदरच्या तहातून मोगलांना द्यावं लागलं, त्याला कारण मिर्झाराजे! म्हणजेच हा पराक्रमी हिंदू सेनानी इथल्या हिंदवी स्वराज्याचा सर्वात मोठा अडसर ठरला आहे. त्याच्या मानानं अफजलखान आणि शाहिस्तेखानाचं उपद्रवमूल्य काहीच नव्हतं. पण, हिदुत्ववाद्यांचा जो दृष्टिकोन अफजलखान, सिद्धी जोहर, शाहिस्तेखानाकडे पाहण्याचा आहे, तोच दृष्टिकोन मिर्झाराजांकडे बघण्याचा आहे का? नाही! हिंदू म्हणून त्यांना या शत्रूबद्दलही आंतरिक प्रेम आहे. म्हणजेच हिंदवी राष्ट्रवादापुढे इथे हिंदुवाद प्रबळ झालेला दिसतो.

दुसरं उदाहरण, सरहद्द गांधी खान अब्दूल गफारखान यांचं आहे. भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतातील पठाणांना या माणसानं गांधीजींची अहिंसा शिकवली. मोहम्मद अली जिनांच्या मुस्लिम लीग या स्वजातीय पक्षाला नाकारून हा माणूस महात्मा गांधी नेतृत्व करत असलेल्या काँग्रेस या तत्कालीन हिंदूंच्या पक्षासोबत राहिला. वायव्य सरहद्द हा प्रांत पाकिस्तानात सामील होऊ नये, स्वतंत्र भारतात राहावा, यासाठी सरहद्द गांधींनी शेवटपर्यंत प्रयत्न केले; मात्र सार्वमत विरोधात गेल्यानं त्यांचा नाइलाज झाला. आता असे हे कट्टर भारतवादी सरहद्द गांधी, खरं तर सगळ्याच हिंदू संघटनांना प्रात:स्मरणीय असायला हवे! पण हिंदू संघटना त्यांचं नावही काढताना दिसत नाहीत. म्हणजेच, तुम्ही भारत-निष्ठ असाल, पण जन्मानं हिंदू असाल तरच आम्हाला मान्य आहात, अशी ही निखळ धर्मवादी धारणा आहे.

गुलाम अलींच्या विरोधात सेनेचा युक्तिवाद असा होता की, भारताचे सैनिक तिकडे सीमेवर झुंजत असताना इकडे गजल ऐकणं आपल्याला शोभतं का? आता हा मुद्दा फक्त गुलाम अलींच्या कार्यक्रमाला कसा लागू होतो? पाकशी आपला रीतसर व्यापार दररोज चालू आहे (अगदी मागच्याच महिन्यात आपण पाकिस्तानचा कांदा खात होतो!). भारत-पाक नेते एकमेकांना अनेक व्यासपीठांवर भेटत आहेत. भारत-पाक विमान वाहतूक सुरळीत चालू आहे. भारतीय सिनेमे पाकिस्तानात ‘छप्पर फाडके’ धंदा करताहेत (‘बजरंगी भाईजान’ तिकडेही इकडच्या इतकाच तुफान चालला!). एवढं सगळं चाललं असताना फक्त गुलाम अलींनीच काय घोडं मारलं, ते कळत नाही! पाकिस्तानचा प्रश्न हा राजकीय प्रश्न आहे आणि सध्या केंद्रात सत्तेत असलेली सेना तो स्वत:च सोडवू शकते. मात्र संसदेचे प्रश्न रस्त्यावरच्या झुंडशाहीनं सोडवले जावेत, असंच सेनेला का वाटतं, याचं उत्तर सापडत नाही. मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेऊन पोलिस संरक्षण पुरवल्यामुळे सेनेला पुस्तक प्रकाशन समारंभापासून काढता पाय घ्यावा लागला. त्यातल्या त्यात संयोजक सुधींद्र कुलकर्णींना ऑइल पेंट फासणे आणि नंतर तसं करणाऱ्या शिवसैनिकांचा सत्कार ‘मातोश्री’वर करून दाखवणे, असे दोनच ‘पराक्रम’ सेनेला करता आले. इथं हल्ला झाला म्हणून डगमगून न जाता निर्धारानं कार्यक्रम करणाऱ्या सुधींद्र कुलकर्णी यांचंही कौतुक केलं पाहिजे. नाहीतर झुंडशाहीपुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्य झुकल्याचंच आजकाल बहुतेक वेळा पाहायला मिळतं.

हे सगळं असं अस्वस्थ वर्तमान महाराष्ट्रात चालू असताना देशातही रोज काही घडतंय. केवळ गोमांस शिजवल्याच्या अफवेवरून दादरीत एक अख्खा माणूस मारला जातो, ही घटना अश्लाघ्य आहे. पण साहित्यिकांनी ‘पुरस्कार वापसी’चं जे सत्र सुरू केलं, त्यासाठी हे एवढं एकच कारण नाही. धार्मिक उन्मादाच्या या दैनंदिन अाविष्कारामुळं सगळा देश अस्वस्थ आहे. साधू-साध्वीच नाही, तर घटनेची शपथ घेऊन मंत्री झालेले महेश शर्मा यांच्यासारखे लोक बेफाम धार्मिक वक्तव्ये करून वातावरण विषाक्त करत आहेत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांनी सामाजिक-वैचारिक विश्व अस्वस्थ आहे. साहित्यिक संवेदनशील आहेत, आणि म्हणून पुरस्कार परत करून आपल्या परीनं, अहिंसक मार्गानं आपली नाराजी नोंदवत आहेत. परिस्थिती इतकी विचित्र आहे की, त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय! साहित्यिकांना जाब विचारणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा फक्त कशाची अभिव्यक्ती करायची, यापुरता मर्यादित नसून ती केव्हा करायची, याचं स्वातंत्र्यही अनुस्यूतच असलेला हक्क आहे. म्हणून आत्ताच का पुरस्कार परत करताय, हा प्रश्नच गैरलागू होतो. हिंसक नसलेली, इतरांना उपद्रवी न ठरणारी, राष्ट्रीय संपत्तीची हानी न करणारी कुठलीही अभिव्यक्ती ही लोकशाही संमत अभिव्यक्तीच समजली जाते. साहित्यिकांनी ती नोंदवण्याचा सार्वकालिक हक्क आहे.

(dr.vishwam@gmail.com)